Thursday, 12 February 2026

प्रवासातली गोष्ट : २३

सुरजने तेव्हा सर्वांच्या नकळत ती डायरी सुयशच्या हातात दिली. रात्रभर सुयशने त्या डायरीतले प्रत्येक पान वाचून काढले. डायरी वाचून झाल्यावर त्याचे मन गीतांजलीच्या आठवणींनी भारून गेले. तिला भेटण्याची अनामिक ओढ त्याच्या मनाला लागली. पहाटेचा प्रहर सुरु झाला. सूर्याची कोवळी किरणे स्पर्श करत साखर झोपतून सर्वांना उठवत होती. सुयश रात्रभर जागाच होता त्यामुळे तो तडक उठला आणि गीतांजलीच्या खोलीत गेला. तिच्या डायरीतले गुपित त्याने वाचले हे तिला सांगण्यासाठी तो कासावीस झाला होता.  गीतांजली मात्र अजूनही गाढ झोपली होती.
शेवटी त्याने आक्काला गाठले आणि दोघे ही झोपाळ्यावर बसून गप्पा मारू लागले. आक्का पहाटेच उठून सडा रांगोळी देवपूजा करून निवांत बसली होती. सगळे उठल्यावर आक्का सर्वासाठी चहा करायला स्वयंपाक घरात गेली. सुयश एकटाच झोपाळ्यावर झुलत बसला होता. तेवढ्यात तिथे सुरज आला. त्याने सुयशला डायरीबद्दल विचारले. सुयशने होकारार्थी मान हलवली. तोपर्यत गीतांजली उठली होती. ती अंगणात फुलं काढण्यासाठी जाताना सुरजला दिसली होती. सुयशला त्याने अंगणात ती डायरी घेऊन जायला सांगितले. समोरच गीतांजली दिसली. तिचा चेहरा खुललेला होता. बऱ्याच दिवसांपासून त्या अंगणात लावलेल्या गुलमोहराच्या छोट्याशा खोडाला पुन्हा पालवी फुटली होती. हिरवी पोपटी कोवळी पाने बाहेर डोकावत होती. तिच्या अंगणातला गुलमोहर आता पुन्हा नव्याने फुलणार होता.
गीतांजली गुलमोहराच्या नव्या फुटलेल्या पालवीवरून हळूवार हात फिरवत असताना तिच्या मागून सुयश आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “शेवटी फुलला गुलमोहर... तो कदाचित माझी वाट बघत होता... माझ्या येण्याची आणि तुला पुन्हा भेटण्याची...!”
सगळे एव्हाना उठले होते.  सुयशने तिच्या समोर डायरी धरली. जेव्हा सुयशने ती डायरी वाचली आणि आपले गुपित त्याला कळले आहे हे गीतांजलीला समजले तेव्हा तिने माफी मागितली. काहीही न बोलता त्याने तिला मिठीत घेतले. तेव्हा तिथे कोणी ही नव्हते. गीतांजली आणि सुयश यांच्या प्रेमाचा साक्षीदार गुलमोहर फक्त तिकडे होता.
सगळ्यांचे आवरून झाले होते. चहा नाश्ता झाल्यावर आमची निघायची तयारी सुरु झाली होती. आक्काने सुरज आणि सगळ्यांनाचीच मीठ मोहरीने दृष्ट काढली. सुरजचे कान पकडून त्याची पाठ थोपटली.
सोमेशला आक्काने घरी बनवलेले लाडू आणि चिवड्याचा डब्बा दिला. माझ्यासाठी त्यांनी एक छान मोगऱ्याचा गजरा आणि चाफ्याची फुलं दिली. सनिक दादाला घरच्या झाडाचे डझनभर आंबे दिले. सगळेच भावूक झाले होते.
सुयश आजी आजोबा आणि इशान यांनी पण निरोप घेतला. आजी आजोबांनी आक्काना गीतांजलीला शुश्रुषा क्लिनिकमध्ये पुन्हा पाठवण्याची विनंती केली. आक्कानी छोट्या इशानला कडेवर घेऊन म्हणले
" गीता आता फक्त माझी पोर नाही... ती तुमची सर्वांची आहे... मला आता तिची काळजी नाही. "
त्यावर सुयश म्हणला " बरोबर म्हणालात आक्का, ती फक्त तुमची मुलगी नाही... मी तिला क्लिनिक मध्ये आताच नेणार नाही तर तिला आता मानाने घेऊन जाईन. आयुष्यभराची जोडीदार म्हणून मला गीतांजली द्याल ना आक्का... "

हे ऐकून आक्काच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. एवढ्या वर्षाची तिची तपश्चर्या फळाला आली होती. याचं भरभरून कौतुक तेव्हा आक्काच्या डोळ्यातून दिसत होतं. आक्का सुयशला म्हणली.

" लवकर या जावयी बापू... आणि माझ्या लेकीला सुखाने नांदवा... मी धन्य झाले... तुमच्या सारखा शिकलेला आणि समजून घेणारा जोडीदार गीताला मिळाला... नशीब काढलंस पोरी "

आक्का गीतांजलीकडे पाहत म्हणाली. गीतांजलीने आक्काला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात विवेक मोठ्याने म्हणला " ताईच्या लग्नाला यायचं हं... "
सगळयांमध्ये हशा पिकला. आम्ही सगळेच आता वाड्यातून परतीच्या वाटेवर निघालो. आक्का आणि वाडा दुरुनच खुणावू लागला. आम्हाला पुन्हा येण्याचे आमंत्रण देऊन गेला. सगळी गुपितं आणि तो फुललेला गुलमोहर कायमचा मनात घर करून गेला. गीतांजली आणि सुयश आता एकत्र हॉस्पिटल सांभाळतात. त्यांच्या या संसारात आता आणखी दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. इशान आणि जान्हवी त्यांच्या आजी आजोबांसोबत एकत्र राहतात. जान्हवीने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. आता ती क्लिनिक च्या फंड मधून उभे केलेले वृद्धाश्रम सांभाळते. आक्काचा दिवस आता गीतांजलीच्या नवजात जुळ्या बाळांना सांभाळण्यात जातो. आता त्या वाड्यात कोणीच राहत नाही. तरीही आज पुन्हा त्या वाड्यात प्रवेश करताना ती डायरीतली गोष्ट आठवते. त्या डायरीमध्ये अजूनही तो फुललेला गुलमोहर आणि त्याच्या आठवणी अजूनही तशाच ताजा आहेत.

समाप्त
*****

Friday, 6 February 2026

प्रवासातली गोष्ट : ११


मी समोर असताना सुयश सांगत होता, “ गीतांजली सोज्वळ, शांत, अल्लड व खूप प्रेमळ मनाची होती.  त्या बाहेर भेटलेल्या आजी आजोबांच्या मुलाचा मोठा अपघात झाला होता. त्याचे इथेच उपचार सुरु होते. मात्र अपघात इतका जबरदस्त होता की, आम्ही त्यांच्या मुलाला वाचवू शकलो नाही. त्या अपघातात त्यांचा मुलगा गेला, जान्हवी सुद्धा त्या अपघातात जखमी झाली होती. डोक्याला मार लागल्याने त्या धक्क्यामुळे तिची वाचा गेली. "


मी तेव्हा सुयशचे बोलणे ऐकून पुरती गोंधळून गेले होते. अचानक गीतांजली इथे कशी काय आली, ही गीतांजली नक्की कोण? मी वाड्यात पाहिली तीच का ही? आणि हा सुयश कोण? गीतांजली बद्दल याला काय माहित आहे? सुरजला नक्की काय कळले आहे? आता विचारलेच पाहिजे. म्हणून मनातली बेचैनी चेहऱ्यावर न आणता मी सुरजला इशाऱ्याने खुणावले आणि हा नक्की काय प्रकार आहे, असं त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्यातली ती शोधक नजर  पूर्णपणे सुयशवर एकवटलेली होती. त्यामुळे माझा प्रयत्न फोल गेला. तेव्हाच अचानक माझ्या सोबत असलेली मुलगी पुन्हा रडायला लागली. सुयशने तिला काही वेळ जवळ घेतले. " हि मुलगी तुमच्या सोबत आहे का?” असे मला विचारले. त्याला लहान मुलांचा लळा असावा असा काहीसा तो तिच्याशी संवाद साधत होता. 

मी त्याला थोडक्यात झाला प्रकार सांगितला. त्या वर तो पुन्हा भूतकाळात गेला. आणि म्हणला “ या अपघातासारखा तो ही अपघात झाला होता आणि जान्हवीचे कुटूंब त्यात कोलमडून पडले. त्या अपघातात तिच्या जवळची व्यक्ती तिच्यापासून कायमची दूर गेली होती. जेव्हा जान्हवी कोमातून बाहेर आली तेव्हा तिची वाचा गेली. त्यावेळी गीतांजलीने कर्तव्यदक्षपणे आपली कामगिरी बजावली होती. तिने जान्हवीला जवळ जवळ त्या धक्क्यातून बाहेर काढले. ती जान्हवीची खूप प्रेमाने काळजी घेत होती. आपल्या मोठ्या बहिणीची काळजी घ्यावी अगदी तशी...” सुयश सांगत होता.

“मी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्यामुळे गीतांजली रोज माझ्या संपर्कात येत होती. तिची सेवाभावी वृत्ती पाहून मी आणखीच तिच्यात गुंतत गेलो. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आमच्यात पटकन मैत्री झाली. हळूहळू तिच्या या स्वभावामुळे जान्हवीची तब्येत देखील सुधारत होती. तिच्या चेहऱ्यावर हरवलेले हसू पुन्हा दिसायला लागले होते.”
सुयश भूतकाळात एवढा रंगून गेला आणि गीतांजलीच्या एक एक आठवणी सांगू लागला. मी फक्त ऐकत होते. माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. माझ्यासोबत असलेली ती बच्चीही आता शांत झाली होती. तिला समोरच एक बाग दिसली आणि लगेचच हात सोडून ती त्या दिशेने पळाली. तिथल्या बागेत बरीच झाडं होती. 

सुयश त्या मुलीकडे आणि बागेकडे एकटक पाहत होता. मग स्वत:शीच काहीतरी बोलू लागला. “तिला फुलझाडांची, बागेची खूप आवड होती. काम उरकून ती यासाठी वेगळा वेळ ठेवायची. बागेमध्ये या झाडांना, फुलांना आपले काहीतरी गुपित ती रोज सांगायची. यावरुन माझ्या लक्षात आले की, गीतांजलीसाठी ती बाग तिच्या मनाच्या अगदी जवळची होती. तिच्या तोंडून गुलमोहराचे खूपदा कौतुक ऐकले होते. म्हणूनच मी तिला एक गुलमोहराचे झाड भेट दिले होते. तिच्या या फुलवलेल्या बागेत आम्ही ते लावले, ती त्याची जीवापाड काळजी घ्यायची नंतर ते झाड तिची आठवण म्हणून राहिले... माझ्या समोर...”, हे सांगताना सुयशच्या मनातली घालमेल सुरजला आणि मला ही जाणवत होती.

बहूतेक हेच ते गुलमोहराचे झाड, हिरवे गार व डेरेदार... अजूनही तसेच आहे. गीतांजलीने प्रेमाने त्याला वाढवले होते. सुयशशी झालेली ही भेट नक्कीच काहीतरी गूढ आहे आणि तितकेच ते एक गोड गुपित आहे. नक्की काय या काळाच्या पडद्याआड लपलेले आहे ते शोधण्याचा हा प्रवास नकळत सुरु झाला होता. तेवढ्यात हॉस्पिटलमधून सम्या, विवेक, सोमेश बाहेर आले. समोर च त्यांनी आम्हाला गाठले. सुरजने काही विचारायच्या अगोदरच विवेकने सर्व व्यवस्थित असल्याचे त्याला सांगितले. सोमेशने लगेच प्रश्नांचा भडीमार सुरु केला.

“ एवढा वेळ कुठे होतास तू? आम्ही कधी पासून शोधतोय? अचानक कसे गायब झालात तुम्ही दोघे? आणि ही लहान मुलगी, ते सर कोण आहेत? अरे सुरज बोल लवकर...!",

“ थांब रे जरा... त्याला बोलू तर दे...!" असे म्हणत सनिक दादाने सोमेशला शांत केले.

“ हा माझा मित्र सुयश ” अशी सुरजने एका वाक्यात ओळख करुन दिली. यावर सुयशने काहीही बोलणे टाळले आणि एक स्मित हास्य केले. तो आम्हाला दिशा दाखवत हॉस्पिटलच्या समोरच्या गेटपाशी घेऊन आला. तसे आम्ही तिथून सर्वजण हॉस्पिटलच्या मुख्य एन्ट्री पाशी आलो. त्या मुलीची आई तिथे माझी वाट पाहत होती. बराच वेळ मी तिथे नव्हते त्यामुळे ती घाबरली होती. पण मुलीला पाहिले आणि तिची चिंता मिटली.

“ आता सगळं ठीक आहे, तुम्ही हिला सांभाळून खूप मोठी मदत केली. " असे म्हणत ती आभार मानून मुलीला घेऊन तिथून निघाली.

सगळे पुन्हा पारावर जमले. सूरज कडे सर्वांचे लक्ष होते. आता मात्र सगळ्यांना उत्सुकता होती, नक्की काय चाललंय कुणालाच कळेना. मलाही पूर्णपणे काहीच माहित नव्हते. सुरजने इशाच्या बॅगेतून गीतांजलीची डायरी आणली.