सर्वजण जेवायला सुरवात करणार तितक्यात सनिक दादाचा फोन वाजला. सनिक दादाने तो उचलायच्या आधीच सुरजने त्यावर झडप घातली.
“ मी उचलतो थांब ”
“हॅलोऽऽऽ मी सुयश...” पलीकडून आवाज आला आणि सुयशचा आवाज ऐकून सुरजचा जीव भांड्यात पडला.
“अरे होऽऽऽ मी सुरज बोलतोय. किती वेळ लागतोय तुम्हाला पोहोचायला? आता कुठे आहात? आणि ड्रायव्हर काका आहेत ना व्यवस्थित?”
सुरज थोड्या दबक्या आवाजातच बोलत होता. अजूनही सनिक दादाला सुरज नक्की कुणाशी बोलतोय हे समजले नव्हते. सनिक दादाने बसल्या जागेवरूनच सुरजला विचारले,
“सुरजऽऽऽ कुणाचा आहे रे फोन? जेवायला ये लवकर. आम्ही बसलो बघ... "
“हो...हो... आलोच... तुम्ही जेवण सुरु करा...” सुरजने गडबडून त्याला प्रत्युत्तर दिले.
इकडे सुयशला मात्र काहीच मागमूस लागत नव्हता. त्याने आता दहा मिनिटांत त्या शेरवली फाट्यापर्यंत पोहोचू एवढे फोनवर सांगितले.
“ सुयश आम्ही आताच पोहोचलो आणि जेवायला बसतोय... तू तिथे पोहोचलास की थोडे आत डावीकडे ये. पाच मिनिटांचा रस्ता आहे. मी तिथेच असेन. ”
सुरजच्या डोक्यात नक्की काय सुरु होते हे ना सुयशला समजत होते ना आम्हा कोणाला.
“हो...हो...” म्हणत त्याने फोन ठेवला. सुरज लगेच जेवायला बसला. सनिक दादाने पुन्हा फोनबद्दल विचारले तर तेव्हाही उडवाउडवीची उत्तरं देऊन तो गप्प बसला.
जेवणं झाली. सर्वजण अंगणात गोल करून बसले. आराम वगैरे कोणालाच करायची इच्छा नव्हती. बाहेरच्या बाजूला लागलेल्या कै-या पाहून त्या पाडण्याचा मोह कुणालाच आवरला नाही. त्यात इशानलाही सामील करुन घेतले.
सगळी मंडळी कैऱ्या पाडत असताना त्या गोंधळात इशान रस्त्याच्या पलीकडे कधी गेला कुणालाच समजले नाही. गीतांजलीनचे लक्ष गेले तेव्हा दुरून एक गाडी येत होती. तिने इशानकडे धाव घेतली आणि त्याला जवळ ओढले तोपर्यंत ती गाडी त्या दोघांना अगदी खेटून गेली.
लहान मुलाला बघून गाडीतून मोठ्याने हॉर्न वाजला आणि त्या आवाजाने घाबरुन इशान तिथेच रडायला लागला. ती गाडी सुयशचीच होती. सुयशने गाडी तिथेच थांबवली. गाडीतून उतरुन तो मागे आला. त्याला रडणारा मुलगा आणि गीतांजली दिसली. तीच आनंदी चेहऱ्याची... बोलक्या डोळ्यांची गीतांजली. सुरवातीला तिचे लक्ष इशानकडेच होते. त्याला कुठे लागले तर नाही ना हे ती पाहत होती.
तिने समोर पाहिले. समोर सुयश रस्त्याच्या मधोमध उभा होता. अगदी स्थिर आणि शांत... पुढे काहीच बोलणे झाले नाही. इशान गीतांजलीचा हात सोडून धावत रडत अंगणात आला. झाकोळून आलेलं आभाळ आता टपटप बरसायला लागलं होतं. त्या थेंबांमध्ये इशान भिजत होता. कैऱ्या पाडण्याचा कार्यक्रमही आटोपता घेण्यात आला. सम्या आणि विवेक झाडावर चढले होते, तेही खाली उतरले. इशानचा आवाज ऐकून सगळे मागच्या दारातून वाड्याबाहेर आले.
पाऊस बरसत होता. सुरजने सुयशला पाहीले आणि मिठी मारली, त्याचे आभार मानले. सुयशने गाडीजवळ जाऊन ड्रायव्हर काकांना बाहेर यायला सांगितले. त्यांच्या हातापायाला मलम पट्टी केलेली दिसत होती. सनिक दादाने ड्रायव्हर काकांना पाहिले. नक्की कुठे कुठे लागले हे बघता बघताच तो म्हणाला, “तुम्ही एकदा सांगितलं असतं तरी हे एवढं झालंच नसतं... बरे आहात ना काका?”
“पावसातच बोलणार आहात का सगळे... वाड्यात आजी आजोबा, आक्का सगळेच आहेत. त्यांना न सांगता आलो आहोत आपण.. चला... नाहीतर काळजी करतील ते..." सोमेश म्हणाला.
“हो...हो...” म्हणत इशानला घेऊन आम्ही निघालो. गीतांजली अजूनही मागेच उभी होती. जागची हलली सुद्धा नाही. सगळे पुढे गेले, सुयश तिथेच गाडी पार्क करुन आला. वाटेत थांबला, त्याने गीतांजलीच्या नाकापुढे एक चुटकी वाजवली तशी ती भानावर आली.
“क्लिनिकमधून निघायच्या आधी सांगायला हवं होतंस तू... अजून किती वर्ष मी एकट्याने त्या बागेतल्या गुलमोहराची काळजी घ्यायची?”
तिला रडू अनावर झाले. एव्हाना पाऊसही थांबला होता. तशी ती स्वत:ला सावरुन वाड्यात आली. सुयशला समोर पाहून आजी आजोबांना हायसे वाटले. त्याला अगदी आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी जेवणाचा आग्रह केला. जेवणं झाल्यावर आजींनी सुयश आणि गीतांजली दोघांना समोर बसवून सगळे खरे खरे सांगितले. सुयशच्या मनातली गीतांजलीची काळाआड गेलेली प्रतिमा पुन्हा स्पष्ट दिसू लागली. तिच्या बद्दलचे मनातले प्रेम आणि आदर आणखी वाढला. सुयशने सुरजच्या धाडसाचे सुद्धा कौतुक केले. त्यांच्यातली मैत्री खऱ्या अर्थाने आणखी दृढ झाली.
दिवस मावळतीला निघाला होता. सुयशला दवाखान्यात परत जाणे आवश्यक होते. परत जाण्यासाठी त्याने तयारी केली. पाऊस पडल्याने सगळे दिवे गेलेले होते. अंधाऱ्या रात्री बाहेर न पडणे योग्य होते. सुरजने पुन्हा आग्रहाने सुयशला थांबवून घेतले. दिवसभराची धावपळ सगळ्यांच्या अंगावर आली होती. त्यामुळे जेवणं आटोपल्यावर सगळे अंगणातच गप्पा मारता मारता तिथेच झोपले.
कथा आणि कथेत रमणार्या काल्पनिक जगात सुचलेल्या, आठवणीत राहिलेल्या कथा एकत्र करताना जमवलेल्या गाठोड्यातल्या काही कथा कहाण्या.
Sunday, 21 July 2024
प्रवासातली गोष्ट : २२
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
सुरजचं बोलण ऐकत सनिक दादाच्या मनात सुद्धा काकांच्या अचानक गायब होण्यावरून प्रश्न पडू लागले. तो सुरजच्या शेजारीच पाठ टेकून पडला होता....
-
सूर्य हळूहळू माथ्यावर येत होता. नुकताच सगळ्यांनी चटपटीत भेळीवर ताव मारला होता. जवळपास त्याचा फडशाच पडला आणि इतकी चविष्ट भेळ खाऊन झाल...
-
मी समोर असताना सुयश सांगत होता, “ गीतांजली सोज्वळ, शांत, अल्लड व खूप प्रेमळ मनाची होती. त्या बाहेर भेटलेल्या आजी आजोबांच्या मुल...
No comments:
Post a Comment