Sunday, 28 April 2024

प्रवासातली गोष्ट : १०

सुरजने गीतांजली विषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली तसे सुयश थोडा गोंधळात पडला होता, " हा सुरज नक्की कोण आहे? मला हे असं अचानक काय विचारतोय? गीतांजलीला हा कसा काय ओळखतो? असा अचानक माझ्यासमोर कसा आला? जान्हवीच्या किंवा आबा आजींच्या ओळखीतला आहे का? अशा असंख्य प्रश्नांनी सुयशला तेव्हा घेरले होते. तरीही तो संयम ठेवून बोलत होता. सुरजच्या प्रश्नांना उत्तर देताना सुयश मध्येच थोडा व्याकुळ होत होता. त्याची ती अगतिकता डोळ्यात साफ दिसत होती. सुयश थोडा भावनिक झाला असला तरी तो गीतांजलीबद्दल हळूहळू बोलायला लागला. सुरजने त्याला स्वतःविषयी आधीच सगळे सांगितले होते.

सुयश आता हळूहळू मोकळेपणाने बोलू लागला होता. थोड्याच वेळात ते एकमेकांचे खूप जवळचे मित्र असल्यासारखे एकमेकांशी बोलत होते. सुयशचा स्वभाव तसाच लाघवी आणि प्रेमळ होता, दुधात साखर मिसळावी तसा तो समोरच्याला क्षणभरात आपलेसे करुन घ्यायचा. म्हणून त्याने उपचार केलेल्या रुग्णामध्ये त्याचे नाव तोंडावर होते. प्रत्येक रुग्ण त्याची कायम आठवण ठेवत असे. हे सारं गीतांजलीने तिच्या डायरीत अचूक टिपलं होतं.  हॉस्पिटल मधल्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल सुरजला तो अगदी आत्मियतेने सांगत होता. सुरजचे पूर्ण लक्ष आता त्याच्या बोलण्याकडे होते. सुयश भूतकाळात पुरता बुडाला होता.  सुयश सुरजला सांगू लागला,

“ जेव्हा गीतांजली या हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा मी आणि गीतांजली आम्ही दोघं एका पेशन्टवर  उपचार करत होतो. ती मला त्यात असिस्ट करत होती. ती पेशन्ट म्हणजे जान्हवी. अशी आमची पहिली भेट झाली. गीतांजलीला मी पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो,  कारण तिचे सौंदर्य मनाला भुरळ घालणारे होते. गीतांजलीचा गोरा रंग, लांब काळेभोर केस, रेखीव डोळे, सरळ नाक व नाजूक गुलाबी ओठ, चेहरा नेहमी हसतमुख अशी चुणचुणीत मुलगी कोणाला आवडणार नाही! मी तर बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलो !” हे सांगता सांगताच  सुयशने त्याच्या प्रेमाची कबुली दिली.
सुरजने गीतांजलीला पाहिले असताना देखील सुयशच्या तोंडून तिचे वर्णन ऐकताना त्याला अलौकिक आणि सुंदर वाटत होते.
तिथे सुरज आणि सुयशची चर्चा सुरु होती. आणि इथे पारावर बसलेल्या सर्वांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. तेव्हाच सनिक दादाच्या लक्षात आले कि काही जण तिथे नाहीत. “अचानक हा सुरज कुठे गायब झाला रे..?", सनिक दादाने विवेकला विचारले.
मी अजून ही तिथेच सुयशच बोलणं शांतपणे ऐकत होते. अचानक तेव्हाच माझा फोन वाजला, सनिक दादानं चौकशी केली आणि मला तिथे लवकरात लवकर यायला सांगितले.  क्षणभराची चुकामुक झाली. सुरज तेव्हाच अचानक नजरेआड झाला. शेवटी मी पुन्हा आपल्या पारावरच्या मंडळीकडे परतले.

सुरज विषयी पारावर चर्चा रंगली होती. तेव्हा मी सुरज विषयी बोलणे टाळले. काकांना पाहायला काही जण त्यांच्या वार्डात जाणार होते. मी आणि काही जण तिथेच थांबलो. बाकीचे हॉस्पिटल मध्ये गेले.
तिथे लांबूनच रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येत होता. एक ॲक्सीडेंटची केस तिथे आली होती. आम्ही तिथेच जवळपास फेऱ्या मारत होतो. स्ट्रेचरवरील वरील माणसाला खूप लागले होते. एक बाई आणि तिच्यासोबत एक लहान मुलगी त्याच्या मागोमाग जात होत्या. लहान मुलगी मोठमोठ्याने रडत होती. बाईचा पदर तिने हातात गच्च धरला होता.
त्या जखमी व्यक्तीला आत नेताना त्या बाईने माझ्याकडे विनवणी केली, “थोडा वेळ तिला इथे थांबवून ठेवू का? मी आत जाते.... तिला सांभाळशील का...? अगदी थोडा वेळ... प्लिज...”
तिचा तो मदतीसाठी आक्रोश पाहून मला ओशाळल्यासारखे झाले. नाही म्हणण्यासाठी माझी जीभ तेव्हा धजावली नाही. त्या मुलीला कडेवर घेऊन तिथून दूर घेऊन गेले. तिची समजूत काढता काढता मी हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूला येऊन पोहोचले. परत जाण्याची वाट शोधता शोधता मला समोर सुरज दिसला. तेव्हा हायसं वाटलं, त्याला हाक मारली. सुरजने लगेच वळून पाहिलं. तेव्हा त्याने माझी सुयश सोबत ओळख करुन दिली.   

Thursday, 25 April 2024

प्रवासातली गोष्ट : ९


थोड्या वेळाने काकांना झोप लागली. आम्ही तिथून हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या गोल पारावर येऊन बसलो. पुढच्या प्रवासाबद्दल सर्वांची चर्चा सुरु होती. तेव्हा दुरून च मी सुरजला ओळखले. तो कुणाला तरी शोधत होता. तो संपूर्ण हॉस्पिटल  फिरून आला होता. आम्ही समोर बसलेले पाहून सुद्धा तो तिथे आला नाही. मी त्याच्या पाठोपाठ गेले. पहिल्या मजल्यावर तो अगदी माझ्या समोर होता, मी त्याला हाक मारणार तोच  ढाब्यावर भेटलेले आजी आजोबा सुरजला तिथे दिसले. तो त्यांच्याशी बोलू लागला. मी दुरून पाहत होते. सुरजला त्या आजोबांनी ओळखले नाही पण आजींनी त्याच्याशी संवाद साधला. आजोबा त्याला विचारू लागले,

“अरे, तू कोण? मला कशाला दवाखान्यात घेऊन निघाला...? मी तर हिला भेटायला आलोय... कोण गं ती...? आपली ही... काय बरं नाव तिचं...? अरे मी पुन्हा विसरलो की काय...?"

असं म्हणत त्यांनी शर्टाचा खिसा चाचपडायला सुरुवात केली. खिशातून त्यांनी आपल्या सुनेचा फोटो काढला. तो फोटो त्यांनी सुरजला दाखवला. त्यांच्या या गांगरून जाण्याने आजीही गोंधळल्या होत्या. तितक्यात एक उंचपुरा, उमदा, गोरा, मिशी असलेला साधारण वीशी - पंचवीशीतला तरुण पळत आला. त्यानं लगबगीनं आजोबांचा हात हातात घेतला, 

“आबा तुमचीच वाट पाहत होतो. मी सुयश, जान्हवीचा भाऊ.... जान्हवी... तुमची सुन... ऍडमिट आहे ना इथं..." आजोबा आजीच्या चेहऱ्यावर समाधानाची किनार आली.
“अरे हो, आपण जान्हवीलाच तर भेटायला आलो.” असं म्हणत त्यांनी सुरजला टाळी दिली.
पण दुसऱ्याच क्षणी ते सुरजकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. तसा तो गडबडला, सुयशही गडबडला, त्यालाही काही समजेना. “मित्रा काय हवंय तुला ? आजी आजोबा एकटे असं समजू नको !” सुरज कुणीतरी भामटा आहे असं समजून सुयशने त्याला चांगलंच दमात घेतलं. मग सुरजने आपली ओळख करुन देत ढाब्यावर झालेला किस्सा आणि ड्रायव्हर काकांना लागल्याचं सांगितलं.

तिथून बोलतच ते चौघं जान्हवीच्या वार्डमध्ये गेले. जान्हवी नुकतीच झोपेतून उठली होती. समोर सासू सासऱ्यांना पाहून तिचे डोळे आनंदाने भरुन आले. सुरजला देखील ते सगळं पाहून गलबलून आलं. इतका भाव त्या प्रसंगात दाटला होता. नेहमी अशावेळी सुयश जान्हवी आणि तिच्या सासू सासऱ्यांना एकांत देत असे.

“चल मित्रा, आपण बाहेर बसू." असे म्हणून त्यानं सुरजच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला खोली बाहेर घेऊन आला. बोलबच्चन सुरज आता त्याच्या मुळ स्वभावावर आला. आपली ट्रीप, टिम, मुक्काम केलेलं आक्काचं गाव याबद्दल तो बोलू लागला. आक्काच्या गावाचा उल्लेख झाला तसा सुयश चमकला. त्याची बेचैनी आता सुरजला चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. काहीतरी गौडबंगाल आहे हे त्याच्या लक्षात आलं. रात्रभर वाचलेली डायरी त्याच्यापुढे होती. हे त्याच्या लक्षात आलं. क्षणाचाही विलंब न करता आणि कोणतीही मर्यादा न ठेवता सुरजने सुयशला गीतांजलीविषयी विचारले. सुयश क्षणभरासाठी व्याकूळ झाला. त्याला काय बोलावं ते सुचेना. तो निःशब्द झाला. सुयश काही बोलत नाही हे पाहून सुरजने आक्काच्या घरचे किस्से, प्रवासातले काही प्रसंग सांगायला सुरूवात केली तेव्हा कुठे सुयश भानावर आला. त्याचं मन भूतकाळात गिरक्या घेऊ लागलं. गीतांजली बद्दल ऐकल्यावर तिचा सहवास आणि तिच्या सर्व आठवणी सुयशच्या डोळ्यात दाटून आल्या.

Saturday, 20 April 2024

प्रवासातली गोष्ट : ८


ट्रॅव्हलरमध्ये चढल्यावर सर्वांनी आपापल्या जागा घेतल्या आणि गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. वाड्यापासून गाडी जसजशी दूर जात होती, तसा आक्काचा आणि गीतांजलीचा निरोपाचा हात अंधुक होत गेला. हळूहळू तो ही दिसेनासा झाला.  तो निरोपाचा हात पुन्हा येण्यासाठी होता, याची कोणाला कल्पना ही नव्हती. त्या वाड्याची, गीतांजलीची पुन्हा भेट होणार हेच तिथल्या भिंती, तो भयाण काळोख आणि ती वेळ सांगत होती.

बघता बघता गाव मागे गेलं. दोन दिवसांच्या आठवणी आमच्या मनात आणि कॅमेरात कैद झाल्या होत्या. त्याचीच उजळणी मनात सुरु होती. वाड्यात काढलेले फोटो स्मार्टफोनमध्ये पुन्हा पुन्हा पाहत होतो, त्याविषयी बोलत होतो. गाणी, मजा, मस्ती सगळं सुरु होतं. हळूहळू सर्वजण झोपेच्या अधिन झाले.

सुरजला नेमकं तेव्हाच गाणी ऐकायची लहर आली. त्याचा जिगरी दोस्त अनिरुद्ध शेजारीच बसलेला होता. त्याने त्याला गाणी गाण्याची फर्माईश केली. अनिरुद्धने गायला सुरुवात केली, बराच वेळ मैफिल रंगली पण सूरजचे मन काही भरत नव्हते. शेवटी वैतागून अनिरुद्ध म्हणाला, “ मला आता झोप येतेय. कुणी गाणी गाण्यासाठी उत्सुक असेल तर जा, मागे विचार " आणि डोळे बंद करुन तो झोपला. बिचारा सुरज... शेवटी फोनमधली गाणी मोठ्या आवाजात लावून ऐकू लागला. मागच्या पुढच्या सर्वांनाच त्याची ती गाणी ऐकू जात होती.

“सो गया ये जहा... सो गया आसमा...” मागे अर्धवट झोपेत असलेली इशा खाड्कन जागी झाली आणि सुरजवर खेकसली, “तुला गाणीच ऐकायचीत ना...हे घे माझे हेडफोन, यावर ऐक... अख्ख्या गावाला ऐकवून जागं करु नकोस...”
इशाने त्याच्या बाजूने भिरकावलेली बॅग त्याने कॅच केली. त्यात तो हेडफोन शोधू लागला. बॅग अगदीच काठोकाठ भरली होती. त्याने बॅगेत हात घातला. हाताला हेडफोन काही लागला नाही, पण एक डायरी मात्र लागली. नंतर लक्षात आले की, हिच ती गीतांजलीची डायरी! त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो ती डायरी न्याहाळू लागला. कधी एकदा डायरी वाचतो असे काहीसे त्याला झाले. बघता बघता त्याने संपूर्ण डायरी रात्रभर जागून वाचून काढली. अंधार धूसर होत चालला होता. सूर्याची किरणे खिडकीच्या काचेतून आत येऊन एकेकाला उठवत होती. मागून येणाऱ्या एका गाडीच्या कर्कश्श हॉर्नच्या आवाजाने गाडीतले बरेचसे नवोदित ट्रेकर्स जागे झाले. तेव्हाच सुरजने लगबगीने गीतांजलीची ती डायरी पुन्हा होती तशीच इशाच्या बॅगेत ठेऊन दिली. कोणालाही त्या गोष्टीची खबर नव्हती. सुरज पुर्ण रात्र जागल्याने त्याच्या डोळ्यात आता झोप मावत नव्हती. बघता बघता त्याचा डोळा लागला. सकाळचे नऊ-दहा वाजले असतील, पूर्ण रात्र प्रवास करुन सगळेच दमले होते. कुठेतरी थांबून चहा नाष्टा करावा असे सगळ्यांचेच मत झाले. ड्रायव्हर काकांनी एक हॉटेल वजा ढाबा शोधला आणि रस्त्याच्या शेजारी गाडी लावली. सगळे खाली उतरले. सुरज तेवढा गाढ झोपेत होता. मी निघताना इशाची बॅग सुरज जवळ पाहिली होती.
सगळे खाली उतरले. तेव्हा मी इशाला बॅगविषयी विचारले, “त्याला गाणी ऐकायला हेडफोन हवे होते, म्हणून मीच सगळी बॅग सुरजकडे दिली” असं ती म्हणली. ज्या अर्थी सुरज ती बॅग इतकी कवटाळून बसला होता त्याअर्थी नक्कीच तिच्यात काहीतरी गौडबंगाल असणार असा मी अंदाज बांधला. समोरुन सुरजला येताना पाहून मी माझ्या मनातल्या प्रश्नांची सरबत्ती तात्पुरती बंद केली. आम्ही एक टेबल हेरले आणि बसलो. सर्वांसाठी चहा आणि नाश्त्याची ऑर्डर दिली गेली. आम्ही त्याची वाट पाहत होतो. तेव्हाच आमच्या समोर एक वृद्ध जोडपे येऊन बसले. त्यांचा थकलेला चेहरा बघून बऱ्याच लांबून आल्यासारखे वाटत होते. त्यांना धाप लागलेली होती. तेव्हा तिथल्या केअर टेकरने त्यांना पाणी दिले. थोडा वेळ ते तिथेच बसले. बाहेरचे रखरखते ऊन त्यांना मानवत नसावे. आम्ही शेजारी आमच्याच बोलण्यात दंग होतो. बसलेल्या आजोबानी तिथल्या हॉटेलच्या केअर टेकरला विचारले, " आम्हाला शुश्रूषा क्लिनिकला जायचे आमची सून आहे तिकडे... आम्हाला कुठे आहे ते सांगता का? सांगा ना दादा... "  केअर टेकरने त्यांना त्या दिशेने बोट दाखवत म्हणले, " यही रास्ते से आगे जाओ नानाजी... नजदिक ही है "  आमचे लक्ष त्या केअर टेकर कडे गेले. “हर बार ये साहब यही पता पुछते हैं और हर बार उन्हें यही पता मै बताता हूँ। पता नहीं कैसी परीक्षा ले रहे है भगवान इनकी...।” केअर टेकर पुटपुटत आमच्या समोरून गेला.
मी त्यांच्यासोबत आलेल्या आजींना त्या क्लिनिक आणि त्यांच्याबद्दल  विचारले तेव्हा कळले कि वृद्धापकाळात त्यांना स्मृतीभ्रंशाने ग्रासले होते. कोणतीही गोष्ट घटकाभरात त्यांच्या स्मृतीतून विरुन जायची. शुश्रुषा क्लिनिकचे नाव ऐकल्यावर सुरज मधला आइनस्टाईन जागा झाला आणि त्याने केअर टेकरला जवळपास दहा पंधरा मिनिटे प्रश्न विचारून चांगलेच भंडावून सोडले. डोक्यावर चढलेलं उन्हं पाहून ड्रायव्हर काकांनी गाडीचा हॉर्न वाजवून सगळयांना येण्याचा इशारा केला. सर्वात आधी गाडीत जाऊन इशाची बॅग माझ्या सीट शेजारी ठेवली. सगळे आपापल्या जागेवर बसले तरी सुरजचा अजूनही पत्ता नव्हता. शेवटी अनिरुद्ध त्याला शोधायला पुन्हा खाली उतरला आणि सोबत घेऊनच आला.

सुरजने शुश्रूषा नर्सिंग होमची जवळपास सगळीच माहिती काढली होती. यशस्वी कामगिरी झाल्याचा अविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. जिथून ट्रेक सुरु होणार होता त्या कड्यापाशी पोहोचायला आम्हाला अजून तीन-चार तास लागणार होते. रस्ता गावातून होता, पक्के डांबरीकरणही झालेले दिसत नव्हते. गाडी हेलकावे घेत रस्ता कापत होती. आतमध्ये आम्ही धक्के खात लवकर या गावातून बाहेर पडण्याची वाट पाहत बसलो होतो.  अशा प्रवासात एक उसाच्या दांड्यांनी भरलेला ट्रॅक्टर मागून येऊन ओव्हरटेक करुन पुढे गेला. जाताना नेमका तो आमच्या गाडीच्या पुढच्या बाजुला हलकीशी धडक देऊन गेला. ड्रायव्हर काकांनी तात्काळ ब्रेक दाबला.  पुढच्या सीटवर बसलेले समीर, सुमय्या, लता पुढे आदळले. त्यांना मुका मार लागला.  ड्रायव्हर काकांच्याही पायाला क्लचच्या शेजारी असलेल्या पत्र्याने जखम झाली. त्यामुळे गाडी सुरु केल्यावर त्यांना व्यवस्थित गाडी चालवता येईना. सनिक दादाने खाली उतरुन त्या ट्रॅक्टरचा नंबर नोट केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ट्रॅक्टर चालकाने केव्हाच तिथून पोबारा केला होता. सनिक दादाने ड्रायव्हर काकांच्या पायाला एक ओढणी बांधली, मलम पट्टी करून प्रथमोपचार केले. पण जखम खोलवर असल्याने दवाखाना गाठणे जरुरीचे होते. तेव्हा सुरजला ढाब्यावर झालेला संवाद आठवला. त्याने सनिक दादाला सांगितले, " तिथून पंधरा मिनिटांच्या अंतरावर शुश्रूषा क्लिनिक आहे आणि ते या परिसरातले एकच चांगले हॉस्पिटल आहे. "  

सनिक दादाने स्टेअरिंगचा ताबा घेतला व गाडी शुश्रूषा क्लिनिकच्या मार्गाला लागली. क्लिनिकजवळ पोहचताच आम्ही सगळे गाडीतून उतरलो. गाडी लॉक करुन सनिक दादा सुरजसोबत हॉस्पिटलच्या प्रवेशदाराशी आला. ड्रायव्हर काकांना घेऊन विवेक अपघात कक्षात गेला. सनिक दादाने काकांचा रिसेप्शनमध्ये नंबर लावला. तो पर्यंत डॉ. राजेश कुलकर्णी राउंडला आले होते. नर्स ने इतरांवर उपचार झाले. डॉक्टरांनी काकांची जखम पाहिली. ड्रायव्हर काकांची जखम खोलवर होती आणि वेदनाही प्रचंड होत होत्या. डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार काकांना वेगळया वार्डात ॲडमिट देखील करण्यात आले. आम्ही सर्वजण काकांच्या जवळच थांबलो होतो. सुरज मात्र आमच्यात नव्हता. तो कुठे होता याचा कोणालाच पत्ता नव्हता.

Thursday, 11 April 2024

प्रवासातली गोष्ट : ७

सगळ्यांची जेवणं आटोपली. आक्का सगळ्यांना बडीशेप देऊ लागली.  त्यावेळी गीतांजली मला तिच्यासोबत तिच्या खोलीजवळ घेऊन आली. आम्ही तिथून गेल्याचे सुरजच्या लक्षात आले.  तो आक्काला म्हणाला, “आक्का, मला बडीशेपचा डब्बा द्या, मी सगळ्यांना देतो. लहानपणापासून घरी बडीशेपचा डबा हातात मिरवत मी च सर्वांना वाटायचो. आणा इकडे, मी देतो सर्वांना..."

सोमेशच्या जवळ आल्यावर सुरज चेष्टेने त्याच्याकडे पाहून म्हणाला, “ पोटभर जेवण झालं ना...सोम्या ” इशा संधीचा फायदा घेत म्हणली,

”मला दे... माझं झालंय जेवण कधीचंच...” सुरजने सगळ्यांना बडीशेप दिली. मी आणि गीतांजली तिथे नसल्याचे लक्षात आल्यावर आम्ही कुठे आहोत हे पाहण्यासाठी बडीशेपचा डबा घेऊन तो तिथून निघाला. सुरज बडीशेप घेऊन गीतांजलीच्या खोलीजवळ आला. आता त्याच्याकडे बडीशेप द्यायचं वजनदार कारण होतं. तरीही तो चोरपावलांनी आला आणि तिथेच थांबला. गीतांजली मला तिच्या डायरीमधील, जमवलेल्या वेगवेगळ्या पाना-फुलांच्या नक्षी आणि कलाकुसर दाखवत होती. इतक्यात मागच्या काही पानावर फक्त पिवळ्या लाल केशरी रंगाची गुलमोहराची फुलं ठेवलेली दिसली... बरीच होती. त्यात तिने लिहिलेल्या गुलमोहराच्या झाडाचे सुरेख वर्णन आणि कविता देखील मला वाचायला दिली.

आज वळणाच्या वाटेवर बहरलेला गुलमोहर
लाल, नारंगी रंगाच्या सड्याची आली अंगणी सर
पहाटेच्या किरणांनी रातराणी ही मिटली
कोवळ्या हिरव्या पानात जाई अबोली भेटली
डौलदार पिंपळाची पाने दवात न्हाली
सारा आळस सारुन शुभ सकाळ जाहली
साद देतात पाखरे आज खिडकी आडून
रंग भरला अंगणी सडा रांगोळी घालून
उठा आता तरी सारी सृष्टी ही जागली
आकाशी ही इंद्रधनूची कमान रंगली
 
इतके बारीक निरीक्षण आणि त्यावर इतकी सुंदर कविता... हे गुलमोहराचे झाड तिच्या खूपच जवळचे होते, मी ती कविता वाचून गीतांजलीला त्या झाडाबद्दल विचारले.

पूर्वी मला फुललेला गुलमोहर दिसला की लगेच माझं मन तिथं आकर्षित व्हायचं. मी लहान असताना दादा आणि मी मिळून मागच्या  अंगणात गुलमोहराचे झाड लावले होते. माझ्याबरोबरच ते झाडही मोठे होत होते, विस्तारत होते. त्याच्या फांद्यांनी माझ्या बालपणी मला उंच भरारी घ्यायला शिकवले. नंतर दादा शिक्षणासाठी गाव सोडून शहरात गेला तो कायमचाच. मग मी देखील काम शोधायला या चार भिंतींच्या बाहेर पडले.” गीतांजली सांगू लागली.
 
“मग... त्या गुलमोहराचं काय झालं?” मी मध्येच अडवत विचारलं.

 “मी इथून दहा मैलावर असणाऱ्या शुश्रूषा क्लिनिक आणि नर्सिंग होममध्ये कामाला लागले. ते क्लिनिक आड रस्त्याला असल्यामुळे रोजचं येणं जाणं अवघड झालं होतं. शेवटी आक्काच्या म्हणण्यानुसार मी दोन वर्ष तिथेच राहून नोकरी करायचे ठरवले.”

“आणि मग इथे वाड्यावर आक्का एकटीच...?” मी न राहवून पुन्हा तिला विचारले.

 “आक्काला भेटायला महिन्यातून एकदा येणं जाणं केलं आणि पैसे ही पाठवत होते. तेव्हाच एक दुर्घटना घडली. वादळी पावसामुळे अंगणातल्या गुलमोहराची एक
फांदी कोसळून आक्काच्या अंगावर पडली.  तिला मुका मार लागला.”

“अरेरेऽऽऽ मग...?” मी दुःखं व्यक्त करत तिला विचारले.

 " त्या गुलमोहराच्या झाडावर माझा आधीपासूनच जीव होता त्यामुळे मला काही कळू न देता आक्काने ही गोष्ट फक्त दादाला सांगितली. दादाने पत्रानेच तिला उत्तर कळवले, “इतका त्रास होतोय तर ते झाड काढून टाक, तब्येतीची काळजी घे... झाड काय... पुन्हा लावता येईल..!”

 आक्काने त्यानंतरही मला काही कळू दिले नाही. अखेर ते झाड कापून नेल्यावर शेजारच्या गणेशने सर्व हकीकत मला सांगितली. आक्काला पाहायला मी तशीच तडक वाड्याकडे धाव घेतली. तोपर्यंत आक्का ठीक झाली होती. लागलेल्या जागी थोडी अधून मधून सूज येऊन ठणका बसतो म्हणाली.

"एकदा कळवायचं होतंस ना आक्का...” मी तिला निराशेच्या स्वरातच बोलले.

ते झाड आता तिथे नाही. त्यानंतर तिथे मी एकही झाड लावलं नाही. किंबहूना मला लावावसं कधी वाटलंच नाही..."

गीतांजलीला माझ्या मनातलं कुतूहल म्हणून मी विचारले, “ पण आपलं एखाद्या झाडाशी एवढं घनिष्ठ नातं कसं बरं जोडलं जाऊ शकतं..?” 

मी मनोमन विचार करु लागले. नक्कीच भूतकाळात काहीतरी मागे राहिले असणार? दारावरच्या टकटक आवाजाने आम्ही दोघी भानावर आलो आणि बघते तर काय? सुरज बडीशेप घेऊन दारात उभा होता. मी त्याला काही बोलण्याआधीच गीतांजली त्याच्यावर खेकसली.

 “तू परत आलास इथे?”.

“ही बघ बडीशेप, तीच दयायला आलोय.” दोन पाऊल मागे जाऊन सुरजने तोंड उघडले.

गीतांजलीने माझ्याकडे दिलेल्या डायरीवर नजर फिरवली “तू मला थोड्या वेळाने दे ही डायरी. आता ठेव तुझ्याकडे.” असं म्हणत विषय बदलला. सुरजने आम्हाला बडीशेप दिली आणि आम्ही तिघेही गीतांजलीच्या खोलीतून बाहेर पडलो. पोटभर जेवणानंतर सगळेच आराम करत होते.

हळूहळू अंधार पडू लागला होता. रात्रीच्या प्रवासाची तयारी करुन मी डायरी वाचरणारच होते. गीतांजलीची डायरी वाचण्यासाठी मी माझ्या बॅगजवळ ठेवली. अचानक दिवे गेले आणि चुकून माझ्या बॅगेवर ठेवलेली डायरी कुणाच्या तरी धक्याने इशाच्या बॅगेत कधी गेली कळलंच नाही. सगळी आवरा आवर अजून बाकी होती. सगळेच त्यात गुंतलेले होते.

उघडूनही न पाहिलेली ती गूढ डायरी अजूनही तिच्या बॅगेत आहे हे कोणालाच कळले नव्हते. गीतांजलीलाही नाही. रात्रीचे आठ वाजले, आमची निघायची वेळ झाली. सगळीकडे गुडूप्प अंधार, काळाकुट्ट काळोख. पण आता निघणे गरजेचे होते. नाहीतर आम्ही केलेले सर्व नियोजन कोलमडले असते. आम्हाला अंधारात वाड्याबाहेर जाऊ द्यायचं, आक्काला बरोबर वाटत नव्हतं. तिचं मन तयार होईना. पण सनिक दादाने आक्काची समजूत काढली. आम्ही सामान बांधले. आक्काचा आणि गीतांजलीचा निरोप घेऊन अखेर आम्ही वाडा सोडला.

Tuesday, 9 April 2024

प्रवासातली गोष्ट : ६

सूर्य हळूहळू माथ्यावर येत होता. नुकताच सगळ्यांनी चटपटीत भेळीवर ताव मारला होता. जवळपास त्याचा फडशाच पडला आणि इतकी चविष्ट भेळ खाऊन झाल्यावर सर्वांनीच आक्काच्या पाक कौशल्याचे भरभरून कौतुक केले. सनिक दादा आक्काचं कौतुक ऐकून म्हणाला, “आक्के, अगं एवढं इंप्रेस करशील तर आम्ही इथून पुढच्या प्रवासाला कसं जाणार? जरा आमचा विचार कर... नाहीतर इथून हालायचं नाही बघ कुणी!”

“राहू दे रे सन्या... तुला काय पोटात दुखून राहीलं व्हय... तसं बी तुम्ही नवं पंख फुटलेली पाखर... कुठं कायमचं राहणार गावात.... भिरभिरणाऱ्या पाखरागत उडून जाणार... तेव्हा आलाय तर गप गुमान राव्हा की...?”, आक्का सनिक दादाला आवेगाने म्हणली. आक्काला तेव्हा आपल्या शहरात गेलेल्या मुलांची आठवण झाली. तिचे डोळे आठवणीने भरून आले. सनिक दादाने आक्काला मिठी मारली. भेळ खाऊन झाल्यावर पुढच्या प्रवासाचे नियोजन झाले. संध्याकाळी पुढच्या प्रवासाला निघायचं ठरलं.

सगळ्यांची भेळीवरची पंगत उठली अन् आपापल्या कामाला सगळे गेले. आक्का आणि गीतांजली स्वयंपाक घर आवरुन दुपारचा बेत ठरवत होत्या. सोबतीला सोनल आणि इशा सुद्धा होत्या.

"मुंबईच्या पाहुण्या तुम्ही... सरका चला... तुम्हाला बरं काम करु देईल ही आक्का... " सोनलच्या हातातून परात घेत आक्का म्हणाली.

“आक्का, त्यांनी स्वयंपाक घर बघितलं हेच खूप आहे. बघ कशा पहिल्यांदाच स्वयंपाक घर पाहिल्या सारखं पाहतात ते... करु दे जरा मदत. मी लगेच फोटो काढून स्टोरी टाकतो, बघ कसे पटापट लाईक्स येतील, कॉमेंट्स येतील. ” सोमेश चेष्टेच्या स्वरात म्हणला.

“गप्प रेऽऽऽ, तू तरी केलंस का कधी किचनमध्ये काम? आम्हाला शिकवतोय ! आक्का याला फक्त दोन मिनिटात मॅगी बनवता येते आणि फुकट सल्ले देता येतात. तुम्ही त्याचं काही ऐकू नका.” नाकावरचा शेंडा फुलवून इशा म्हणाली.

“बरं बरं... आता भांडू नका रे... मी सांगते ते करा. त्या सोमेशला घेऊन जा मागच्या अंगणात. तिथं  कोथंबीरी लावली आहे. हिरवीगार बघून दहा-बारा कोथंबीरीच्या काड्या आणा. जा रे सोमेश, इशाला शिकव कोथंबीरी कशी निवडायची?” आक्काने आदेश दिला. त्यावर आक्काने दिलेलं टोपलं घेऊन ते दोघे निघाले. निघाताना इशा सोमेशला म्हणाली, “कोथंबीरी म्हणजे काय रे? सोमेशने कॉन्फिडन्सने उत्तर दिलं. "इतकं नाही माहित का तुला? थांब तुला फोटो च दाखवतो. " इशा सोमेशची चेष्ठा मस्करी सुरु होती तसेच ते अंगणात आले आणि कोथिंबीर शोधू लागले.
तेवढ्यात सनिक दादा स्वयंपाक घरात येऊन आक्काला म्हणाला, “आम्ही आज रात्री निघणार आहोत, आक्का... तू काहीतरी हलकंच कर... पुन्हा रात्रीचा प्रवास आहे. उगाच प्रवासात काही बिनसायला नको.”

"व्हय व्हय... एकदम लाईटच करते बघ सन्या... गीते ...सुकवलेली आमसूल ठेवली आहे बघ कपाटाखाली तुझ्या खोलीत. तेव्हढी आणून दे. आमसूल घालून फक्कड रसम भात करु.... " आक्काने गीताला फर्मान सोडलं.
“आणते..." गीतांजलीने होकारार्थी मान हलवली आणि खोलीकडे जायला निघाली. पाहते तर काय! खोलीचं दार सताड उघडं.... आणि आत तिच्या टेबलावर ठेवलेली डायरी हातात घेऊन सुरज उभा होता. त्याला पाहून तिची तळपायाची आग मस्तकात गेली.

“सुरज तू इथे काय करतोय? आणि तू माझी डायरी का घेतलीस? दे ती मला आणि आताच्या आत्ता माझ्या खोलीबाहेर बाहेर जा...”

गीतांजलीचा आवाज ऐकून सगळा गोतावळा खोलीबाहेर जमा झाला. सुरजची जिज्ञासू वृत्ती त्याला महागात पडली आणि तो मान खाली घालून खोलीबाहेर गेला. चोराकडे पहावे तसं सगळे त्याच्याकडे पाहत होते. गीतांजलीचा तो जमदग्नीचा अवतार पाहून सगळेच बुचकळ्यात पडले. कुणाचीच तिच्याजवळ जाण्याची हिम्मत होईना. ती सुरजला वाट्टेल तसे बोलली. स्वतःवरचा ताबा सुटून आणखी काही विपरीत होऊ नये म्हणून इशा आक्काकडे गेली आणि झाला प्रकार तिला धापा टाकत सांगू लागली.

“गीताचं हे नेहमीचंच आहे... कसलं घबाड लपवून ठेवलंय तिथं त्या एकविरेलाच ठाव... गीतेऽऽऽ अगं ए गीतेऽऽऽ आमसूल मिळाली का?” आक्काने आतूनच मोठ्याने हाक मारली. आक्काचा आवाज ऐकून चिडलेली गीतांजली भानावर आली. तिने हातातली डायरी कपाटात दडवून आमसुलाची पिशवी शोधली आणि कुणाशीही काही न बोलता दार लावून खोलीबाहेर पडली. गीतांजलीचे हे डायरी प्रकरण आता फक्त सुरजच्याच नाही तर सगळ्यांच्याच विचाराचे चक्र फिरवू लागले. अजूनही सगळे तिथेच स्तब्ध उभे होते. वादळ येऊन गेल्यावर व्हावी, अगदी तशीच शांतता तिथे पसरली होती. विवेक त्यातल्या त्यात विनोद बुद्धीने वातावरण थोडं नॉर्मल करण्याचा प्रयत्न करु लागला. सुरज आता आणखीनच उद्विग्न झाला. काहीही करुन तिची ती डायरी आपल्या हातात आलीच पाहिजे. तिच्या डायरीची पहिली दोन पानं पाहताक्षणी तो आश्चर्याने चकित झाला होता. तेवढ्यात आक्काने आतून आवाज दिला, “चला जेवायला या सगळे... सन्या घेऊन ये सगळ्यांना... गीता घे वाढायला...चला चला...”

आक्काचा उत्साह पाहता लगेच सगळं पूर्वपदावर आल्यासारखं वाटलं. पंगत बसली. गरमा गरम रस्सम आणि त्याच्या आंबट गोड चवीनं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा राग आणि ताण कुठल्या कुठे पळून गेला होता. सगळ्यांची जेवणं आटोपली आणि पुन्हा एकदा परसात सगळे आडवे झाले. गीतांजलीची “ती” डायरी वाचण्याची माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. न राहून शेवटी तिला विचारले, “तुलाही डायरी लिहायची आवड आहे का? मी पण लिहिते... तुला दाखवू का माझी डायरी ?” मुद्दामच तिच्याकडून डायरीतले गुपित जाणून घेण्याचा एक चोरटा प्रयत्न मी करुन पाहिला. पण तो वर्मावर लागला. मी तिला माझी डायरी दाखवली.  तिने जशी माझी डायरी पाहिली तशी ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली. लगोलग तिचीही  डायरी तिने माझ्या हातात ठेवली. डायरीचे सुरवातीचे पान तिने छान पानाफुलांनी सजवले होते. त्यालाही छान कणेरीच्या फुलांचा सुगंध येत होता. अगदी तिच्या गूढ अंतरंगाप्रमाणेच तिची ती डायरी होती.