' फुललेला गुलमोहर - एक गुपित ' कथेची सुरुवात करताना ती कथा माझी न राहता त्यात माझ्या सखींच्या भावना त्यांच्या शब्दात उतरत जाव्या. ही एक इच्छा समोर ठेवून कथेला सुरवात झाली. सुरवातीपासून ती कथा फक्त एक विचार समोर न आणता वेगवेगळे विचार आणि कल्पना विश्व रंगवत गेली. तिच्या भाव विश्वाचे चित्रण विविध अंगाने साकारता आले. आपल्यातल्या प्रत्येकाला ती कथा माझी होऊन पानावर उतरत गेली. कथेतील मुख्य नायिका " गीतांजली " गुलमोहराप्रमाणे बहरत गेली. अर्थात हे शक्य झाले ते माझ्या सोबतच्या सह लेखिका सौ प्रणिता आंबरे आणि सौ. सुवर्णा कांबळे यांची साथ घेऊनच. त्यामुळेच कथेचे श्रेय माझ्या इतकेच जोडल्या गेलेल्या या माझ्या सख्यांचे ही तितकेच आहे.
कथा लिहिताना ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तर ती वाचकांना घेऊन प्रवास करते. कथानकासोबत आपण गाडीच्या प्रवासात, रेस्टहाऊस मध्ये, क्लिनिकच्या जवळपास, आक्काच्या वाड्यात, अंगणात, बागेत पोहोचत जातो. कथेतले सगळे पात्र आणि कथेची नायिका लिहिताना वेगवेगळी रूपके वापरून शब्दात मांडताना कथा आणखी जिंवत होत जाते.
कथेची सुरवात एका प्रवासाने झाली. हा प्रवास पुढे नव्या वळणावर, नव्या प्रसंगात घेऊन गेला. नव्या नात्यांची ओळख करून दिली. नवा दृष्टीकोन देत कथा पुढे सरकत गेली. काही प्रसंग लिहिताना मनात द्वंद्व निर्माण झाले ही; पण ती कथा आपल्यातील प्रत्येकाची आहे, कथेतील पात्र कुठे ना कुठे भेटत गेले तशी कथा साकारत गेली.
या कथेचे सह लेखिका सौ. प्रणिता आंबरे यांच्या सोबत कथानक लिहिताना प्रसंगाला तटस्थ पणे पाहून कथा पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी सहकार्य मिळाले. शब्दांची अचूक पणे बांधणी झाली. कथेला विषय आणि आशय दोन्ही जोडून लिहिताना मांडणी व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्याचे मार्गदर्शन प्रणिता ताईच्या लिखाणात वाचताना जाणवले. कथेचा भाग पूर्ण होताच त्याची थोडक्यात झलक भागाच्या शीर्षकात जाणवते. आणि शीर्षक ठरवताना त्या संबंधी वाचन, निकष ठरवताना ताईची मदत झाली. सहनियोजन करत करत कथेला मूर्त स्वरूप मिळाले.
कथेला ग्रामीण पार्श्वभूमी देताना आक्काच्या वाड्यातील प्रसंग काल्पनिक विश्वातून बाहेर आणतात आणि वास्तवात समोर उभे राहतात. ही ग्रामीण बाजाची लेखणी या कथेला सौ. सुवर्णा कांबळे यांच्या शब्दांतून मिळाली. ग्रामीण जीवन आणि ग्रामीण स्त्री चे भाव विश्व, तिची विचार सरणी मांडताना सौ सुवर्णा कांबळे यांनी जी सहजता वापरली आहे. ती पात्रांना आपल्या आणखी जवळ आणते. विषयाला जोडून आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगाचे चित्रण करणे. वातावरण निर्मिती आणि सर्व सामान्य माणसाचा शोध घेत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही बाजूने मांडणी करण्यात सौ.सुवर्णा यांनी योगदान दिले.
ज्याप्रमाणे ही कथा लिहिताना आमची होऊन लिहिली गेली आणि त्या कथेला तितकीच सुरेख प्रवासाची किनार मिळाली. तशीच किनार कथा पुस्तक रुपात समोर येताना प्रत्येकाला आपली वाटून वाचकांच्या पसंतीस उतरावी हीच इच्छा.
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment