Sunday, 31 March 2024

प्रवासातली गोष्ट : ५


पाऊस पूर्णपणे थांबला होता. ढगांनी ढोल वाजवणे आता बंद केले होते. पानांआड लपलेले पक्षी बाहेर येऊन पंखाची फडफड करुन स्वत:ला निथळवत होते. झाडांच्या पानावर साठलेले पाणी टपटप जमिनीवर पडत होते. गावातील लहान मुले घराबाहेर येण्यासाठी धडपड करत होती. काही द्वाड मुलं साठलेल्या पाण्याच्या डबक्यात उड्या मारुन खेळत होती. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होती.

एकजण तर सर्वांना झाडाखाली बोलवत होता.

“या रे या इकडे...” झाडाखाली मुले येताच तो झाड हलवून चिंब भिजवत होता.

स्वच्छंदी फुलपाखरासारखी ही निरागस मुले निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त हुंदडत होती. कुणी खिडकी उघडून बाहेर पाहत होते, तर कुणी बाहेर येऊन आकाश न्याहाळत होते. आकाश अगदी लख्ख निरभ्र झालं होतं. सगळीकडे सोनेरी ऊन पसरले होते. खरंच...आल्हाददायक वातावरण झाले होते. माणसांची रहदारी सुरु झाली होती.

पण...गीतांजली जागेवरुन अजूनही हलली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसत होती. ती कुठल्याशा विचारात बुडालेली होती. अंगणातील नयनरम्य परिसरात कधी झोपाळ्याकडे तर कधी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्याकडे ती पाहत होती. आजूबाजूला काय चालले आहे याचे तिला भान नव्हते. ती आपल्याच तंद्रीत, विचारांच्या चक्रव्युहात गुंतली होती.

“काय विचार करत असेल ती...?”

या प्रश्नाने मला भंडावून सोडले होते. तिच्या अशा वागण्याचे काहीतरी रहस्य असावे, हे मात्र मला पक्के जाणवले होते. ते शोधण्यासाठी मी आटापिटा सुरु केला. पण काही कळायला मार्ग नव्हता. गीतांजली अजूनही आत आलेली नाही हा मोका साधून सुरज सर्वांच्या नकळत चोर पावलांनी गीतांजलीच्या खोलीकडे आला.

गीतांजलीची खोली बंद का असते? काय आहे त्या खोलीत? आम्हाला का दाखवत नाही? या आणि अशा प्रश्नांनी माझ्यासारखाच सुरज ही गांगरुन गेला होता. त्यामुळेच की काय तो तिच्या खोलीजवळ येऊन दरवाजाच्या फटीतून आत पाहण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता.

इतक्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. कोण असेल म्हणून तो घाबरुन मागे वळून बघतो तर सम्या...

“काय...रे, सुरज... काय पाहत होतास? आम्हाला पण सांग.”

 “तुला नसत्या चांभार चौकश्या पडलेल्या असतात...”, सम्या म्हणाला व त्याच्याकडे पाहत राहिला. तिकडे अंगणात गीतांजली भानावर आली. ती आपल्या खोलीकडे निघाली. तिच्या हाताला चिखल माती लागली होती. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळत होते. ते पुसत पुसत ती खोलीपाशी आली.

गीतांजलीने खोलीजवळ आल्यावर दोघांना खोलीसमोर पाहिले. तिला ते आवडले नाही. ती वाघिणीसारखी त्यांच्यावर ओरडली. त्यांना उद्देशून म्हणाली, “इथं काय गठूडं हाय काय...? अजिबात माझ्या खोलीकडं कुणीबी फिरकायचं नाय..” गीतांजलीच्या या वाक्यानेच सुरज व सम्याने खजील होऊन ब्र ही न काढता तेथून काढता पाय घेतला. मी मात्र गीतांजलीला नखशिकांत न्याहाळत होते. तिच्या अंतरंगात डोकावण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. तिच्या बारीक सारीक गोष्टींकडे आवर्जुन लक्ष देत होते.

तेवढयात तिने गडबडीने दरवाजा उघडला आणि आत जाऊन पटकन आतून बंदही करुन घेतला. खोलीची खिडकी थोडी उघडी असल्याने मी खोलीतील थोड फार पाहू शकत होते. खोली आकाराने मोठी होती, त्या मानाने त्या खोलीत वस्तू मात्र कमी होत्या. खोलीच्या मधोमध लटकवलेले सुंदर चिमणीचे झुंबर लक्ष वेधून घेत होते. एका छोट्याशा रॅकमध्ये अनेक वेगवेगळी पुस्तके व्यवस्थित मांडलेली होती. जशी ग्रंथालयात ठेवलेली असतात ना... अगदी तशीच. त्या शेजारीच एक कपाट लावलेले होते. त्यावर पडदा होता. यावरुन तिचा टापटीप व व्यवस्थितपणा जाणवत होता. तिची खोली पाहून लक्षात येत होते की, जशा तिच्या अंतरंगातील भावना बंदिस्त आहेत तशाच तिथल्या सर्व वस्तू देखील बंदिस्तच होत्या. हे सगळे न्याहाळताना माझी नजर गीतांजलीकडे गेली तेव्हा ती काहीतरी शोधत होती. कुठलीशी वस्तू सापडत नाही म्हणून ती पुस्तके इतस्त: टाकत होती, मध्येच कपाळाला हात लावून बसत होती. अगदी केविलवाणी होऊन त्या वस्तूचा शोध घेत होती. तिच्या चेहऱ्यावरचे चिंताग्रस्त भाव स्पष्टच उठून दिसत होते. मी तिला पाहत आहे हे कदाचित तिला समजलं नसावं. ती वस्तू सापडत नाही म्हणून शेवटी वैतागून ती खुर्चीत बसली व टेबलावर ठेवलेला टेपरेकॉर्डर चालू करुन गाणी ऐकू लागली. मला गाण्याचे बोल स्पष्ट ऐकू येत नसले तरी संगीताची धुन ऐकू येत होती. गाणे ऐकता ऐकता एकदम ताडकन उठून ती कपाटाकडे गेली. तिने एक स्कार्फ कपाटातून काढला. त्या हिरव्या रंगाच्या स्कार्फला ती लहान बाळासारखं गोंजारत होती. बहूतेक तिला हिरवा रंग आवडत असावा. तिने तो बाजूला ठेवला. कपाटातून एक पुस्तक तिने काढले आणि उघडले. तिला जे हवं होतं ते बहूदा मिळालं असाव असे वाटले. अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी तिला दुरून पाहत होते, पण ते कोणते पुस्तक आहे हे मला दिसलं नाही. गीतांजलीच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळत होत्या. ती खूप खुश दिसत होती. जणू काही एव्हरेस्ट शिखरच गाठलंय...! इतका आनंद तिच्या चेहऱ्यावर खुलला होता. ती खूप सुंदर दिसायला लागली होती. बाकी पुस्तके रॅकमध्ये आणि हे पुस्तक कपाटामध्ये... असं का? आणि या खोलीमध्ये आणखीन कोणकोणत्या वस्तू ठेवल्या आहेत ? काय आहे या पुस्तकात? त्या मिळालेल्या वस्तूत काय रहस्य आहे? हे प्रश्न देखील मला सतावू लागले होते.

बराच वेळाने सापडलेले ते पुस्तक उराशी घेऊन बसलेली गीतांजली अचानक उठली आणि बाहेर आली. दरवाजा बंद करुन आक्काकडे जायला निघाली.

तेव्हा सुरज, सम्या, विवेक आणि मंडळी तिला एकमेकांत काहीतरी खुसूर-पुसूर करताना दिसले. सगळ्यांच्या तोंडी वादळासारखी ती च एक चर्चा रंगली होती. इतक्यात आक्काची हाक ऐकू आली,

“ये पोरांनो, या जरा इकडं... चिंच घालून ओली भेळ बनवली आहे, येतांना गीतांजलीलाबी बोलवा...”

आम्ही सर्वजण भेळ खाण्यासाठी एकत्र येऊन बसलो. तेवढ्यात विवेक आक्काला म्हणाला,

“आहो आक्काऽऽऽ किती करता आमच्यासाठी...?”

“अरे पोरांनो तुम्ही आमचे पाहुणे ना! अतिथी देवो भव: हिच आपली संस्कृती...”, आक्का म्हणली.

“पण काही म्हणा, आक्काच्या हाताला खूप छान चव आहे.”, विवेकने आक्काचे कौतुक केल्यावर आक्का मनोमन खुश झाली.

“अरे त्या गीतांजलीला बोलवा इकडे”, आक्का म्हणाली. तेव्हा सुरजची चौकस बुद्धी त्याला शांत बसू देत नव्हती. आक्काला काहीतरी माहिती असणार या आशेने तो आक्काकडे तिच्याबद्दल चौकशी करु लागला.

“आक्का.... मला सांगा ही गीतांजली अशी का वागते? काय झालंय तिला? मला खूपच प्रश्न पडतात तिच्या बाबतीत. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे दयाल का... दयाल ना आक्का..?” सुरज आक्काला खोदून खोदून गीतांजली बद्दल विचारत होता.

“कसली प्रश्नं उत्तरं...? काही नाही रं... नेहमीच हाय ते... राहू दे.... .” असं म्हणून आक्काने त्याच्या बोलण्याकडे अक्षरश: दुर्लक्ष केले व ती स्वयंपाक घरात निघून गेली. पण आमच्या डोक्यात मात्र प्रश्नांचे काहूर माजले होते. आम्हाला तिचे लपवलेले ते पुस्तक पाहण्याची खुप आतुरता लागून राहिली होती.


Thursday, 28 March 2024

प्रवासातली गोष्ट : ४



त्या रात्री माझं गीतांजली वरचं लक्ष काही केल्या हटत नव्हतं. गीतांजली बद्दलचं कुतूहल वाढत चाललं होतं. एका क्षणी तिच्याशी आपलं फार पुर्वीपासूनचं काही नातं असावं असं वाटायचं. तर पुढच्याच क्षणी तिचं सगळं अनाकलनीय होतं.

वाडा, गाव परिसर जितका रम्य भावला त्याहीपेक्षा रमणीय, रहस्यमय मला गीतांजली वाटली. नावाप्रमाणेच सुरेल व्यक्ती. तिचं चालणं, बोलणं, वागणं, उठणं-बसणं... सारंच स्मरणीय. एखाद्या प्रियकराने प्रेयसीची स्तुती करावी अगदी तशी.... एखाद्या कवितेसारखी, गुढ अर्थानं भरलेली. पण ओळखीच्या शब्दांनी ओथंबून वाहणारी. स्वच्छंदी खळाळती नदी. डोंगर, दगड पार करत इथं या वाड्याला येऊन मिळालेली ही वेगवेगळया भावनांची पोतडी...कशी असेल ही खरी? या विचारांनी माझ्या डोक्यात पिंगा घालायला सुरुवात केली होती. त्याच विचारात कधी डोळा लागला तेही मला समजलं नाही.

इकडे गीतांजली तिच्या खोलीच्या खिडकीतून चांदणं न्याहाळत बसलेली होती. तसा तिचा हा नेहमीचा आणि आवडता छंद. बाहेर खळाळून हसणारी गीतांजली तिच्या खोलीत मात्र अंतर्मुख होऊन जात असे. तिच्या मनात कसलीतरी उदासी दाटलेली असायची. त्या उदासीला गीतांजलीने कधीच कुणाला कळू दिले नाही. किंबहूना कुणाला तिची उदासी जाणवलीही नसावी. मनातील गलबत ती खोलीतच सोडून इतरांमध्ये मिसळत असे. तसं पाहिलं तर गीतांजली घरातल्या सदस्यां व्यतीरिक्त इतरांमध्ये कधी मिसळलीच नव्हती. क्वचितच ती वाड्याबाहेर पडत असे. आक्का तिच्याबद्दल सांगताना भारावून जाताना मी पाहिले. अनामिक अशा क्षणांची वाट पाहत तिचा नेहमीच दिवस सुरु व्हायचा आणि तसाच संपायचा. चांदणं न्याहाळत तिचा डोळा कधी लागत ते तिलाही कळत नसे. तशीच ती त्या दिवशी सुद्धा झोपली.

पाखरांच्या किलबिलाटाने सकाळी सगळ्यांना जाग आली. पुर्वेला भगव्या- लाल- पिवळया रंगांची उधळण सुरु होती. त्यात गायीचं गोठ्यातलं हंबरणं, तिने तिच्या पाडसाला चाटणं, धार काढण्यासाठी चाललेली आक्काची लगबग... अहाहा...!!! या मस्त वातावरणात सकाळी सगळ्यांची आन्हिकं उरकली.

“पोरांनो, चला नाष्टा करुन घ्या. आजचा खमंग बेत बघायला या...” आक्काच्या या हाकेनं वाड्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेलो आम्ही मधल्या पडवीत अगदी शहाण्या बाळासारखं जमा झालो.

“अरे व्वा! थालीपीठं!!! यम्मी, त्यावर विरघळणारा लोण्याचा गोळा...”

“क्या बात है। “

“मी तर चार घेणार”

“मग आम्ही काय तुझ्या तोंडाकडे नुसतं पाहत राहायचं का सोमेश...?”

“आरं थांबा पोरांनो! इतकं हातघाईला येऊ नका.

सगळ्यांना मन आणि पोट भरुन थालीपीठं खाता येतील...”

“ देअर यु आर...” म्हणत सनिक दादाने आक्काला मायेनं मिठी मारली.

“पुरं झालं आता... बस... बस...”, असं म्हणत आक्कानं त्याच्या डोक्यावरुन आणि तोंडावरुन हात फिरवला. थालीपीठ जीभेवरुन कधी आणि किती पोटात उतरत होतं ते कळतही नव्हतं. पोट भरलं पण मन मात्र गीतांजलीला शोधत होतं. ती, तिची खोली, त्या खोलीचा दरवाजा माझ्यासाठी एक रहस्य बनलं होतं.

“उघडली असती तिनं खोली तर एवढं काय बिघडलं असतं...?” या विचारांनी मन खट्टू झालं. बाकीचे सर्वजण पेटपूजा करुन पुन्हा मिळेल त्या जागी पहुडले होते. बाहेर उन्हाचा कहर किंचित वाढला होता. तशातही बाहेर वाहणारी हलकी वाऱ्याची झुळूक मन उल्हासीत करुन जात होती. गीतांजलीने नेहमीप्रमाणे आक्काला तिच्या कामात मदत करुन आपला फुरसतीचा वेळ स्वत:साठी राखून ठेवला होता. तशातच उन्हाची जागा अचानक काळ्या सावळ्या ढगांच्या सावलीने घेतली. वाऱ्याची झुळूक अधिक थंड होत गेली. आणि अचानक पाऊस पडला. अनपेक्षित पाण्याच्या तुषारांनी अंगणभर सडा मारायला सुरूवात केली. तापलेल्या मातीचा सुगंध मन तृप्त करुन जात होता.

“सन्याऽऽऽ बाहेर बघ कसलं मस्त एकदम रोमँटीक वातावरण झालं आहे...!” विवेक सनिक दादाला मोठ्याने आवाज देत दादाजवळ आला.

 “आताच तर कडक ऊन होतं... अचानक कसं बदललं...!”

“हो, ना... आत्ता बघ कसं अचानक सगळं बदललं आहे.”

नाही नाही म्हणत सगळं टोळकं अंगणात उड्या मारत आलं. गीतांजली सुद्धा आली. जितक्या पटकन आणि नकळत बाहेरचे वातावरण बदलले तेवढ्याच वेगानं तिच्या चेहऱ्यावरचा नितळ, शांत, मनस्वी भाव सरसर बदलत गेले. अंगणातील तुळशी वृंदावन, मोगरा, चाफा जणू त्या तुषार सिंचनाने पुन्हा मोहरुन आणि बहरुन आले होते. गुलाबाच्या पाकळ्यांवर मोत्यांची झालेली पाखरण मन वेधून घेत होती. माझं मन त्या सगळ्या नजाऱ्याने पुलकित होत होते. गीतांजलीच्या चेहऱ्यावर मात्र खंत पसरलेली दिसत होती. इतक्या नयनरम्य वातावरणातही काहीतरी कमी असल्यासारखी तिची नजर शोध घेत होती. तिच्या बद्दलच्या कुतूहलात तिची ती भिरभिरी नजर अधिकच प्रश्नांची भर टाकत होती. त्या पावसात आम्ही सगळे तना- मनाने चिंब होऊन गेलो होतो. हे असं धुंद शहारुन टाकणारं वातावरण शहरात क्वचितच किंबहूना ते इतक्या सहज अनुभवता येत नसायचं. उलट भिंतीनं काटा आणणारं, वाहून नेणार असं चित्र स्वभाविकपणे समोर यायचं.

इतकं उल्हासित वातावरण असूनही गीतांजलीच्या चेहऱ्यावर ते समाधान, ती तृप्ती नव्हती. अपुर्णतेची चाहूल तिच्या प्रत्येक भावातून मला अस्वस्थ करत होती. तासाभरात पाऊसही थांबला होता. आता गरम गरम चहा भजीची फर्माईश होऊ लागली होती. सगळ्यांनी ओले कपडे बदलले. आक्काने आणि गणादादाने सगळ्यांसाठी गरमागरम चहा आणि कांद्याची खमंग भजी तयार केली. सर्वांनी त्यावर ताव मारला. पाऊस थांबून आता चांगला अर्धा पाऊण तास उलटला होता. गीतांजली आमच्यात नव्हती. ती अजूनही अंगणातच होती. अगदी एकटी. कुठंतरी हरवल्यासारखी... शुन्यात नजर लावून बसलेली. तिचं हे वागणं आक्का आणि घरच्यांसाठी परिचयाचं होतं. आम्ही मात्र तिच्या या रुपाला पाहून चाट पडलो.


Monday, 25 March 2024

प्रवासातली गोष्ट : ३

गीतांजली दिसायला लाघवी आणि सुंदर होती. तिच्या सौंदर्याची कल्पना आपण लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतल्या सिंड्रेलाशी निश्चितच करु शकतो. लांबूनच पाहून तिची भुरळ पडावी, अशी परिकथेतली ती परीच जणू... आम्हा मुलांमुलींचा घोळका पाहून ती भांबावली. जसे आम्ही त्या चिरेबंदी वाड्याजवळ गेलो तसा आतून आवाज आला, 

“ गीता... खाली ये, पाहुणे आलेत बाहेर..."
 गीतांजली... जणू टागोरांच्या शब्दात रेखाटलेली नायिका. आम्ही जसे आत गेलो तशी ती तिथून धावतच माजघरात गेली. लांब सडक काळे केस, उंच पुरी आणि पाणीदार काळेशार डोळे. गीतांजली मला ओझरतीच नजरेस पडली.
आम्ही वाड्यात आलो. आम्हा शहरी पाहुण्यांना वाड्याचे भव्य प्रवेशद्वार सुरवातीला नजरेतच भरत नव्हते. इथल्या एक एक विस्तीर्ण दालनाला पाहून त्यातील मायेने केलेली सजावट पाहून इथल्या लोकांची मने ही तशीच मोठी असावीत असा आम्ही वाड्याला आतून पाहिल्यावर अंदाज लावला. आयताकार व्हरांड्यात अगदी मधोमध नक्षीदार रांगोळीने सजवलेले मातीचे तुळशी वृंदावन, चहूदिशांनी प्रकाशीत करणाऱ्या चार पणत्या, शेजारी कौलारू सागवानी झोपाळा आणि वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचणारा स्वयंपाकाचा दरवळ.

जसे आमची टोळी वाड्यात शिरली, तसा तिथे इतका गलका उठला, अगदी बाजार भरल्याचे चित्र होते. मुंबईचे वादळ असं तिथल्या लोकांना वाटू शकते असा उत्साह होता.
वाडा तसा जुन्या बांधणीचा होता. इतिहासात वर्णन असते ना अगदी तसा... सुरूवातीच्या भव्यदिव्य सागवानी खांबांनी त्याला चांगलाच आधार दिला होता. शेजघरांतून येणारा आवाज आम्हाला तिथे खुणावत होता. प्रेमाने ओतप्रोत भरलेली इथल्या माणसांची बोली मनाला भिडण्यासाठी खरं तर बाकी कोणत्या माध्यमाची गरजच नव्हती. थोडे थांबून अनुभवण्याची गरज होती.

“आक्का.... ए आक्का...”, करत सनिक दादा आत गेला.
आवाज ऐकताच आक्का पदराला हात पुसतच बाहेर आल्या. आक्का म्हणजे गीतांजलीची आई. आईच्या व्याख्येमध्ये बसते ना अगदी तशी.... जशी दुधावरची साय, तशीच होती ही माय. आताच ओळख झाली असे कुणीही म्हणणार नाही अशी ती आम्हा सगळ्यांची विचारपुस करत होती.
नववारी साडीतली आक्का आणि तिची हाक आजही कानात ऐकू येते. सनिक दादाने आमची ओळखपरेड करून दिल्यावर त्यांनी लगेच जेवणाचा आग्रह सुरू केला.

“अरं पोरांनो लांबनं आला, दमला असाल, बसा की वाईस निवांत... परसदारी जाऊन हातपाय धुवा. मी तुमच्यासाठी गरमागरम भाकऱी आणि पिठलं टाकते चुलीवर.”

अंगणात मांडी घालून बसण्यापासून ते चमचा न वापरता तो घास तोंडात जाईपर्यंत सगळ्यांचाच भान हरपून जेवण्याचा तो क्षण. हे सगळे आम्ही एन्जॉय करत होतो.

आक्कांनी वाढलेल्या चुलीवरच्या गरमा गरम भाकऱ्या, त्यावरची साजूक तुपाची धार, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि खमंग पिठल्यावर सगळयांनीच मनसोक्त ताव मारला. तेवढ्यात आमच्यातला एक खवय्या रसिक बसल्या बसल्याच मोमोज, पिझ्झा सोबत तुलना करत त्या पिठल्याची आणि भाकरीची चवीचवीने तारीफ करू लागला.
 
“आक्का आमच्याकडे हे मोमोज डिश खूप फेमस आहे. सगळे क्रेझी होतात ते खाण्यासाठी... आक्का तुम्ही आमच्या कॅफेमध्ये का नाही येत एकदा, कोल्ड कॉफी सोबत या भाकरी आणि पिठल्याची जोडी चांगली जमेल... जस्ट टेल मी... आय विल डू इट फॉर यु... याचंही वेड लागेल लोकांना आक्का... हो ना?"

त्यावर आक्काने बॉक्समध्ये गपगुमान बसलेल्या मोमोज वर एक बारीक नजर फिरवली. तिला ते सुद्धा इंटरेस्टिंग वाटले आणि “ बरं दादया...आपण करु एक दिवस ” म्हणत गालातल्या गालात हसली.

या झणझणीत मेजवानीमुळे आमच्या सगळ्यांच्या तनामनात जोरदार उत्साह आला होता. जेवण सुरु होते तेव्हा गीतांजली फक्त लांबूनच आम्हाला पाहत होती. तिचा गोंधळलेला चेहरा अजूनही तसाच होता. मग न राहवून मी आक्काला म्हणाले,

 “ ही अशी लपते का मागे...? आम्ही पण तुमच्यासारखी माणसंच... परग्रहावरील एलियन नाही.... आक्का तिलाही बोलवा ना जेवायला...!”

 “ गीते... ये गं तू पण... बस अशी समोर ”
आक्काच्या एका हाकेतच ती समोर आली. आक्काने तिला बस म्हणताच, जशी ती बसली तशी तिची बडबड सुरु झाली. आमचं जेवण उरकेपर्यंत ती बडबड चालूच होती.
ही च का ती दहा मिनिटांपूर्वी पाहिलेली लाजरी, बुजरी, अबोल मुलगी ? आम्ही देखील बुचकळ्यात पडलो. 

गीतांजलीने तिला दोन मोठे भाऊ असल्याचे बोलण्याच्या ओघात सांगितलं. ते दोघेही शहरात असतात. थोरल्याचा संसार तिथेच आहे आणि धाकटा पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेला आहे. मोठा भाऊ महिन्याला पैसे पाठवून या दोघींचा सांभाळ करतो. दसरा-दिवाळी सणाला अधून-मधून धावती भेट असते. असा संवाद झाला.

जेवण झाल्यावर गीतांजलीने आम्हाला तिचा पूर्ण वाडा दाखवला. हॉरर सिनेमामध्ये जसे रंगवून रंगवून सांगतात ना... तसंच काहीसं. तिच्या वाड्याबद्दल तिने आम्हाला सांगितलं होतं.

ऐकता ऐकता सगळेच त्या युनिक वाड्याचे फोटो सेशन करण्यात गुंगले होते. आम्ही सर्वच गावाकडल्या त्या वातावरणात चांगलेच रुळू लागलो होतो.

सगळा वाडा फिरलो पण गीतांजलीची खोली तिने आम्हाला काही दाखवली नाही. हो... पण त्या खोलीचं दार मात्र खूप छान नक्षीदार, कलाकुसर करुन सजवलेलं होतं. नुसतं दार पाहूनच कोणालाही त्या खोलीत जाण्याचा मोह व्हावा असं काहीसं....

आमच्यातला आइनस्टाईनचा शिष्य... सुरज त्या खोलीला पाहून अशी काही चौकशी करायला लागला की, आता तिथे जाऊन नक्की काहीतरी नवीन शोधून काढणार....

"गीता तू दार खूप छान सजवलं आहेस गं... ही खोली तुझी का...? तुला आर्ट मध्ये आवड आहे ...? पण तू खोली बंद का ठेवली आहेस...? आपण जाऊ या ना आत...”

सुरजची प्रश्नांची सरबत्ती सुरुच होती. पण गीतांजली काही केल्या त्या खोली विषयी चकार शब्द काढत नव्हती आणि कुणाला तिथे जाऊ देखील देत नव्हती. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे रंग सरसर बदलताना मी पाहिले. शेवटी न राहवून गीतांजलीची खोली बघण्याच्या सुरजच्या उत्सुकतेला मी लगाम घातला.

“अरे व्वा... तुमच्या घरामागे केवढी मोठी जागा आहे. इथे आपण रात्री कॅम्प फायर करु शकतो... नाही का सनिक दादा...? चला सगळे तिथेच जाऊन बसू थोडा वेळ.” मी बोलत बोलतच अंगणात आले. वाडा पाहून झाल्यावर सर्वजण अंगणात बस्तान मांडून बसले. गप्पांची मैफिल रंगली. गीतांजलीच्या मधूर आवाजाने तेव्हा वेगळीच गाण्याची समा बांधली गेली.

छोटे मोठे गेम खेळता खेळता रात्रीचे अकरा साडेअकरा झाले, तरीही कुणी जागचे हलत नव्हते. लुकलुकत्या चांदण्यांत त्या दिवशीची रात्र जागवण्याचा जणू सगळ्यांनी चंग बांधला होता.


Wednesday, 20 March 2024

प्रवासातली गोष्ट : २




कल्पनेत रमणारी गीतांजली आजही ती डायरी वाचताना तशीच वाड्यातल्या दरवाजाआडून बाहेर पाहताना दिसली. तशीच अगदी शांत आणि निर्विकार. अंगणात कुठेतरी हरवलेले, काहीतरी शोधताना आणि मग ते मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर असायचा.

तेव्हा तिला पाहत आम्ही तिथेच अंगणात उभे होतो. तिथे नेहमीच तिचा वावर असायचा. तिचे आभासी अस्तित्व तिथल्या भिंतींनाही ओळखीचे होते. वाड्यातील जीर्ण काही कोपरे अजूनही मनात कुतूहल निर्माण करत होते. आजही ती तिथेच आहे. तिचे तिथले अस्तित्व गुलमोहराच्या बहरलेल्या फांदीसारखेच आजही तिथे झुलते, फुलते आणि बहरते.  ते झाड ही आता छान फुलून आलेले होते. किती लहान असल्यापासून तिने त्याला लळा लावला होता. तिचा तो 

आनंद आम्ही जवळून पाहिलेला होता.
निसर्ग हा विलक्षण भाव-भावनांचा निर्माता आहे. बऱ्याचदा कोसळणाऱ्या सरीतून आनंद, सौख्य आणि सौंदर्याचं लेणं बरसत असते. आपण चिंब न्हाऊन निघतो. तर कधी पानगळीच्या रखरखत्या उन्हात ग्रीष्म समोर येतो. सुख-दुःखाचे चक्र पार गळून पडते आणि कधी गुलाबी थंडीत प्रेमाची, मायेची दुलई आपसूक मने जोडू पाहते.  ही किमया निरंतर घडतच असते, आपल्याही नकळत. त्यात निसर्गाच्या आणि आपल्या भावना कधी समांतर व्हायला लागतात ते देखील कळत नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या आजुबाजूच्या गोष्टींचा किमयागार दुसरा तिसरा कुणी नसून निसर्गच असतो.

आयुष्याच्या प्रवासात जसे बरेच वाटसरु भेटतात, विविध थांबे लागतात... तशीच ही सगळी मंडळी प्रवासात भेटली होती. काही अचानक प्रवासात भेटलेले अज्ञात वाटसरु, काही सहप्रवासी आणि काही थांबे. आणि शेरवलीच्या वाड्यात भेटलेली गीतांजलीची गोष्ट किंवा पुन्हा नव्याने फुललेल्या गुलमोहराचीही गोष्ट.

मी पुन्हा त्या वाड्यात आले होते. बऱ्याच वर्षांनी पुन्हा ते अंगण तो वाडा पाहिला. तिथेच ती डायरी माझ्या हाती लागली आणि तो सगळा प्रवास जसाचा तसा पुन्हा आठवला.

काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट, ठरवलेल्या प्रवासात काही घटना अनपेक्षीत घडत गेल्या. आम्ही सहा ते सात जण या ट्रिपसाठी दोन दिवस आधीच तयारीला लागलो होतो. प्रवास म्हटलं की उत्साह अगदीच वरच्या पट्टीचा असतो आणि तो ही जर आपल्याच नटखट मित्र-मंडळींसोबत असेल तर कल्पनाच करायला नको. चार-पाच दिवसांचे नियोजन व्यवस्थित झाले होते आणि एकदाचा आमचा तो प्रवास सुरु झाला.

मला ती डायरी वाचायला गीतांजलीने दिली होती. कदाचित तिचे गुलमोहराचे गुपित माझ्याकडे तिला सोपवायचे होते. ते माझ्याकडे अजूनही सुरक्षित होते. आज ती डायरी पुन्हा वाचताना ती लगेच डोळ्यासमोर येऊन गेली... “ गीतांजली..."

Saturday, 16 March 2024

प्रवासातली गोष्ट : १

( सदर दीर्घ कथा तीन मैत्रिणीनी लिहिलेली आहे. जुईली अतितकर, प्रणिता आंबरे आणि सुवर्णा कांबळे यांनी लिहिलेल्या या कथेचे भाग आपणास आवडतील ही आशा )



१. प्रवासातली गोष्ट 


कल्पनेत रमणारी गीतांजली आजही ती डायरी वाचताना तशीच वाड्यातल्या दरवाजाआडून बाहेर पाहताना दिसली. तशीच अगदी शांत आणि निर्विकार. अंगणात कुठेतरी हरवलेले, काहीतरी शोधताना आणि मग ते मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर असायचा.

तेव्हा तिला पाहत आम्ही तिथेच अंगणात उभे होतो. तिथे नेहमीच तिचा वावर असायचा. तिचे आभासी अस्तित्व तिथल्या भिंतींनाही ओळखीचे होते. वाड्यातील जीर्ण काही कोपरे अजूनही मनात कुतूहल निर्माण करत होते. आजही ती तिथेच आहे. तिचे तिथले अस्तित्व गुलमोहराच्या बहरलेल्या फांदीसारखेच आजही तिथे झुलते, फुलते आणि बहरते.  ते झाड ही आता छान फुलून आलेले होते. किती लहान असल्यापासून तिने त्याला लळा लावला होता. तिचा तो आनंद आम्ही जवळून पाहिलेला होता.

निसर्ग हा विलक्षण भाव-भावनांचा निर्माता आहे. बऱ्याचदा कोसळणाऱ्या सरीतून आनंद, सौख्य आणि सौंदर्याचं लेणं बरसत असते. आपण चिंब न्हाऊन निघतो. तर कधी पानगळीच्या रखरखत्या उन्हात ग्रीष्म समोर येतो. सुख-दुःखाचे चक्र पार गळून पडते आणि कधी गुलाबी थंडीत प्रेमाची, मायेची दुलई आपसूक मने जोडू पाहते.  ही किमया निरंतर घडतच असते, आपल्याही नकळत. त्यात निसर्गाच्या आणि आपल्या भावना कधी समांतर व्हायला लागतात ते देखील कळत नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या आजुबाजूच्या गोष्टींचा किमयागार दुसरा तिसरा कुणी नसून निसर्गच असतो.

आयुष्याच्या प्रवासात जसे बरेच वाटसरु भेटतात, विविध थांबे लागतात... तशीच ही सगळी मंडळी प्रवासात भेटली होती. काही अचानक प्रवासात भेटलेले अज्ञात वाटसरु, काही सहप्रवासी आणि काही थांबे. आणि शेरवलीच्या वाड्यात भेटलेली गीतांजलीची गोष्ट किंवा पुन्हा नव्याने फुललेल्या गुलमोहराचीही गोष्ट.

मी पुन्हा त्या वाड्यात आले होते. बऱ्याच वर्षांनी पुन्हा ते अंगण तो वाडा पाहिला. तिथेच ती डायरी माझ्या हाती लागली आणि तो सगळा प्रवास जसाचा तसा पुन्हा आठवला.

काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट, ठरवलेल्या प्रवासात काही घटना अनपेक्षीत घडत गेल्या. आम्ही सहा ते सात जण या ट्रिपसाठी दोन दिवस आधीच तयारीला लागलो होतो. प्रवास म्हटलं की उत्साह अगदीच वरच्या पट्टीचा असतो आणि तो ही जर आपल्याच नटखट मित्र-मंडळींसोबत असेल तर कल्पनाच करायला नको. चार-पाच दिवसांचे नियोजन व्यवस्थित झाले होते आणि एकदाचा आमचा तो प्रवास सुरु झाला.

मला ती डायरी वाचायला गीतांजलीने दिली होती. कदाचित तिचे गुलमोहराचे गुपित माझ्याकडे तिला सोपवायचे होते. ते माझ्याकडे अजूनही सुरक्षित होते. आज ती डायरी पुन्हा वाचताना ती लगेच डोळ्यासमोर येऊन गेली... “ गीतांजली..."