सूर्य हळूहळू माथ्यावर येत होता. नुकताच सगळ्यांनी चटपटीत भेळीवर ताव मारला होता. जवळपास त्याचा फडशाच पडला आणि इतकी चविष्ट भेळ खाऊन झाल्यावर सर्वांनीच आक्काच्या पाक कौशल्याचे भरभरून कौतुक केले. सनिक दादा आक्काचं कौतुक ऐकून म्हणाला, “आक्के, अगं एवढं इंप्रेस करशील तर आम्ही इथून पुढच्या प्रवासाला कसं जाणार? जरा आमचा विचार कर... नाहीतर इथून हालायचं नाही बघ कुणी!”
“राहू दे रे सन्या... तुला काय पोटात दुखून राहीलं व्हय... तसं बी तुम्ही नवं पंख फुटलेली पाखर... कुठं कायमचं राहणार गावात.... भिरभिरणाऱ्या पाखरागत उडून जाणार... तेव्हा आलाय तर गप गुमान राव्हा की...?”, आक्का सनिक दादाला आवेगाने म्हणली. आक्काला तेव्हा आपल्या शहरात गेलेल्या मुलांची आठवण झाली. तिचे डोळे आठवणीने भरून आले. सनिक दादाने आक्काला मिठी मारली. भेळ खाऊन झाल्यावर पुढच्या प्रवासाचे नियोजन झाले. संध्याकाळी पुढच्या प्रवासाला निघायचं ठरलं.
सगळ्यांची भेळीवरची पंगत उठली अन् आपापल्या कामाला सगळे गेले. आक्का आणि गीतांजली स्वयंपाक घर आवरुन दुपारचा बेत ठरवत होत्या. सोबतीला सोनल आणि इशा सुद्धा होत्या.
"मुंबईच्या पाहुण्या तुम्ही... सरका चला... तुम्हाला बरं काम करु देईल ही आक्का... " सोनलच्या हातातून परात घेत आक्का म्हणाली.
“आक्का, त्यांनी स्वयंपाक घर बघितलं हेच खूप आहे. बघ कशा पहिल्यांदाच स्वयंपाक घर पाहिल्या सारखं पाहतात ते... करु दे जरा मदत. मी लगेच फोटो काढून स्टोरी टाकतो, बघ कसे पटापट लाईक्स येतील, कॉमेंट्स येतील. ” सोमेश चेष्टेच्या स्वरात म्हणला.
“गप्प रेऽऽऽ, तू तरी केलंस का कधी किचनमध्ये काम? आम्हाला शिकवतोय ! आक्का याला फक्त दोन मिनिटात मॅगी बनवता येते आणि फुकट सल्ले देता येतात. तुम्ही त्याचं काही ऐकू नका.” नाकावरचा शेंडा फुलवून इशा म्हणाली.
“बरं बरं... आता भांडू नका रे... मी सांगते ते करा. त्या सोमेशला घेऊन जा मागच्या अंगणात. तिथं कोथंबीरी लावली आहे. हिरवीगार बघून दहा-बारा कोथंबीरीच्या काड्या आणा. जा रे सोमेश, इशाला शिकव कोथंबीरी कशी निवडायची?” आक्काने आदेश दिला. त्यावर आक्काने दिलेलं टोपलं घेऊन ते दोघे निघाले. निघाताना इशा सोमेशला म्हणाली, “कोथंबीरी म्हणजे काय रे? सोमेशने कॉन्फिडन्सने उत्तर दिलं. "इतकं नाही माहित का तुला? थांब तुला फोटो च दाखवतो. " इशा सोमेशची चेष्ठा मस्करी सुरु होती तसेच ते अंगणात आले आणि कोथिंबीर शोधू लागले.
तेवढ्यात सनिक दादा स्वयंपाक घरात येऊन आक्काला म्हणाला, “आम्ही आज रात्री निघणार आहोत, आक्का... तू काहीतरी हलकंच कर... पुन्हा रात्रीचा प्रवास आहे. उगाच प्रवासात काही बिनसायला नको.”
"व्हय व्हय... एकदम लाईटच करते बघ सन्या... गीते ...सुकवलेली आमसूल ठेवली आहे बघ कपाटाखाली तुझ्या खोलीत. तेव्हढी आणून दे. आमसूल घालून फक्कड रसम भात करु.... " आक्काने गीताला फर्मान सोडलं.
“आणते..." गीतांजलीने होकारार्थी मान हलवली आणि खोलीकडे जायला निघाली. पाहते तर काय! खोलीचं दार सताड उघडं.... आणि आत तिच्या टेबलावर ठेवलेली डायरी हातात घेऊन सुरज उभा होता. त्याला पाहून तिची तळपायाची आग मस्तकात गेली.
“सुरज तू इथे काय करतोय? आणि तू माझी डायरी का घेतलीस? दे ती मला आणि आताच्या आत्ता माझ्या खोलीबाहेर बाहेर जा...”
गीतांजलीचा आवाज ऐकून सगळा गोतावळा खोलीबाहेर जमा झाला. सुरजची जिज्ञासू वृत्ती त्याला महागात पडली आणि तो मान खाली घालून खोलीबाहेर गेला. चोराकडे पहावे तसं सगळे त्याच्याकडे पाहत होते. गीतांजलीचा तो जमदग्नीचा अवतार पाहून सगळेच बुचकळ्यात पडले. कुणाचीच तिच्याजवळ जाण्याची हिम्मत होईना. ती सुरजला वाट्टेल तसे बोलली. स्वतःवरचा ताबा सुटून आणखी काही विपरीत होऊ नये म्हणून इशा आक्काकडे गेली आणि झाला प्रकार तिला धापा टाकत सांगू लागली.
“गीताचं हे नेहमीचंच आहे... कसलं घबाड लपवून ठेवलंय तिथं त्या एकविरेलाच ठाव... गीतेऽऽऽ अगं ए गीतेऽऽऽ आमसूल मिळाली का?” आक्काने आतूनच मोठ्याने हाक मारली. आक्काचा आवाज ऐकून चिडलेली गीतांजली भानावर आली. तिने हातातली डायरी कपाटात दडवून आमसुलाची पिशवी शोधली आणि कुणाशीही काही न बोलता दार लावून खोलीबाहेर पडली. गीतांजलीचे हे डायरी प्रकरण आता फक्त सुरजच्याच नाही तर सगळ्यांच्याच विचाराचे चक्र फिरवू लागले. अजूनही सगळे तिथेच स्तब्ध उभे होते. वादळ येऊन गेल्यावर व्हावी, अगदी तशीच शांतता तिथे पसरली होती. विवेक त्यातल्या त्यात विनोद बुद्धीने वातावरण थोडं नॉर्मल करण्याचा प्रयत्न करु लागला. सुरज आता आणखीनच उद्विग्न झाला. काहीही करुन तिची ती डायरी आपल्या हातात आलीच पाहिजे. तिच्या डायरीची पहिली दोन पानं पाहताक्षणी तो आश्चर्याने चकित झाला होता. तेवढ्यात आक्काने आतून आवाज दिला, “चला जेवायला या सगळे... सन्या घेऊन ये सगळ्यांना... गीता घे वाढायला...चला चला...”
आक्काचा उत्साह पाहता लगेच सगळं पूर्वपदावर आल्यासारखं वाटलं. पंगत बसली. गरमा गरम रस्सम आणि त्याच्या आंबट गोड चवीनं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा राग आणि ताण कुठल्या कुठे पळून गेला होता. सगळ्यांची जेवणं आटोपली आणि पुन्हा एकदा परसात सगळे आडवे झाले. गीतांजलीची “ती” डायरी वाचण्याची माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. न राहून शेवटी तिला विचारले, “तुलाही डायरी लिहायची आवड आहे का? मी पण लिहिते... तुला दाखवू का माझी डायरी ?” मुद्दामच तिच्याकडून डायरीतले गुपित जाणून घेण्याचा एक चोरटा प्रयत्न मी करुन पाहिला. पण तो वर्मावर लागला. मी तिला माझी डायरी दाखवली. तिने जशी माझी डायरी पाहिली तशी ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली. लगोलग तिचीही डायरी तिने माझ्या हातात ठेवली. डायरीचे सुरवातीचे पान तिने छान पानाफुलांनी सजवले होते. त्यालाही छान कणेरीच्या फुलांचा सुगंध येत होता. अगदी तिच्या गूढ अंतरंगाप्रमाणेच तिची ती डायरी होती.
No comments:
Post a Comment