Thursday, 12 February 2026

प्रवासातली गोष्ट : २३

सुरजने तेव्हा सर्वांच्या नकळत ती डायरी सुयशच्या हातात दिली. रात्रभर सुयशने त्या डायरीतले प्रत्येक पान वाचून काढले. डायरी वाचून झाल्यावर त्याचे मन गीतांजलीच्या आठवणींनी भारून गेले. तिला भेटण्याची अनामिक ओढ त्याच्या मनाला लागली. पहाटेचा प्रहर सुरु झाला. सूर्याची कोवळी किरणे स्पर्श करत साखर झोपतून सर्वांना उठवत होती. सुयश रात्रभर जागाच होता त्यामुळे तो तडक उठला आणि गीतांजलीच्या खोलीत गेला. तिच्या डायरीतले गुपित त्याने वाचले हे तिला सांगण्यासाठी तो कासावीस झाला होता.  गीतांजली मात्र अजूनही गाढ झोपली होती.
शेवटी त्याने आक्काला गाठले आणि दोघे ही झोपाळ्यावर बसून गप्पा मारू लागले. आक्का पहाटेच उठून सडा रांगोळी देवपूजा करून निवांत बसली होती. सगळे उठल्यावर आक्का सर्वासाठी चहा करायला स्वयंपाक घरात गेली. सुयश एकटाच झोपाळ्यावर झुलत बसला होता. तेवढ्यात तिथे सुरज आला. त्याने सुयशला डायरीबद्दल विचारले. सुयशने होकारार्थी मान हलवली. तोपर्यत गीतांजली उठली होती. ती अंगणात फुलं काढण्यासाठी जाताना सुरजला दिसली होती. सुयशला त्याने अंगणात ती डायरी घेऊन जायला सांगितले. समोरच गीतांजली दिसली. तिचा चेहरा खुललेला होता. बऱ्याच दिवसांपासून त्या अंगणात लावलेल्या गुलमोहराच्या छोट्याशा खोडाला पुन्हा पालवी फुटली होती. हिरवी पोपटी कोवळी पाने बाहेर डोकावत होती. तिच्या अंगणातला गुलमोहर आता पुन्हा नव्याने फुलणार होता.
गीतांजली गुलमोहराच्या नव्या फुटलेल्या पालवीवरून हळूवार हात फिरवत असताना तिच्या मागून सुयश आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “शेवटी फुलला गुलमोहर... तो कदाचित माझी वाट बघत होता... माझ्या येण्याची आणि तुला पुन्हा भेटण्याची...!”
सगळे एव्हाना उठले होते.  सुयशने तिच्या समोर डायरी धरली. जेव्हा सुयशने ती डायरी वाचली आणि आपले गुपित त्याला कळले आहे हे गीतांजलीला समजले तेव्हा तिने माफी मागितली. काहीही न बोलता त्याने तिला मिठीत घेतले. तेव्हा तिथे कोणी ही नव्हते. गीतांजली आणि सुयश यांच्या प्रेमाचा साक्षीदार गुलमोहर फक्त तिकडे होता.
सगळ्यांचे आवरून झाले होते. चहा नाश्ता झाल्यावर आमची निघायची तयारी सुरु झाली होती. आक्काने सुरज आणि सगळ्यांनाचीच मीठ मोहरीने दृष्ट काढली. सुरजचे कान पकडून त्याची पाठ थोपटली.
सोमेशला आक्काने घरी बनवलेले लाडू आणि चिवड्याचा डब्बा दिला. माझ्यासाठी त्यांनी एक छान मोगऱ्याचा गजरा आणि चाफ्याची फुलं दिली. सनिक दादाला घरच्या झाडाचे डझनभर आंबे दिले. सगळेच भावूक झाले होते.
सुयश आजी आजोबा आणि इशान यांनी पण निरोप घेतला. आजी आजोबांनी आक्काना गीतांजलीला शुश्रुषा क्लिनिकमध्ये पुन्हा पाठवण्याची विनंती केली. आक्कानी छोट्या इशानला कडेवर घेऊन म्हणले
" गीता आता फक्त माझी पोर नाही... ती तुमची सर्वांची आहे... मला आता तिची काळजी नाही. "
त्यावर सुयश म्हणला " बरोबर म्हणालात आक्का, ती फक्त तुमची मुलगी नाही... मी तिला क्लिनिक मध्ये आताच नेणार नाही तर तिला आता मानाने घेऊन जाईन. आयुष्यभराची जोडीदार म्हणून मला गीतांजली द्याल ना आक्का... "

हे ऐकून आक्काच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. एवढ्या वर्षाची तिची तपश्चर्या फळाला आली होती. याचं भरभरून कौतुक तेव्हा आक्काच्या डोळ्यातून दिसत होतं. आक्का सुयशला म्हणली.

" लवकर या जावयी बापू... आणि माझ्या लेकीला सुखाने नांदवा... मी धन्य झाले... तुमच्या सारखा शिकलेला आणि समजून घेणारा जोडीदार गीताला मिळाला... नशीब काढलंस पोरी "

आक्का गीतांजलीकडे पाहत म्हणाली. गीतांजलीने आक्काला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात विवेक मोठ्याने म्हणला " ताईच्या लग्नाला यायचं हं... "
सगळयांमध्ये हशा पिकला. आम्ही सगळेच आता वाड्यातून परतीच्या वाटेवर निघालो. आक्का आणि वाडा दुरुनच खुणावू लागला. आम्हाला पुन्हा येण्याचे आमंत्रण देऊन गेला. सगळी गुपितं आणि तो फुललेला गुलमोहर कायमचा मनात घर करून गेला. गीतांजली आणि सुयश आता एकत्र हॉस्पिटल सांभाळतात. त्यांच्या या संसारात आता आणखी दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. इशान आणि जान्हवी त्यांच्या आजी आजोबांसोबत एकत्र राहतात. जान्हवीने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. आता ती क्लिनिक च्या फंड मधून उभे केलेले वृद्धाश्रम सांभाळते. आक्काचा दिवस आता गीतांजलीच्या नवजात जुळ्या बाळांना सांभाळण्यात जातो. आता त्या वाड्यात कोणीच राहत नाही. तरीही आज पुन्हा त्या वाड्यात प्रवेश करताना ती डायरीतली गोष्ट आठवते. त्या डायरीमध्ये अजूनही तो फुललेला गुलमोहर आणि त्याच्या आठवणी अजूनही तशाच ताजा आहेत.

समाप्त
*****

Friday, 6 February 2026

प्रवासातली गोष्ट : ११


मी समोर असताना सुयश सांगत होता, “ गीतांजली सोज्वळ, शांत, अल्लड व खूप प्रेमळ मनाची होती.  त्या बाहेर भेटलेल्या आजी आजोबांच्या मुलाचा मोठा अपघात झाला होता. त्याचे इथेच उपचार सुरु होते. मात्र अपघात इतका जबरदस्त होता की, आम्ही त्यांच्या मुलाला वाचवू शकलो नाही. त्या अपघातात त्यांचा मुलगा गेला, जान्हवी सुद्धा त्या अपघातात जखमी झाली होती. डोक्याला मार लागल्याने त्या धक्क्यामुळे तिची वाचा गेली. "


मी तेव्हा सुयशचे बोलणे ऐकून पुरती गोंधळून गेले होते. अचानक गीतांजली इथे कशी काय आली, ही गीतांजली नक्की कोण? मी वाड्यात पाहिली तीच का ही? आणि हा सुयश कोण? गीतांजली बद्दल याला काय माहित आहे? सुरजला नक्की काय कळले आहे? आता विचारलेच पाहिजे. म्हणून मनातली बेचैनी चेहऱ्यावर न आणता मी सुरजला इशाऱ्याने खुणावले आणि हा नक्की काय प्रकार आहे, असं त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्यातली ती शोधक नजर  पूर्णपणे सुयशवर एकवटलेली होती. त्यामुळे माझा प्रयत्न फोल गेला. तेव्हाच अचानक माझ्या सोबत असलेली मुलगी पुन्हा रडायला लागली. सुयशने तिला काही वेळ जवळ घेतले. " हि मुलगी तुमच्या सोबत आहे का?” असे मला विचारले. त्याला लहान मुलांचा लळा असावा असा काहीसा तो तिच्याशी संवाद साधत होता. 

मी त्याला थोडक्यात झाला प्रकार सांगितला. त्या वर तो पुन्हा भूतकाळात गेला. आणि म्हणला “ या अपघातासारखा तो ही अपघात झाला होता आणि जान्हवीचे कुटूंब त्यात कोलमडून पडले. त्या अपघातात तिच्या जवळची व्यक्ती तिच्यापासून कायमची दूर गेली होती. जेव्हा जान्हवी कोमातून बाहेर आली तेव्हा तिची वाचा गेली. त्यावेळी गीतांजलीने कर्तव्यदक्षपणे आपली कामगिरी बजावली होती. तिने जान्हवीला जवळ जवळ त्या धक्क्यातून बाहेर काढले. ती जान्हवीची खूप प्रेमाने काळजी घेत होती. आपल्या मोठ्या बहिणीची काळजी घ्यावी अगदी तशी...” सुयश सांगत होता.

“मी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्यामुळे गीतांजली रोज माझ्या संपर्कात येत होती. तिची सेवाभावी वृत्ती पाहून मी आणखीच तिच्यात गुंतत गेलो. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आमच्यात पटकन मैत्री झाली. हळूहळू तिच्या या स्वभावामुळे जान्हवीची तब्येत देखील सुधारत होती. तिच्या चेहऱ्यावर हरवलेले हसू पुन्हा दिसायला लागले होते.”
सुयश भूतकाळात एवढा रंगून गेला आणि गीतांजलीच्या एक एक आठवणी सांगू लागला. मी फक्त ऐकत होते. माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. माझ्यासोबत असलेली ती बच्चीही आता शांत झाली होती. तिला समोरच एक बाग दिसली आणि लगेचच हात सोडून ती त्या दिशेने पळाली. तिथल्या बागेत बरीच झाडं होती. 

सुयश त्या मुलीकडे आणि बागेकडे एकटक पाहत होता. मग स्वत:शीच काहीतरी बोलू लागला. “तिला फुलझाडांची, बागेची खूप आवड होती. काम उरकून ती यासाठी वेगळा वेळ ठेवायची. बागेमध्ये या झाडांना, फुलांना आपले काहीतरी गुपित ती रोज सांगायची. यावरुन माझ्या लक्षात आले की, गीतांजलीसाठी ती बाग तिच्या मनाच्या अगदी जवळची होती. तिच्या तोंडून गुलमोहराचे खूपदा कौतुक ऐकले होते. म्हणूनच मी तिला एक गुलमोहराचे झाड भेट दिले होते. तिच्या या फुलवलेल्या बागेत आम्ही ते लावले, ती त्याची जीवापाड काळजी घ्यायची नंतर ते झाड तिची आठवण म्हणून राहिले... माझ्या समोर...”, हे सांगताना सुयशच्या मनातली घालमेल सुरजला आणि मला ही जाणवत होती.

बहूतेक हेच ते गुलमोहराचे झाड, हिरवे गार व डेरेदार... अजूनही तसेच आहे. गीतांजलीने प्रेमाने त्याला वाढवले होते. सुयशशी झालेली ही भेट नक्कीच काहीतरी गूढ आहे आणि तितकेच ते एक गोड गुपित आहे. नक्की काय या काळाच्या पडद्याआड लपलेले आहे ते शोधण्याचा हा प्रवास नकळत सुरु झाला होता. तेवढ्यात हॉस्पिटलमधून सम्या, विवेक, सोमेश बाहेर आले. समोर च त्यांनी आम्हाला गाठले. सुरजने काही विचारायच्या अगोदरच विवेकने सर्व व्यवस्थित असल्याचे त्याला सांगितले. सोमेशने लगेच प्रश्नांचा भडीमार सुरु केला.

“ एवढा वेळ कुठे होतास तू? आम्ही कधी पासून शोधतोय? अचानक कसे गायब झालात तुम्ही दोघे? आणि ही लहान मुलगी, ते सर कोण आहेत? अरे सुरज बोल लवकर...!",

“ थांब रे जरा... त्याला बोलू तर दे...!" असे म्हणत सनिक दादाने सोमेशला शांत केले.

“ हा माझा मित्र सुयश ” अशी सुरजने एका वाक्यात ओळख करुन दिली. यावर सुयशने काहीही बोलणे टाळले आणि एक स्मित हास्य केले. तो आम्हाला दिशा दाखवत हॉस्पिटलच्या समोरच्या गेटपाशी घेऊन आला. तसे आम्ही तिथून सर्वजण हॉस्पिटलच्या मुख्य एन्ट्री पाशी आलो. त्या मुलीची आई तिथे माझी वाट पाहत होती. बराच वेळ मी तिथे नव्हते त्यामुळे ती घाबरली होती. पण मुलीला पाहिले आणि तिची चिंता मिटली.

“ आता सगळं ठीक आहे, तुम्ही हिला सांभाळून खूप मोठी मदत केली. " असे म्हणत ती आभार मानून मुलीला घेऊन तिथून निघाली.

सगळे पुन्हा पारावर जमले. सूरज कडे सर्वांचे लक्ष होते. आता मात्र सगळ्यांना उत्सुकता होती, नक्की काय चाललंय कुणालाच कळेना. मलाही पूर्णपणे काहीच माहित नव्हते. सुरजने इशाच्या बॅगेतून गीतांजलीची डायरी आणली. 

Wednesday, 12 March 2025

२४. ऋण निर्देश

" फुललेला गुलमोहर - एक गुपित " पूर्ण करताना कथेची रचना आणि मांडणी करताना वेळोवेळी मिळत गेलेले मार्गदर्शन महत्वाचे होते. सुरवातीलाच कथा विश्वाची ओळख करून देण्यात श्री. नितीन चांदोरकर, सौ. दीपा ठाणेकर यांनी पुस्तकाच्या वाचन, निवडीवर मार्गदर्शन केले. त्यानंतर कथालेखन कार्यशाळेमार्फत श्री. किरण येले सर, श्री. प्रणव सखदेव यांचे मार्गदर्शन या कथेसाठी बहुमोलाचे होते. कथेतील बारकावे टिपताना श्री चिंतामणी दातार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले सहकार्य तसेच कथा पूर्णत्वाला नेताना त्याचे व्यवसायिक मार्गदर्शन आणि पुस्तक रुपात येण्याचा प्रवास कवयित्री, लेखिका सौ.ऋतुजा देशपांडे यांनी सुलभ केला. दैदिप्य जोशी या मित्राने ही तंत्रज्ञान आणि संपर्कातून जोडणी करत यात खारीचा वाटा उचलला. लेखन विश्वात मिळत गेलेले लेखनातील हे आणि असे अनेक दुवे हा प्रवास नक्कीच अधिकाधिक उत्तम करत आहेत. यासोबत पारिवारिक पाठिंबा आई, वडील यांनी लेखनात कळत नकळत प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुस्तकाच्या जडण घडणीत हे नक्कीच गरजेचे होते. त्यातूनच पुढे लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. माझ्या वाचक वर्गाने वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले आजवरचे लिखाण वाचून त्याला उत्स्फूर्तपणे दाद देत या प्रवासाला सुरवात झाली होती. त्याचेच फलित म्हणून या वळणावर ही निर्मिती करण्याचे नक्की केले. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही कथा पुढे येत आहे. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... असाच पाठिंबा मिळत राहो ही इच्छा...

Tuesday, 11 March 2025

२. पार्श्वभूमी

" ती ओढ्यावरची कातर वेळ " या कथेला सुरुवात करताना डोळ्यासमोर शहरी जन जीवन, ग्रामीण वातावरण आणि याला जोडणारी नव निर्मितीची वाट दिसत होती. शहरी भागात राहणारी अल्लड मुलगी ग्रामीण वातावरणात कोणकोणत्या बदलांना सामोरी जाते हे रंगवण्यात आणि शब्द रुपात मांडण्यात कथा लिहिताना उत्सुकता वाटली. साक्षीला लिहिताना तिच्या आजूबाजूला निर्माण होत जाणारी वर्तुळे सतत बदलत गेली. कधी ती तुमच्या माझ्यातली एक वाटली. भविष्यात घडणाऱ्या घटना अनाकलनीय असतात. कोणतीही कल्पना नसताना चित्र बदलत जातात. माणसे जोडत जातात. गोष्टी घडत जातात. अशी कथा पुढे सरकत जाते. मात्र कथेच्या शेवटी भूतकाळातील धागे दोरे कळू लागतात. नवं निर्मितीचा ध्यास घेतलेले असे असंख्य लोक सतत प्रयत्न करत असतात, पण ते पूर्णत्वास जाण्यासाठी कदाचित ती वेळ यावी लागते किंवा तशी व्यक्ती. तेव्हाच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. बोलण्यात, राहण्यात, विचार करण्यात कायापालट होतो. आणि अशी कथानकाची जुळणी करणे या कथेत मजेशीर भाग वाटला. कथा लिहिताना त्यात शहरी जीवन आणि ग्रामीण वातावरण यांचे तुलनात्मक वर्णन करताना दोन्ही बाजूचे महत्व टिकवणे गरजेचे होते. नचिकेतची आणि भानुची काळ्या मातीवरची आस्था आणि साक्षी, आराध्याचे महाविद्यालयीन शिक्षण या दोन्हीच्या संगमावर पुढची वाट तयार होत गेली. व्यवसायिक प्रशिक्षण आणि हताश मनाला प्रकाशित करणारा काजव्यासारखा भावनिक ओलावा या दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडत कार्य सिद्धीस नेण्याचे केलेले पर्यन्त रंगवताना शिकता ही आले. कथेच्या शेवटी परतीच्या वाटेवर जाण्याची ओढ आणि त्याच वाटेवरून नचिकेतचे वाढलेले वर्तुळ दाखवणे हा हेतू होता. सुरवातीला म्हणल्या प्रमाणे भूतकाळात घडलेल्या घटना आणि त्याला जोडणारा भविष्यकाळातील दुवा. " पुन्हा त्याची भेट "असा एकूण कथेचा आराखडा माझ्या शब्दात मांडला आहे. आनंद, उत्साह, भीती, दुःख, प्रेम अशा भावनिक वर्तुळातून फिरताना आधुनिकतेची स्वप्ने आणि मायेचा ओलावा जिवंत ठेवणारी ती कातर वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी तरी येतेच. या कथेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा यावी ही सदिच्छा.

Friday, 7 March 2025

१. लेखिकेचे मनोगत



' फुललेला गुलमोहर - एक गुपित ' कथेची सुरुवात करताना ती कथा माझी न राहता त्यात माझ्या सखींच्या भावना त्यांच्या शब्दात उतरत जाव्या. ही एक इच्छा समोर ठेवून कथेला सुरवात झाली. सुरवातीपासून ती कथा फक्त एक विचार समोर न आणता वेगवेगळे विचार आणि कल्पना विश्व रंगवत गेली. तिच्या भाव विश्वाचे चित्रण विविध अंगाने साकारता आले. आपल्यातल्या प्रत्येकाला ती कथा माझी होऊन पानावर उतरत गेली.  कथेतील मुख्य नायिका " गीतांजली " गुलमोहराप्रमाणे बहरत गेली. अर्थात हे शक्य झाले ते माझ्या सोबतच्या सह लेखिका सौ प्रणिता आंबरे आणि सौ. सुवर्णा कांबळे यांची साथ घेऊनच. त्यामुळेच कथेचे श्रेय माझ्या इतकेच जोडल्या गेलेल्या या माझ्या सख्यांचे ही तितकेच आहे. 


कथा लिहिताना ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तर ती वाचकांना घेऊन प्रवास करते. कथानकासोबत आपण गाडीच्या प्रवासात, रेस्टहाऊस मध्ये, क्लिनिकच्या जवळपास, आक्काच्या वाड्यात, अंगणात, बागेत पोहोचत जातो. कथेतले सगळे पात्र आणि कथेची नायिका लिहिताना वेगवेगळी रूपके वापरून शब्दात मांडताना कथा आणखी जिंवत होत जाते. 


कथेची सुरवात एका प्रवासाने झाली. हा प्रवास पुढे नव्या वळणावर, नव्या प्रसंगात घेऊन गेला. नव्या नात्यांची ओळख करून दिली. नवा दृष्टीकोन देत कथा पुढे सरकत गेली. काही प्रसंग लिहिताना मनात द्वंद्व निर्माण झाले ही; पण ती कथा आपल्यातील प्रत्येकाची आहे, कथेतील पात्र कुठे ना कुठे भेटत गेले तशी कथा साकारत गेली. 


या कथेचे सह लेखिका सौ. प्रणिता आंबरे यांच्या सोबत कथानक लिहिताना प्रसंगाला तटस्थ पणे पाहून कथा पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी सहकार्य मिळाले. शब्दांची अचूक पणे बांधणी झाली. कथेला विषय आणि आशय दोन्ही जोडून लिहिताना मांडणी व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्याचे मार्गदर्शन प्रणिता ताईच्या लिखाणात वाचताना जाणवले. कथेचा भाग पूर्ण होताच त्याची थोडक्यात झलक भागाच्या शीर्षकात जाणवते. आणि शीर्षक ठरवताना त्या संबंधी वाचन, निकष ठरवताना ताईची मदत झाली. सहनियोजन करत करत कथेला मूर्त स्वरूप मिळाले. 


कथेला ग्रामीण पार्श्वभूमी देताना आक्काच्या वाड्यातील प्रसंग काल्पनिक विश्वातून बाहेर आणतात आणि वास्तवात समोर उभे राहतात. ही ग्रामीण बाजाची लेखणी या कथेला सौ. सुवर्णा कांबळे यांच्या शब्दांतून मिळाली. ग्रामीण जीवन आणि ग्रामीण स्त्री चे भाव विश्व, तिची विचार सरणी मांडताना सौ सुवर्णा कांबळे यांनी जी सहजता वापरली आहे. ती पात्रांना आपल्या आणखी जवळ आणते. विषयाला जोडून आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगाचे चित्रण करणे. वातावरण निर्मिती आणि सर्व सामान्य माणसाचा शोध घेत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही बाजूने मांडणी करण्यात सौ.सुवर्णा यांनी योगदान दिले.


ज्याप्रमाणे ही कथा लिहिताना आमची होऊन लिहिली गेली आणि त्या कथेला तितकीच सुरेख प्रवासाची किनार मिळाली. तशीच किनार कथा पुस्तक रुपात समोर येताना प्रत्येकाला आपली वाटून वाचकांच्या पसंतीस उतरावी हीच इच्छा. 


- जुईली अतितकर

Sunday, 21 July 2024

प्रवासातली गोष्ट : २२


सर्वजण जेवायला सुरवात करणार तितक्यात सनिक दादाचा फोन वाजला. सनिक दादाने तो उचलायच्या आधीच सुरजने त्यावर झडप घातली.
“ मी उचलतो थांब ”
“हॅलोऽऽऽ मी सुयश...” पलीकडून आवाज आला आणि सुयशचा आवाज ऐकून सुरजचा जीव भांड्यात पडला.
“अरे होऽऽऽ मी सुरज बोलतोय. किती वेळ लागतोय तुम्हाला पोहोचायला? आता कुठे आहात? आणि ड्रायव्हर काका आहेत ना व्यवस्थित?”
सुरज थोड्या दबक्या आवाजातच बोलत होता. अजूनही सनिक दादाला सुरज नक्की कुणाशी बोलतोय हे समजले नव्हते.  सनिक दादाने बसल्या जागेवरूनच सुरजला विचारले, “सुरजऽऽऽ कुणाचा आहे रे फोन? जेवायला ये लवकर. आम्ही बसलो बघ... "

“हो...हो... आलोच... तुम्ही जेवण सुरु करा...” सुरजने गडबडून त्याला प्रत्युत्तर दिले.
इकडे सुयशला मात्र काहीच मागमूस लागत नव्हता. त्याने आता दहा मिनिटांत त्या शेरवली फाट्यापर्यंत पोहोचू एवढे फोनवर सांगितले.
“ सुयश आम्ही आताच पोहोचलो आणि जेवायला बसतोय... तू तिथे पोहोचलास की थोडे आत डावीकडे ये. पाच मिनिटांचा रस्ता आहे. मी तिथेच असेन. ”
सुरजच्या डोक्यात नक्की काय सुरु होते हे ना सुयशला समजत होते ना आम्हा कोणाला.
“हो...हो...” म्हणत त्याने फोन ठेवला. सुरज लगेच जेवायला बसला. सनिक दादाने पुन्हा फोनबद्दल विचारले तर तेव्हाही उडवाउडवीची उत्तरं देऊन तो गप्प बसला.
जेवणं झाली. सर्वजण अंगणात गोल करून बसले. आराम वगैरे कोणालाच करायची इच्छा नव्हती. बाहेरच्या बाजूला लागलेल्या कै-या पाहून त्या पाडण्याचा मोह कुणालाच आवरला नाही. त्यात इशानलाही सामील करुन घेतले.
सगळी मंडळी कैऱ्या पाडत असताना त्या गोंधळात इशान रस्त्याच्या पलीकडे कधी गेला कुणालाच समजले नाही. गीतांजलीनचे लक्ष गेले तेव्हा दुरून एक गाडी येत होती. तिने इशानकडे धाव घेतली आणि त्याला जवळ ओढले तोपर्यंत ती गाडी त्या दोघांना अगदी खेटून गेली.
लहान मुलाला बघून गाडीतून मोठ्याने हॉर्न वाजला आणि त्या आवाजाने घाबरुन इशान तिथेच रडायला लागला. ती गाडी सुयशचीच होती. सुयशने गाडी तिथेच थांबवली. गाडीतून उतरुन तो मागे आला. त्याला रडणारा मुलगा आणि गीतांजली दिसली. तीच आनंदी चेहऱ्याची... बोलक्या डोळ्यांची गीतांजली. सुरवातीला तिचे लक्ष इशानकडेच होते. त्याला कुठे लागले तर नाही ना हे ती पाहत होती.
तिने समोर पाहिले. समोर सुयश रस्त्याच्या मधोमध उभा होता. अगदी स्थिर आणि शांत... पुढे काहीच बोलणे झाले नाही. इशान गीतांजलीचा हात सोडून धावत रडत अंगणात आला. झाकोळून आलेलं आभाळ आता टपटप बरसायला लागलं होतं.  त्या थेंबांमध्ये इशान भिजत होता. कैऱ्या पाडण्याचा कार्यक्रमही आटोपता घेण्यात आला. सम्या आणि विवेक झाडावर चढले होते, तेही खाली उतरले. इशानचा आवाज ऐकून सगळे  मागच्या दारातून वाड्याबाहेर आले.
पाऊस बरसत होता. सुरजने सुयशला पाहीले आणि मिठी मारली, त्याचे आभार मानले. सुयशने गाडीजवळ जाऊन ड्रायव्हर काकांना बाहेर यायला सांगितले. त्यांच्या हातापायाला मलम पट्टी केलेली दिसत होती. सनिक दादाने ड्रायव्हर काकांना पाहिले. नक्की कुठे कुठे लागले हे बघता बघताच तो म्हणाला, “तुम्ही एकदा सांगितलं असतं तरी हे एवढं झालंच नसतं... बरे आहात ना काका?”
“पावसातच बोलणार आहात का सगळे... वाड्यात आजी आजोबा, आक्का सगळेच आहेत. त्यांना न सांगता आलो आहोत आपण.. चला... नाहीतर काळजी करतील ते..." सोमेश म्हणाला.

“हो...हो...” म्हणत इशानला घेऊन आम्ही निघालो. गीतांजली अजूनही मागेच उभी होती. जागची हलली सुद्धा नाही. सगळे पुढे गेले, सुयश तिथेच गाडी पार्क करुन आला. वाटेत थांबला, त्याने गीतांजलीच्या नाकापुढे एक चुटकी वाजवली तशी ती भानावर आली.
“क्लिनिकमधून निघायच्या आधी सांगायला हवं होतंस तू... अजून किती वर्ष मी एकट्याने त्या बागेतल्या गुलमोहराची काळजी घ्यायची?”
तिला रडू अनावर झाले. एव्हाना पाऊसही थांबला होता. तशी ती स्वत:ला सावरुन वाड्यात आली. सुयशला समोर पाहून आजी आजोबांना हायसे वाटले. त्याला अगदी आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी जेवणाचा आग्रह केला. जेवणं झाल्यावर आजींनी सुयश आणि गीतांजली दोघांना समोर बसवून सगळे खरे खरे सांगितले. सुयशच्या मनातली गीतांजलीची काळाआड गेलेली प्रतिमा पुन्हा स्पष्ट दिसू लागली. तिच्या बद्दलचे मनातले प्रेम आणि आदर आणखी वाढला. सुयशने सुरजच्या धाडसाचे सुद्धा कौतुक केले. त्यांच्यातली मैत्री खऱ्या अर्थाने आणखी दृढ झाली.
दिवस मावळतीला निघाला होता. सुयशला दवाखान्यात परत जाणे आवश्यक होते. परत जाण्यासाठी त्याने तयारी केली. पाऊस पडल्याने सगळे दिवे गेलेले होते. अंधाऱ्या रात्री बाहेर न पडणे योग्य होते. सुरजने पुन्हा आग्रहाने सुयशला थांबवून घेतले. दिवसभराची धावपळ सगळ्यांच्या अंगावर आली होती. त्यामुळे जेवणं आटोपल्यावर सगळे अंगणातच गप्पा मारता मारता तिथेच झोपले.  

Sunday, 14 July 2024

प्रवासातली गोष्ट : २१


 

आक्काचा आवाज ऐकून गीतांजलीच्या आधी आम्ही सर्वजण बाहेर आलो. सर्वांना पुन्हा वाड्यात एकत्र पाहून आक्काला नवल वाटले. ती म्हणाली,

“ तुम्ही समदी इथं! ते बी आत्ता या वक्ताला...असं अचानक !”

“अगं आक्का... हा सोमेश बघ, सारखा तुझ्या हातच्या जेवणाची आठवण काढत होता. आम्ही परत आमच्या घरी जात होतो. तेव्हा वाटलं तुला आणि गीतांजलीला जाता जाता भेटूनच जावं. पुन्हा एकदा तुझ्या हाताची चव चाखून जावी म्हटलं." सनिक दादा आक्काच्या खांद्यावर हात ठेवून म्हणला.

“ गप्प रे दादा... अर्धवट सांगू नको आक्काला ... खरं तर या सगळ्यांनाच तुझ्या हातच्या जेवणाची आणि वाड्याची आठवण येत होती. आता मला मधला माकड करतात बघ." सोमेश लगबगीने म्हणला.

“व्हय रे बाबा... चला आता आत... का इथंच पाहुणचार करु तुमचा...चला बरं आत... हा प्रसाद घे आणि सगळ्यांना दे थोडा थोडा ..."

सोमेशच्या हातात एक पेढ्यांचा बॉक्स ठेवून आक्का म्हणाली. तसे सगळे आत आले. आक्काने आजी आजोबांना पाहून विचारले, “हे नवीन पाहुणे कोण म्हणायचे? तुमच्या सोबतच आलेत का?"

आक्का आत आली आणि कट्ट्यावर पिशवी ठेवून बसली. तो पर्यंत गीतांजली तिथे आली. तिच्या हातात फळांनी भरलेली प्लेट आणि चहाचा ट्रे होता.

“अगं आक्का ... सांगते सगळं... बसा सगळे मी सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता आणला आहे...”

आक्का देवघरात गेली आणि तिने पुजेचं ताट देवापुढे ठेवलं. देवघराच्या खिडकीतून तिची नजर अंगणात गेली. तिथूनच ती ओरडली. “कोण रे तूऽऽऽ तिथे काय करतोय? ये इकडे... बाहेर ये पोरा..."

आक्काचा खणखणीत आवाज ऐकून इशान चांगलाच घाबरला आणि रातराणीच्या झाडामागे लपून बसला. “गीते ए... गीते... आपल्या अंगणात बघ कोण पोरगं आहे गं ?”.

आक्काचा आवाज ऐकून गीतांजली देवघरात धावत गेली. आक्काला हातानेच शांत हो असा इशारा केला. तिथेच तिने हलक्या आवाजात आजी-आजोबा, इशान बद्दल थोडक्यात सांगितले.

ते ऐकल्यावर आक्काच्या मनात इशानबद्दल प्रेम आणि करुणा दाटून आली. आक्का गीतांजलीला म्हणाली, “ जा...तिथे लपाछपीमध्ये कुठेतरी लागून घेईन पोर... त्याला हुडकून आण...”

गीतांजलीने इशानला जवळ बोलवले पण तो आला नाही. मग तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचे फुल तोडून आणले. लडीवाळ शब्दांनी त्याला पुन्हा बोलावले. इशानला सगळयाच गोष्टी नव्या असल्याने तो गीतांजलीकडे बिचकत का होईना आला.

सनिक दादाने सर्व मंडळींना माडीवर जाऊन आराम करायला सांगितले. जेवण करुन सगळे आपापल्या दिशेने परत जाणार होते. त्यावर आता जोरदार चर्चा सुरु होती. सर्वांनाच आपल्या घरची ओढ लागली होती. सुरज

मात्र एक रात्र वाडयात राहण्यासाठी सगळ्यांच मन वळवण्याचा प्रयत्न होता.

“सनिक दादा, आपण आलोच आहोत तर उद्या निघुयात ना... तसाही अंधार झाला की कधी इथले दिवे जातात. उगाच अंधारात पुन्हा काही चुकामुक व्हायला नको. काय वाटतं सगळ्यांना...?” - सुरज

सनिक दादा काही बोलायच्या आधीच गीतांजली म्हणाली, "दादा आलाच आहात तर राहा की एक दिवस, मी ही वाड्यात एकटीच असते. निदान एक दिवसाची सोबत होईल. राहा ना माझ्यासाठी. "

शेवटी व्हायचं तेच झालं. सनिक दादा गीतांजली पुढे काहीच बोलू शकला नाही. न बोलताच त्याने डोळ्याने संमती दर्शविली. सर्वांना कुठे तरी सुरजचा हा निर्णय आवडला होता. सुरजला मोठे युद्ध जिंकल्यासारखे वाटत होते. पण सोबत आलेले आजी आजोबा मात्र संकोचित वाटत होते. आजोबांनी हलक्या आवाजातच त्यांना सांगितले, “आपण निघू लवकर... जेवण झालं की..." त्यावर विवेक म्हणाला, “तुम्ही का काळजी करता आजोबा? कुठेही जायची घाई करु नका. गीतांजली पण तुमच्या मुलीसारखीच ना.. राहा की मग एक दिवस...”

“हो... हो... इतक्यात एकटे निघू नका तुम्ही, ते पण लहान मुलाला सोबत घेऊन... थांबा आजच्या दिवस... मी अजून भेटले पण नाही इशानला आणि तुम्ही निघायची तयारी करताय. मी त्याला भेटून येते, तो इशा आणि सोमेश सोबत खेळतोय वाटतं... आलेच मी.” आजी आजोबांना थांबायचा आग्रह करून गीतांजली तिथून अंगणात निघून गेली.

एकीकडे सुरज सनिक दादाचा फोन वाजण्याची वाट पाहत होता. त्याचं खरंतर सर्व लक्ष त्यावरच होतं. आक्काने मग जेवणाची तयारी करायला घेतली. संकोचून बसलेल्या आजीला त्यांनी बोलते केले. दोघींनी मिळून स्वादिष्ट स्वयंपाक केला होता. शेवयांची खीर, आमटी, मसाले भात, रायता, बटाट्याची भाजी आणि जोडीला थंडगार ताक. जेवणाचा घमघमाट वाड्याच्या कानाकोपऱ्यात नुसता दरवळत होता.

इशानला भेटायला गेलेली गीतांजली तासाभर उलटून गेला तरी परतलेली नव्हती. इशानलाही तिचा लगेच लळा लागला होता. त्या दोघांची आता चांगली गट्टी जमली होती.

आक्का स्वयंपाक घरातून त्यांचा खेळ आणि मस्ती पाहून खरं तर भावनिक झाली होती. हा क्षण ती डोळ्यात साठवत होती. आक्काने सोमेश आणि इशाला आत स्वयंपाक घरात बोलावले. स्वयंपाकाच्या घमघमाटाने दोघांच्याही पोटातली भूक खवळली.

“बघा आता...एक एक भांडं उचलून सावकाश बाहेर न्या. ताटं, वाट्या घेऊन व्यवस्थित बैठक घालून बसा आणि हे त्यात वाढा. आम्ही येतोच... गीतांजलीला पण मदतीला घ्या.

“हो आक्का... हे काय विचारायचे.... बघ आता करतोच सगळं अगदी तू सांगितलं तसं...” असं म्हणून दोघे बाहेर आले आणि सगळ्यांना जेवणासाठी बोलावले.