टिरिंग टिरिंगऽऽऽऽ टिरिंग टिरिंगऽऽऽ सनिक दादाचा फोन वाजला. अनोळखी नंबर असल्याने त्याला थोडी शंका आली. त्याने फोन लगेचच उचलला. “हॅलोऽऽऽ मी धनंजय बोलतोय..."
“काका तुम्ही...? कुठे आहात...? आम्ही कालपासून तुम्हाला शोधतोय. तुम्ही कुठे आहात आता...?”
सनिक दादाने त्यांना प्रश्न विचारून भांडवून सोडले. सुरजने दादाला फोन घेऊन स्पीकरवर टाकायला लावला. काका सांगू लागले, “मी एस. टी मध्ये आहे. माझा फोन बंद पडला त्यामुळे मला फोन करता आला नाही. रात्रीच मी मुंबईला जायला निघालो. तेव्हाही हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्यांच्या फोनवरुन मी फोन केला होता. पण कुणी उचलला नाही. मला घाईघाईत मुंबईला जावे लागले. माफ करा दादा, पण मी सुखरुप आहे.
"हॅलोऽऽऽ हॅलोऽऽऽ” आणि फोन कट झाला.
आम्ही पोलीस चौकीतच असल्याने लगेचच आपली तक्रार मागे घेतली.
“चला तर मग.... आता आपण आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाऊ शकतो” सोमेश आनंदाच्या भरात म्हणाला.
“पण काका असं अचानक तडका-फडकी का गेले असतील, सनिक दादा! ” - सुरज म्हणला
“अरे त्यांना काहीतरी काम आले असेल. आता त्यांनी सांगितलं ना, आपण आता जास्त विचार करायला नको, लेट्स गो..." विवेक म्हणला.
विवेकने लेट्स गो म्हणताच ट्रॅव्हलर नव्या उत्साहाने पुन्हा भरली. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला आणि गाडी सुरु झाली. सनिक दादाने काकांची जागा घेतली. जवळपास तासभर घाटातला रस्ता पार करुन आम्ही आमच्या इच्छित ठिकाणी पोहोचलो.
तिथे घनदाट जंगल होते. निसर्गाच्या सानिध्यात आम्ही दोन दिवस राहणार होतो. रानावनात आमची राहण्याची व्यवस्था होती. तिथल्या आदिवासी जीवनशैलीचा अनुभव, त्यांची लोकगीत, त्याची कलाकूसर आणि राहणीमान सगळे विलक्षण वेगळे होते. तिथली बरीच माहिती सनिक दादाने आधीच काढली होती. तो सगळ्यांना सांगत होता, मार्गदर्शन करत होता. त्याची जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडत होता. तिथले सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेरात साठवत दोन दिवस कसे गेले कळलंच नाही. ट्रेक करता करता झालेली दमछाक टोकावर पोहोचल्यावर दिसणारे विहंगम दृश्य आणि भरपूर उत्साह सोबत घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. दोन दिवस मस्त मज्जा-मस्तीत वाऱ्यासारखे वेगाने गेले. माझ्या मनात सगळा प्रवास पुन्हा पहिल्यापासून सुरू झाला होता. गेल्या काही दिवसात बरेच अनुभव आले होते. किती नवीन चेहरे आपल्या आयुष्यात आले आणि नवीन आठवणी तयार झाल्या. आम्ही ट्रॅव्हलरमध्ये बसलो. या घनदाट रानात आमच्या मुक्कामाची सोय करणा-या सनिक दादाच्या मित्राचे आभार मानून तोही गाडीत चढला.
पुन्हा माघारी जाण्याचा प्रवास सुरु झाला. तो व्यवस्थित व्हावा अशी मनोमन सगळयांची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. प्रवासात तीच ती गाणी ऐकून कंटाळा आला म्हणून गीतांजलीची डायरी मी सनिक दादाकडून मागून घेतली. पुढच्या प्रवासात ती वाचून काढायची असे मनाशी ठरवले होते. त्याने ती विश्वासाने मला दिली.
पुन्हा एकदा वळणा वळणाच्या रस्त्यावर मावळत्या संध्याकाळी, आकाशात पसरलेले रंग न्याहाळत, पक्ष्यांचे थवे पाहत सगळी मंडळी प्रवास करत होती. मी ती डायरी उघडली आणि वाचू लागले.
******
सुयशच्या वाढदिवसाला आजी आजोबांनी एक गुलमोहराचे झाड त्याला भेट दिले होते. ते त्याला देण्याचे कारण खरं तर काहीतरी वेगळेच होते. दुसऱ्या दिवशी सुयशने ते झाड मला दिले आणि बागेत लावायला सांगितले.
दिवसामागून दिवस गेले. गुलमोहराची दोन्ही झाडं खूप छान वाढली होती. मी त्यांची घरच्या सदस्यांप्रमाणे काळजी घेत होते. सुयशला बागेत येण्यासाठी गुलमोहर हे निमित्त झालं होतं. हॉस्पिटल मध्ये काम करताना तो जबाबदारीने ते पूर्ण करत असे. तेव्हा रुग्ण आणि त्याचे उपचार हेच त्याचे उद्दिष्ट असायचे. मैत्री आणि काम याची त्यानी कधीच गल्लत केली नाही. आठवड्यातून दोनदा आजी आजोबा आपल्या सुनेला भेटायला यायचे. हळूहळू आजोबांचा स्मृतिभ्रंशाचा आजार बळावत गेला. त्यामुळे आजी खूप अस्वस्थ असायच्या. त्या माझ्याकडे त्यांच मन मोकळं करायच्या.
त्यावेळी जान्हवी तशी नीट बोलतही नव्हती. तिच्या मनात अजूनही तो जबरदस्त अपघात घर करुन बसला होता. आजीने आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडे असलेल्या थोड्या बहुत रक्कमेची हॉस्पिटलमधील काही रुग्णांना मदत केली. मुलाच्या अपघातानंतर या हॉस्पिटलने त्यांना आधार दिला होता. त्याचीच जाण ठेवून सगळ्या स्टाफसाठी समारंभ ठेवला होता. त्यात प्रत्येकाला भेटवस्तू दिली. त्यावेळी ते मला ते भेटले होते. त्यांचे चेहरे प्रसन्न वाटत असले तरी मनात मात्र कुठंतरी कोंडुन ठेवलेलं दुःख मला जाणवत होते.
मला ती भेट वस्तू देतांना आजोबा म्हणाले, “जान्हवी आता डोळे उघडून आमच्याकडे पाहते ते फक्त तुझ्यामुळे, तुला किती आशीर्वाद दयायचे... आमचं तर आयुष्य संपलं होतं. तु अगदी आमच्या मुलीसारखी भेटलीस बेटा... पण जान्हवीचे हे असं व्हायला नको होतं, आमच्या जान्हवीचे सगळे आयुष्य असेच त्या खाटेवर जाणार बहुतेक..."
बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांना कसेबसे मी सावरण्याचा प्रयत्न केला. पण ते काही थांबले नाहीत. लहान मुलाप्रमाणे ते हमसून हमसून रडू लागले. काय करावे कळत नव्हते. तेव्हा आजी म्हणाल्या, यांना आपल्या दुःखाचा घटकाभरात विसर पडतो. आजूबाजूचे भान देखील राहत नाही. मला मात्र सगळं लक्षात राहतं. चांगले आणि वाईट दिवस... सगळंच थकलेल्या डोळ्यांनी आता पहावं लागतं. आम्हाला आता आधाराची गरज आहे. आमच्या मुलीला आधाराची गरज आहे. त्यासाठी आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. तूच मला मदत करु शकतेस...तु आमच्या मुलीसारखीच आहेस... तुला जे हवं ते मी देईन. फक्त एवढं कर आम्हा म्हाताऱ्यांसाठी..... "
*****
वाचता वाचता माझेही डोळे पाणावले होते. डायरीतील पुढील पान दुमडलेलं होतं. कदाचित त्यावरच तिने गुपित लिहीलेले असावे असे मला वाटले.
कथा आणि कथेत रमणार्या काल्पनिक जगात सुचलेल्या, आठवणीत राहिलेल्या कथा एकत्र करताना जमवलेल्या गाठोड्यातल्या काही कथा कहाण्या.
Sunday, 26 May 2024
प्रवासातली गोष्ट : १६
Thursday, 23 May 2024
प्रवासातली गोष्ट : १५
सुरजचं बोलण ऐकत सनिक दादाच्या मनात सुद्धा काकांच्या अचानक गायब होण्यावरून प्रश्न पडू लागले. तो सुरजच्या शेजारीच पाठ टेकून पडला होता. तो सुरजला त्याच्या मनातल्या शंका ऐकवत होता.
“ काका असे अचानक कुठे गेले असतील? ते कुठल्या अडचणीत तर नसतील ना? त्यांच्या घरी तर काही अडचण नसेल ना? आणि घरुनच फोन आला असेल तर...! त्यांनी कुणाला का सांगितलं नाही? त्यांचा फोनही बंद येत होता. सुखरुप असले म्हणजे झालं..."
सोमेश त्यावर म्हणाला, “आधी ती डायरी, नंतर तो अपघात आणि आता हे अचानक ड्रायव्हर काकांचं गायब होणं...! यारऽऽऽ आपण कशाला आलो होतो आणि आता काय करतोय...?”
विवेक त्याला दुजोरा देत बोलला, “ नक्कीच हा प्रवास आपल्यासाठी अशुभ आहे, आपण मागे फिरु. परत आपापल्या घरी सुखरुप जाऊ. नको हे आऊटिंग वगैरे...!” या दोघांच निर्वाणीचं बोलणं ऐकून सुरज वैतागला.
" काहीही काय बोलताय? तुम्ही खूपच भित्रे आहात. आपण ही परिस्थिती सांभाळून घेऊ शकतो रे... विश्वास ठेवा. सनिक दादा तू इतका विचार करु नकोस. नक्कीच यातून काहीतरी मार्ग निघेल. काका पण भेटतील आणि आपली ट्रिप सुद्धा यशस्वी होईल. फक्त सर्वजण एकत्र असायला हवेत. असे घाबरुन चालणार नाही. चला आता, यावर जास्त चर्चा करु नका.”
सुरजचं बोलून झालं तसं दारावरची बेल वाजली. “कुणीतरी आलं वाटतं. जा रे सोमेश... बघ कोण आहे ते?” सनिक दादा सोमेशला म्हणाला.
“हा... सोमेश... जाणार पुढे... इथेच घाम फुटला बघ याला.. ”, गंभीर झालेलं वातावरण जरा हलकं करण्याच्या उद्देशाने सुरजने सोमेशची खिल्ली उडवली. मग इशानेच जाऊन दार उघडले. दारात एक माणूस होता. आपली ओळख त्याने शुश्रूषा हॉस्पिटलचे कॅन्टीन सांभाळणारा म्हणून दिली. त्यानंतर सुयश सरांनी त्याला पाठवले आहे म्हणून सांगत इशाच्या हातात एक भली मोठी भरलेली पिशवी दिली. त्या पिशवीत काय आहे हे न पाहताच आणि त्या माणसाला साधं नाव गाव न विचारताच इशाने ती पिशवी त्याच्याकडून घेतली आणि दार लावून घेतले. सर्वजण वरच्या मजल्यावर होते. इशा ती पिशवी घेऊन खोलीत गेली आणि पिशवी उघडली. पिशवीत जेवणाचा मोठा डब्बा होता. दहा-बारा जण आरामात जेवतील असं पुरेपूर जेवण त्यात पाठवलेलं होतं. कोणताही किंतु परंतू डोक्यात न ठेवता सगळी मंडळी एकत्र जेवायला बसली.
दिवसभराच्या दगदगीतून थोडी विश्रांती मिळाली आणि पोटाची भूक तर शमलीच होती. सगळे जेवले आणि जेवल्या जेवल्याच तासाभरात सर्वजण तिथेच खोलीत झोपले. रात्री बारा-साडेबाराला सनिक दादाचा अचानक फोन वाजला. दिवसभराच्या थकव्याने वाजलेला फोन गाढ झोपेत कुणालाही ऐकू आला नाही आणि उचलला ही गेला नाही. सोमेशला जाग आली होती पण स्वप्नात फोन वाजत आहे असं समजून तो परत गाढ झोपी गेला.
सकाळी पुन्हा दारावरची बेल वाजली. सुरजने दार उघडलं. दारासमोर सुयश उभा होता. सगळे जागा मिळेल तिथे झोपले होते. त्यामुळे खोली अस्ताव्यस्त झाली होती. सुरज मोठ्याने ओरडला, “बघा कोण आलं ?” सगळे खडबडून जागे झाले. सनिक दादा तर झोपेतूनच, “काका आले..." असं म्हणतच उठला. परंतू तसे काही नसून सुयश त्यांच्यासाठी सकाळचा नाश्ता घेऊन आला होता. सगळी मंडळी नाश्ता करण्यासाठी एकत्र बसली. सुयशने सगळ्यांसाठी ब्रेड पकोडे आणि गोड शिरा आणला होता. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. सगळ्यांचा नाश्ता झाला तसे सुयशने काकांच्या विषयी एक महत्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला,
“काल मी सांगितल्याप्रमाणे सीसीटीव्ही चेक केल्यावर कळालं की, ड्रायव्हर काका हॉस्पिटलमध्ये नाहीत. ते तुम्ही निघायच्या जवळपास तासभर आधीच मेन गेटमधून बाहेर जाताना दिसले. ते आजूबाजूला कुणाला तरी शोधत होते. हे त्या गेटवरच्या वॉचमनने सांगितले. त्यांनी मुंबईला जायला बस कुठे मिळेल, याची चौकशी केली होती. वॉचमनने त्यांना कामटे फाट्याकडे जाणारा रस्ता सांगितला. तिथून पुढे मुंबईकडे जाणारा महामार्ग आहे. कदाचित काका मुंबईला त्यांच्या घरी गेले असावे असं मला वाटतंय ”
सगळे एकमेकांकडे पहायला लागले. सुयश पुढे म्हणला “ आता तुम्ही सगळे असं करा, हॉस्पिटलमध्ये परत येण्यापेक्षा तिथे जाऊन विचारपूस करा. तिथे दहा मिनिटांच्या अंतरावर तालुका पोलीस चौकी पण आहे तिकडे काकांबद्दल नक्कीच काहीतरी कळेल.”
सगळयांनी सामानाची बांधा बांध सुरू केली. सुयशने सगळ्यांचा निरोप घेतला. ट्रॅव्हलर मधून सगळे कामटे फाटाच्या दिशेने निघाले. बघता बघता तिथले बस स्थानक आले. तिथे मोजून दोन बस उभ्या होत्या. चौकशी कक्षात बसलेल्या व्यक्तीकडे सुरजने चौकशी केली. मुंबईकडे जाणाऱ्या दोन गाड्या सकाळीच आठच्या दरम्यान गेल्या असल्याचे समजले. ड्रायव्हर काकांचा गृपमध्ये काढलेला फोटो सनिक दादाने त्यांना दाखवला. पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. शेवटी सगळ्यांनी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा काकांच्या नंबरवर फोन लावून पाहिला पण तो अजूनही बंदच होता.
कामटे फाटयावरून निघताना सनिक दादाने गाडी पोलीस चौकीकडे घेतली आणि काका हरवल्याची रीतसर तक्रार नोंदविली. नेमक्या त्याचवेळी तिथे कॅन्टीन सांभाळणारा तो इसम त्याच्या जमिनीच्या वादाचे कागदपत्र घेवून आला होता. त्याने आदल्या दिवशी डबा दिलेल्या इशाला ओळखले होते.
“तुम्ही कालच्याच मॅडम ना? मी तुमच्या घरी आलो होतो जेवण द्यायला. ओळखलं का मॅडम...?”
त्यावर इशा म्हणाली “हो...हो...काल तुम्हीच आला होता ना...
त्यावर तो म्हणला " होय जी, तुम्ही इथे कसे आमच्या गावच्या चौकीवर! "
त्यावर तिने त्यांना काकांबद्दल सांगितले. त्यांना फोटो दाखवला.
फोटो बघून तो इसम चकित झाला आणि म्हणला,
या माणसाला बघितल्यासारखं वाटतंय... होय... कालच मी त्यांना भेटलो... कँटीन मध्ये आलेला जी... "
हे ऐकून सनिक दादा म्हणला “ कुठे गेले ते नंतर? तुमच्यासोबत ते काही बोलले का ? तुम्हाला काही सांगितले का?"
त्यावर तो इसम म्हणला “अहो, मी तुम्हाला जेवण देऊन आलो त्यानंतर मी आवरा आवर करुन कॅन्टीन बंद करणारच तेवढ्यात हे साहेब आले आणि काही खायला शिल्लक आहे का? असं विचारलं. मी जे होतं ते दिलं. त्यानंतर खाऊन झाल्यावर कँटीनमधून ते लगेच निघून गेले. एकंदरीत त्यांचं अवसान पाहून मी त्यांची चौकशी केली तर मला मुंबईला जायचं आहे एवढं बोलून लगेच गेले बघा...” त्या व्यक्तीने काकांची माहिती सांगितल्यावर ड्रायव्हर काका सुखरुप असल्याची शाश्वती वाटू लागली. सगळ्यांना थोडा दिलासा मिळाला.
Thursday, 16 May 2024
प्रवासातली गोष्ट : १४
सनिक दादा ड्रायव्हर काकांना शोधायला गेला. चौकशी केल्यावर समजले की, ते तासाभरापूर्वीच त्यांच्या रुममधून बाहेर पडले. " तासाभरापूर्वीच ड्रायव्हर काका स्वत:च उठून कुठेतरी निघून गेले." दादाने कॅन्टीनमध्ये बसलेल्या सगळ्यांना सांगितले.
“आता हे काय नवीन लचांड! " सोमेश पुढे अजून बोलणारच तेवढ्यात सनिक दादाने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिलं तसा तो गप्प झाला. इशाला मात्र राग आला.
ती थोडंस वैतागूनच बोलली, “काकांना आधीच पायाला लागलंय, त्यात ते असं न सांगता कुठे गेले असतील? एकतर बराच वेळ आपला रिकाम्या उद्योगांमध्येच चाललाय."
"दादा आपण सगळे मिळून काकांना शोधूया का? कुठेतरी गप्पा मारत बसले असतील किंवा स्टाफ पैकी आजूबाजूच्या कुणी पाहिलं असेल तर चौकशी करुन समजेल तरी...” मी पुढे म्हणले. सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला. आम्ही सगळे हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या भागाकडे निघालो. मी बागेकडे शोधण्यासाठी निघाले, इशा लॅबच्या बाजूला, सनिक दादा स्टाफकडे चौकशीसाठी गेला, सोमेश जनरल वॉर्डकडे तर सुरज स्पेशल वार्डकडे गेला.
सुरजने दवाखान्यातल्या सर्व स्पेशल वार्डमध्ये डोकावून पाहिले. जान्हवीचे रिपोर्ट बघुन सुयश तिच्या वार्डमधून बाहेर पडत होता. त्याने सुरजला कुणाला तरी शोधताना पाहिलं. सुरज अस्वस्थ दिसत होता. त्याला पाहून सुयशने मागून आवाज दिला, “मित्राऽऽऽ काय रे! काय शोधतोय...?”
“काय सांगू डॉक्टर, आमचे ड्रायव्हर काका कुठे गेलेत कुणास ठाऊक, त्यांच्या वार्ड मधून ते अचानक गायब झालेत! तासाभरापासून शोधतोय त्यांना. कुठे गेले माहीत नाही. आम्ही सर्वजण त्यांनाच शोधतोय...”
“म्हणजे...”
“काही मानसिक ताण तणाव होता का त्यांना?" - सुयश म्हणला.
“नाही...अगदी आमच्यातले झाले होते. मनमोकळ्या स्वभावाचे आहेत ते, खोलीत कंटाळा आला असेल म्हणूनच गेले असतील चक्कर मारायला. तसे ते जबाबदारीने वागणारे आहेत.”
असं म्हणत सुरज कॉरिडोरच्या बाकड्यावर मटकन बसला. सुरजला हताश झालेलं पाहून सुयश त्याच्या खांद्यावर हात ठेवत धीर देत म्हणला, " काळजी करु नकोस, चल आपण कंट्रोल रुममध्ये जाऊयात. काळजी करू नकोस मित्रा, हॉस्पिटलचा प्रत्येक कानाकोपरा सीसीटीव्हीने कव्हर केलेला आहे.”
सुयशने मित्रा म्हणल्यावर सुरजला धीर आला. चिंतेची एक आठी कमी झाल्यासारखे त्याला वाटले. दोघंही लिफ्टने दवाखान्याच्या तिसऱ्या मजल्यावरील कंट्रोल रुममध्ये पोहचले.
सुयशने तिथल्या इन्चार्जसोबत बोलून सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी विनंती केली. त्याला फुटेज पाहण्यासाठी परवानगी मिळाली. खरं तर दवाखान्याच्या अटी शर्तींच्या अधीन राहून ही परवानगी मिळाली होती. दरम्यान सर्वजण काकांना शोधून पुन्हा हॉस्पिटलच्या आवारातील त्या झाडाजवळ येऊन थांबले होते. परंतू सुरज अजूनही आला नव्हता. त्याचं हे वागणं सगळ्यांना नवं नव्हतं. उलट तो वेळेत आला असता तर सर्वांनाच आश्चर्य वाटलं असतं. सनिक दादाने सुरजला फोन केल्यावर सुरजने तो आणि सुयश हॉस्पिटल च्या कंट्रोल रूम मध्ये आल्याचे सांगितले. तो डॉक्टर सुयशच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहे याची कल्पना सनिक दादाला दिली. आता सर्वांनाच एक आशेचा किरण दिसला होता. साधारणतः तासाभराने सुरज सगळ्यांना येऊन भेटला. पण महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर काही त्याच्याकडे नव्हतं. सिसिटीव्ही मधून फक्त काका तासाभरापूर्वी वार्डच्या बाहेर पडल्याचे चित्रण मिळाले होते. या पुढे काहीच माहिती मिळाली नाही.
काकांच्या शोध मोहिमेत संध्याकाळ तिथेच झाली. हळूहळू अंधार पडू लागला होता. कुठंतरी मुक्कामाची व्यवस्था करणं आवश्यक होतं. डॉ. सुयशने आम्हा सगळ्यांना मधून हॉस्पिटलच्या आवारातील झाडाजवळ पाहिलं. ही मंडळी अजूनही इथंच आहेत, हे पाहून डॉ. सुयश आमच्याजवळ आला. आमची राहण्याची अडचण सुरजने डॉ. सुयशला सांगितली. त्यानं मुक्कामासाठी मित्राच्या रेस्टहाऊसचा पत्ता दिला. त्याला राहण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले आणि हॉस्पिटल कँटीन मधून आमच्या जेवणाची सोय केली.
सनिक दादाकडे ड्रायव्हिंग लायसन्स होतं. गाडीची कागदपत्रं गाडीतच होती. त्यामुळे प्रवासात अडचण आली नाही. सुयशने शेअर केलेल्या जागेवर आम्ही पोहोचलो. सर्वजण दिवसभराच्या धावपळीमुळे थकले होते. रुममध्ये जाऊन सगळेच जरासे विसावले. जेवणाचा निरोप येईपर्यंत तसंही काही काम नव्हतं.
" सीसीटीव्हीतल्या फुटेज नुसार काका कुणाशी तरी फोनवर बोलत होते आणि अचानक उठून बाहेर गेले. इतके अगतिक... की, त्यांनी स्वत:च हाताचं सलाईन फिल्मी स्टाईलनं काढून टाकलं होतं...! " झोपल्या असताना रेस्ट हाऊसच्या छताकडे पाहत सुरज बाकीच्यांना त्याने पाहिलेले चित्रण सांगत होता.
Wednesday, 15 May 2024
प्रवासातली गोष्ट : १३
सुरजकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विवेकने विचारले, “कसलं गुपित...? तू काय बोलत आहेस? काहीच कळत नाही. थोडं विस्कटून सांग.”
“आपल्याला काय करायचं आहे. आपण ती डायरी वाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आणि विषय संपवायचा..” असे बोलून सोमेशने विषय संपवायचा प्रयत्न केला.
“तुम्ही काय सुरजचं ऐकताय रे ! सगळेच अडकू नाही तर यात. आपण एन्जॉय करायला आलोय आणि काय हे तुम्ही...! न एन्जॉय... फरगेट ऑल...” सोमेशने आपले बोलणे पूर्ण केले. सोमेशचे बोलणे ऐकून सुरज आणखीच चिडला.
“हे बघा... माझा काही हट्ट नाही की, तुम्ही मंडळींनी त्या डायरीत काय लिहिलं आहे ते जाणून घ्यावं. पण आपण दोन दिवस ज्या वाड्यात राहिलो, त्या भव्य वाड्यासाठी... त्यातल्या प्रेमळ आक्कासाठी... गीतांजलीसाठी तुम्हाला काही काळजी वाटत नाही का? आपल्यामुळे जर त्यांच्या आयुष्यात, आनंदाचे दिवस परत येणार असतील तर काय हरकत आहे हे पाऊल उचलायला... हे बघ सनिक दादा कुणीही असंच कारणाशिवाय कोणाला भेटत नाही किंवा कोणत्याही गोष्टी विनाकारण घडत नाहीत. तू एकदा विचार कर, आक्काने एवढ्या प्रेमाने आपल्याला एवढं सगळं का खायला प्यायला घातलं...आपला पाहुणचार केला आणि आपल्याकडे ती डायरी आता ह्या वेळेला कशी आली? सगळ्यात महत्वाचे त्या डायरीतला सुयश आपल्याला इथेच कसा काय भेटला? एकदा विचार कर... मी ती डायरी का वाचली असावी?प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं आणि गीतांजलीच्या गोष्टीमागे आपण ते कारण आहोत. ”
सनिक दादाच्या मनात गोंधळ वाढत होता. त्याने ती डायरी सुरज समोर ठेवली. सुरजने ती डायरी उघडली.
“ बघा...हा वाड्याचा फोटो आणि त्याच्या बरोबर मागे आपण बसलोय त्या शुश्रूषा क्लिनिकचा” सगळ्यांनी तो फोटो पाहिला. त्यात अजून एक असाच फोटो होता, बाहेरच्या अंगणातला आणि एक वाढदिवसाच्या सोहळ्याचा...सुरज पुढे सांगू लागला. सुरजने वाचलेल्या पानांवरुन हात फिरवत सगळ्यांना म्हटलं, “यात आठवणी आहेत, कुठल्या माहिती आहे? या क्लिनिकच्या...”
गीतांजली इथेच काम करत होती आणि ती इथे आली तेव्हा डॉक्टर सुयशने नुकतंच एम.बी.बी.एस. चं शिक्षण झाल्यावर प्रॅक्टीस सुरु केली होती. गीतांजली इथलीच असल्याने ग्रामीण वातावरण तिला नवीन नव्हते. पण सुयश पुण्याचा, सगळं शिक्षणही तिथंच झालेलं. त्याला ग्रामीण जीवनाचा जराही स्पर्श नव्हता. त्यामुळे हे नवे वातावरण स्विकारण्यास थोडा कालावधी गेला. इथल्या लोकांची भाषा, त्यांचे पेहराव, त्यांच्या गरजा आणि सुखसोई सगळंच समांतर रेषेच्या खालचं होतं. असाच एक रुग्ण उपचारादरम्यान अचानक बेभान झाला होता त्याला पूर्णपणे ताब्यात ठेवण्यासाठी गीतांजलीने डॉ. सुयशची मदत केली होती. तेव्हा सुयशने तिला जवळून पाहिले होते. त्यानंतर ती दवाखान्यात बऱ्याचदा दिसली, पण बोलणं झालं नाही. पण जेव्हा जान्हवीची केस समोर होती तेव्हा सुयश आणि गीतांजली एकमेकांच्या सहवासात आले. त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या नात्यात प्रेम वाढत गेले. सुयशने तिला मागच्या बागेत बरेचदा पाहिलं. एक, दोन, तीन दिवस. रोज ती तिकडे काय करते? ते पाहण्यासाठी तो एके दिवशी संध्याकाळी त्या बागेत गेला.
शेजारीच मुलींचे वसतीगृह होते. बागे समोरच्याच खोलीत ती राहायची. सहसा कुणी या वेळी तिथे जात नाही. मग ती व्यक्ती तिथे काय करते हे पाहण्यासाठी गीतांजली त्या बागेत आली आणि तिने विचारले, “तुम्ही डॉक्टर ना... इथे कुणाची वाट पाहताय का? “
“नाही सहजच आलो, रोज लांबूनच ही बाग पहायचो, फार सुंदर आहे. आज मात्र इथं येण्याचा निश्चयच केला”
“मलाही खुप आवडते ही बाग, मला जसं जमेल तशी मी बागेची काळजी घेते”
तिने स्वतः लावलेल्या झाडांविषयी सुयशला सांगितले. सहज संवादातून दोघांची ओळख वाढत गेली.
सुयश आता फावला वेळ घालवण्यासाठी रोज त्या बागेत येऊ लागला. गीतांजलीची त्याला सोबत मिळाली. त्यांची चांगलीच मैत्री झाली. हळूहळू वसंत आला, पाने-फुले बहरु लागली. दोघांतली मैत्रीही बहरु लागली. त्यावर प्रेमाचा मोहोर येऊ लागला.
एक दिवस एक जबरदस्त अपघाताची केस आली. त्यात ते आपल्याला भेटलेले वृद्ध जोडपे होते ना... तेच ते. हे मला इथे आल्यावर आणि डॉ. सुयश भेटल्यावर कळलं. त्या अपघातात वृद्ध जोडप्याचा मुलगा गेला. आणि सूनेची वाचा गेली. त्या धक्क्याने आजोबांना विस्मरण झाले. त्यावेळी आपल्या गीतांजलीची त्यांना खूप मदत झाली सावरायला. गीतांजली आणि सुयश दोघं जान्हवीची केस हॅन्डल करत होते. " सुरज सांगत होता. तेव्हा सनिक दादाला काकांची आठवण झाली. त्याने इशाला पाहून यायला सांगितले,
“इशा जरा बघून ये. काका ठीक आहेत का? शुद्धीवर आलेत का बघ... मग पुढे निघायचे कसे ते ठरवता येईल.” सनिक दादा इशाला म्हणाला.
इशाला खरं तर ही रंगत आलेली गोष्ट चुकवायची नव्हती. तरी नाईलाजाने ती गेली. सम्या लगेच म्हणाला, “मग पुढे काय झाले? ”
“जेव्हा त्यांचा अपघात झाला तेव्हा मुलाच्या निधनाची बातमी ऐकून ते आजी आजोबा खचून गेले होते. त्या दिवशी जोराचे वादळ आणि सोबतीला पाऊस सुद्धा होता. काळोखी रात्र आणि त्यांचा हरवलेला आधार. सून ॲडमिट अशा त्या काळोख्या ओल्या रात्री बागेच्या एका कोपऱ्यात ते दोघे शांत बसून राहिले.
गीतांजलीचे त्यांच्याकडे लक्ष गेले. ती बागेमध्ये आली. वीजेचा कडकडाट सुरु होता. तिने त्या दोघांना आपल्या रुममध्ये आणले. त्यांची आस्थेने चौकशी केली. तिने त्यांचे सांत्वन केले, त्यांना समजावले. सकाळपासून उपाशी असल्याने त्यांचं अंग थरथरत होते. गीतांजलीने आग्रह करून कसे बसे दोन घास त्यांना बळजबरीने खायला लावले. सर्वस्व उध्वस्त झालेल्या अवस्थेत त्या दोघांनी तिच्याच खोलीत रात्र काढली.
“बाप रेऽऽऽ म्हणजे आपल्याला भेटलेले ते सुद्धा या स्टोरीमध्ये आहेत!" सोमेश आश्चर्याने म्हणला.
काकांना पहायला गेलेली इशा धावत आली ती जरा घाबरलेली दिसत होती.
“काय गं ? काय झालं?”
“आपले ड्रायव्हर काका आपल्याला सोडून गेले..”
“काय..?” सम्या जवळ जवळ ओरडलाच.
“हो...ते गेले...आपल्याला इथे हॉस्पिटलमध्ये सोडून. ते एकटेच कुठेतरी निघून गेले...”
“निघून गेले..? काय प्रकार आहे हा... इशा नीट सांग"
आता मात्र सगळयांचीच भितीने गाळण उडली होती. आता पुढे काय आणि कसं ? मोठा प्रश्न उभा राहिला होता.
Sunday, 5 May 2024
प्रवासातली गोष्ट : १२
सनिक दादाने सुरजला विचारले, "काय हे? कुणाची ही डायरी ? तुझ्याकडे कशी आली?” क्षणभर शांतता पसरली होती. सूरज त्या डायरीतले गूढ सांगणार होता. सगळे ते ऐकण्यासाठी उत्सुक होते. सगळ्यात जास्त मी आतूर होते. कारण ती डायरी गीतांजलीने कोणाच्याही नकळत मला वाचायला दिली होती आणि माझ्याच गलथानपणामुळे मी ती तेव्हा वाचू शकले नाही.
सुरजने डायरी उघडली. डायरीत त्या वाड्याचे चित्र आणि काही फुलांच्या पाकळ्या होत्या. ती डायरी इशाच्या बॅगेत सापडली हे सुरजने सर्वासमोर स्पष्ट केले. इशाला याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिने ती डायरी हातात घेऊन पाहिली आणि म्हणली " मी ही डायरी घेतली नव्हती. कोणी तरी मुद्दाम टाकली असेल असं मला वाटतं. त्यावर दुजोरा देत मी संवाद पुढे नेला " इशा कदाचित तिथे दिवे गेले असताना अंधारात चुकून तुझ्या बॅगेत आली असेल..." ती डायरी गीतांजलीने मला तिथे वाचायला दिली होती हे मला सांगणे अवघड जात होते. डायरी वाड्यात नाही हे लक्षात आल्यावर गीतांजलीचे काय झाले असेल या भीतीने मी काहीच बोलले नाही.
सनिक दादाने ती डायरी उघडून बघितली. त्याने सगळ्यांना विचारले, कुणीही काहीच बोलले नाही. शेवटी मी डायरीची जबाबदारी माझ्यावर घेतली आणि म्हणले, “मला गीतांजलीने वाचायला दिली होती. पण मी न वाचताच ती आपल्या खोलीत वरच्या खणात ठेवली होती. इशाकडे ती कशी आली हे मला सुद्धा माहिती नाही."
सुरज मात्र सगळ्यांचे चेहरे न्याहाळत होता. मी यात नाहीच या आवेशात तो बसला होता. काहीच बोलत नव्हता. पण लवकरच त्याची चोरी पकडली जाणार होती. सनिक दादाने ती डायरी स्वत:जवळ ठेवली आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला. सगळे त्या डायरी विषयीच चर्चा करत होते. यात सुरजचा नक्कीच काही तरी हात असणार. विवेकने हे पुरते ओळखले होते.
“सुरज तू असा शांत का झालास एकदम? तुला काही माहित आहे का त्या डायरी विषयी? आणि मघाशी कुणासोबत एवढा वेळ बोलत होतास रे? तो तुझा जुना मित्र वगैरे का? तू कधी सांगितलं नाहीस एवढ्या दूर दूर तुझे मित्र आहेत ते... आता सांग नक्की काय भानगड आहे ते...? "
सुरजला डायरीतले गुपित सहजा सहजी सांगायचे नव्हते. म्हणून त्याने नामा निराळा होऊन विषय बदलण्याचा प्रयत्न केला. त्यात सोमेशने वेगळेच पुराण सुरु केले “ तुम्ही कसे लोक आहात? तुम्हाला भूक बिक काही लागत नाही का? किती वेळ झाला आता... बघा जरा... दुपार झाली... अर्धा दिवस संपला.. चला काही तरी खाऊन घेऊयात.”
विषय बदलण्याची ही खूप चांगली संधी होती. सुरजने देखील त्याच्या मागून रीघ ओढली. सगळे उठले आणि ट्रॅव्हलर मधून आणलेला खाऊ सोबत घेऊन हॉस्पिटलच्या कॅन्टीनकडे निघाले. जाता जाता सनिक दादालाही निरोप दिला.
“मी येतो थोड्या वेळाने” म्हणून सनिक दादा ड्रायव्हर काकांकडे गेला. ड्रायव्हर काका अजूनही आराम करत होते. काका औषधांच्या गुंगीत असल्याचे त्याने लांबूनच पाहिले आणि तिथल्या नर्सला,”काकांबरोबरचे आम्ही सगळे कॅन्टीनमध्ये आहोत, काका उठले की त्यांना सांगा आम्ही तिथेच असू”, असा निरोप देऊन ठेवला.
“अजून तासभर तरी ते शुद्धीवर येणार नाहीत" असं सांगत नर्स सलायनमध्ये इंजेक्शन देत होती. सनिक दादा जेवायला कॅन्टीनमध्ये आल्यावर सगळ्यांनी पेटपूजा करायला सुरुवात केली. कुणीही बोलत नव्हते. सगळे आपापल्या जेवणात व्यस्त होते.
जेवणं उरकल्यावर सनिक दादाने ती डायरी काढली. मी सगळ्यांसमोर सुरजला विचारले, “ सुरज, डॉ.सुयश तुला हॉस्पिटलमध्ये भेटले ते गीतांजलीला कसे ओळखतात?"
आता मात्र सुरजची भंबेरी वळली. आपली चोरी पकडली जाणार या भितीने त्याने तोंड उघडले. सनिक दादाही त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. सगळ्यांनी नजरा त्याच्यावर रोखल्या होत्या.
“सुरज काही बोलला नाहीस तर मी सगळ्यांसमोर ही डायरी वाचेन... आणि खरं काय ते लगेच कळेल..." आता सनिक दादा त्याला दटावून विचारत होता.
सुरजने एकदा त्या डायरीकडे पाहिले आणि बोलू लागला, “ही डायरी मी काल इशाच्या बॅगेत पाहिली. तिने जेव्हा इयरफोन घेण्यासाठी मला बॅग दिली त्यात मला ती डायरी सापडली. मी खरंच कुणाची डायरी एवढंच पाहून लगेचच ठेवणार होतो. पण त्यात लिहिलेल्या कविता पाहिल्या आणि पुढं वाचनाचा मोह आवरला नाही. म्हणून एका रात्रीत मी ती संपुर्ण डायरी वाचून काढली.”
विवेक त्याच्यावर भयंकर चिडला होता. “ती डायरी तुला दिलेली नव्हती किंवा तुझी, तुझ्या कोणत्या मित्र-मैत्रिणीची देखील नव्हती. मग तू कशी काय वाचली?
तुला एवढं पण कळत नाही सुरज...” विवेकने त्याची शाळा घ्यायला सुरुवात केली.
मी विचार करू लागले. गीतांजलीची ती डायरी तिने जीवापाड सांभाळली होती. मी त्यातली सुरवातीची काही पाने वाचली होती. पण या डायरीमध्ये नक्कीच काहीतरी तिने असं लिहिले होते, त्यामुळे तिने ती कुणाला वाचायला दिली नसावी. " डायरी इथे आहे म्हणजे गीतांजली तिथे वाड्यात डायरी शोधून गंगारुन गेली असेल " सनिक दादा म्हणला.
" मी फक्त वाचली ती डायरी... माझ्याकडे असं बघू नका सगळे... डायरी तर इशाकडे होती. " सुरज म्हणला.
इशा त्यावर स्वतःचा बचाव करू लागली. तिला शांत करत सोमेश बोलू लागला, “ हो तेही बरोबर आहे. इशा आपलं कच्चं लिंबू आहे. ती असं नाही करणार.”
कच्चं लिंबू म्हटल्यामुळे इशा आणि सोमेशची जुंपायचीच बाकी होती. तोवर सम्या म्हणाला, “कशाला भांडताय..? आपण निघालो तेव्हा कुणी पाहिलं का, की हे कुणी केलं..? शांत व्हा सगळे "
“ सुरज, तू खरंच वाचलीस ही डायरी..! पण आता या डायरीचे करायचे काय ते तूच सांग... आम्ही कुणी वाचली नाही. आता तर परत आपल्याला पुन्हा तिथे जाता येणार नाही ”, सनिक दादाने सुरजला विचारले.
इशा म्हणाली, ”आपण परतीच्या प्रवासात तिला ती डायरी देऊ... तेवढीच आक्काची पण परत भेट होईल.”
“डायरी तर देऊच...पण तुम्हाला माहित आहे का यात गीतांजलीने एक गोष्ट लपवली आहे. तुम्हाला ती गोष्ट जाणून घ्यायची नाही का..? तिचं एक गुपित तिने यात लिहिलं आहे. त्यातला एक दुवा म्हणजेच मला भेटलेला हा सुयश...!” सुरज लगबगीने म्हणाला. सगळे कान देऊन सुरजचे बोलणे ऐकत होते. सुरज सांगू लागला.
-
सुरजचं बोलण ऐकत सनिक दादाच्या मनात सुद्धा काकांच्या अचानक गायब होण्यावरून प्रश्न पडू लागले. तो सुरजच्या शेजारीच पाठ टेकून पडला होता....
-
सूर्य हळूहळू माथ्यावर येत होता. नुकताच सगळ्यांनी चटपटीत भेळीवर ताव मारला होता. जवळपास त्याचा फडशाच पडला आणि इतकी चविष्ट भेळ खाऊन झाल...
-
मी समोर असताना सुयश सांगत होता, “ गीतांजली सोज्वळ, शांत, अल्लड व खूप प्रेमळ मनाची होती. त्या बाहेर भेटलेल्या आजी आजोबांच्या मुल...