Sunday, 21 July 2024

प्रवासातली गोष्ट : २२


सर्वजण जेवायला सुरवात करणार तितक्यात सनिक दादाचा फोन वाजला. सनिक दादाने तो उचलायच्या आधीच सुरजने त्यावर झडप घातली.
“ मी उचलतो थांब ”
“हॅलोऽऽऽ मी सुयश...” पलीकडून आवाज आला आणि सुयशचा आवाज ऐकून सुरजचा जीव भांड्यात पडला.
“अरे होऽऽऽ मी सुरज बोलतोय. किती वेळ लागतोय तुम्हाला पोहोचायला? आता कुठे आहात? आणि ड्रायव्हर काका आहेत ना व्यवस्थित?”
सुरज थोड्या दबक्या आवाजातच बोलत होता. अजूनही सनिक दादाला सुरज नक्की कुणाशी बोलतोय हे समजले नव्हते.  सनिक दादाने बसल्या जागेवरूनच सुरजला विचारले, “सुरजऽऽऽ कुणाचा आहे रे फोन? जेवायला ये लवकर. आम्ही बसलो बघ... "

“हो...हो... आलोच... तुम्ही जेवण सुरु करा...” सुरजने गडबडून त्याला प्रत्युत्तर दिले.
इकडे सुयशला मात्र काहीच मागमूस लागत नव्हता. त्याने आता दहा मिनिटांत त्या शेरवली फाट्यापर्यंत पोहोचू एवढे फोनवर सांगितले.
“ सुयश आम्ही आताच पोहोचलो आणि जेवायला बसतोय... तू तिथे पोहोचलास की थोडे आत डावीकडे ये. पाच मिनिटांचा रस्ता आहे. मी तिथेच असेन. ”
सुरजच्या डोक्यात नक्की काय सुरु होते हे ना सुयशला समजत होते ना आम्हा कोणाला.
“हो...हो...” म्हणत त्याने फोन ठेवला. सुरज लगेच जेवायला बसला. सनिक दादाने पुन्हा फोनबद्दल विचारले तर तेव्हाही उडवाउडवीची उत्तरं देऊन तो गप्प बसला.
जेवणं झाली. सर्वजण अंगणात गोल करून बसले. आराम वगैरे कोणालाच करायची इच्छा नव्हती. बाहेरच्या बाजूला लागलेल्या कै-या पाहून त्या पाडण्याचा मोह कुणालाच आवरला नाही. त्यात इशानलाही सामील करुन घेतले.
सगळी मंडळी कैऱ्या पाडत असताना त्या गोंधळात इशान रस्त्याच्या पलीकडे कधी गेला कुणालाच समजले नाही. गीतांजलीनचे लक्ष गेले तेव्हा दुरून एक गाडी येत होती. तिने इशानकडे धाव घेतली आणि त्याला जवळ ओढले तोपर्यंत ती गाडी त्या दोघांना अगदी खेटून गेली.
लहान मुलाला बघून गाडीतून मोठ्याने हॉर्न वाजला आणि त्या आवाजाने घाबरुन इशान तिथेच रडायला लागला. ती गाडी सुयशचीच होती. सुयशने गाडी तिथेच थांबवली. गाडीतून उतरुन तो मागे आला. त्याला रडणारा मुलगा आणि गीतांजली दिसली. तीच आनंदी चेहऱ्याची... बोलक्या डोळ्यांची गीतांजली. सुरवातीला तिचे लक्ष इशानकडेच होते. त्याला कुठे लागले तर नाही ना हे ती पाहत होती.
तिने समोर पाहिले. समोर सुयश रस्त्याच्या मधोमध उभा होता. अगदी स्थिर आणि शांत... पुढे काहीच बोलणे झाले नाही. इशान गीतांजलीचा हात सोडून धावत रडत अंगणात आला. झाकोळून आलेलं आभाळ आता टपटप बरसायला लागलं होतं.  त्या थेंबांमध्ये इशान भिजत होता. कैऱ्या पाडण्याचा कार्यक्रमही आटोपता घेण्यात आला. सम्या आणि विवेक झाडावर चढले होते, तेही खाली उतरले. इशानचा आवाज ऐकून सगळे  मागच्या दारातून वाड्याबाहेर आले.
पाऊस बरसत होता. सुरजने सुयशला पाहीले आणि मिठी मारली, त्याचे आभार मानले. सुयशने गाडीजवळ जाऊन ड्रायव्हर काकांना बाहेर यायला सांगितले. त्यांच्या हातापायाला मलम पट्टी केलेली दिसत होती. सनिक दादाने ड्रायव्हर काकांना पाहिले. नक्की कुठे कुठे लागले हे बघता बघताच तो म्हणाला, “तुम्ही एकदा सांगितलं असतं तरी हे एवढं झालंच नसतं... बरे आहात ना काका?”
“पावसातच बोलणार आहात का सगळे... वाड्यात आजी आजोबा, आक्का सगळेच आहेत. त्यांना न सांगता आलो आहोत आपण.. चला... नाहीतर काळजी करतील ते..." सोमेश म्हणाला.

“हो...हो...” म्हणत इशानला घेऊन आम्ही निघालो. गीतांजली अजूनही मागेच उभी होती. जागची हलली सुद्धा नाही. सगळे पुढे गेले, सुयश तिथेच गाडी पार्क करुन आला. वाटेत थांबला, त्याने गीतांजलीच्या नाकापुढे एक चुटकी वाजवली तशी ती भानावर आली.
“क्लिनिकमधून निघायच्या आधी सांगायला हवं होतंस तू... अजून किती वर्ष मी एकट्याने त्या बागेतल्या गुलमोहराची काळजी घ्यायची?”
तिला रडू अनावर झाले. एव्हाना पाऊसही थांबला होता. तशी ती स्वत:ला सावरुन वाड्यात आली. सुयशला समोर पाहून आजी आजोबांना हायसे वाटले. त्याला अगदी आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी जेवणाचा आग्रह केला. जेवणं झाल्यावर आजींनी सुयश आणि गीतांजली दोघांना समोर बसवून सगळे खरे खरे सांगितले. सुयशच्या मनातली गीतांजलीची काळाआड गेलेली प्रतिमा पुन्हा स्पष्ट दिसू लागली. तिच्या बद्दलचे मनातले प्रेम आणि आदर आणखी वाढला. सुयशने सुरजच्या धाडसाचे सुद्धा कौतुक केले. त्यांच्यातली मैत्री खऱ्या अर्थाने आणखी दृढ झाली.
दिवस मावळतीला निघाला होता. सुयशला दवाखान्यात परत जाणे आवश्यक होते. परत जाण्यासाठी त्याने तयारी केली. पाऊस पडल्याने सगळे दिवे गेलेले होते. अंधाऱ्या रात्री बाहेर न पडणे योग्य होते. सुरजने पुन्हा आग्रहाने सुयशला थांबवून घेतले. दिवसभराची धावपळ सगळ्यांच्या अंगावर आली होती. त्यामुळे जेवणं आटोपल्यावर सगळे अंगणातच गप्पा मारता मारता तिथेच झोपले.  

Sunday, 14 July 2024

प्रवासातली गोष्ट : २१


 

आक्काचा आवाज ऐकून गीतांजलीच्या आधी आम्ही सर्वजण बाहेर आलो. सर्वांना पुन्हा वाड्यात एकत्र पाहून आक्काला नवल वाटले. ती म्हणाली,

“ तुम्ही समदी इथं! ते बी आत्ता या वक्ताला...असं अचानक !”

“अगं आक्का... हा सोमेश बघ, सारखा तुझ्या हातच्या जेवणाची आठवण काढत होता. आम्ही परत आमच्या घरी जात होतो. तेव्हा वाटलं तुला आणि गीतांजलीला जाता जाता भेटूनच जावं. पुन्हा एकदा तुझ्या हाताची चव चाखून जावी म्हटलं." सनिक दादा आक्काच्या खांद्यावर हात ठेवून म्हणला.

“ गप्प रे दादा... अर्धवट सांगू नको आक्काला ... खरं तर या सगळ्यांनाच तुझ्या हातच्या जेवणाची आणि वाड्याची आठवण येत होती. आता मला मधला माकड करतात बघ." सोमेश लगबगीने म्हणला.

“व्हय रे बाबा... चला आता आत... का इथंच पाहुणचार करु तुमचा...चला बरं आत... हा प्रसाद घे आणि सगळ्यांना दे थोडा थोडा ..."

सोमेशच्या हातात एक पेढ्यांचा बॉक्स ठेवून आक्का म्हणाली. तसे सगळे आत आले. आक्काने आजी आजोबांना पाहून विचारले, “हे नवीन पाहुणे कोण म्हणायचे? तुमच्या सोबतच आलेत का?"

आक्का आत आली आणि कट्ट्यावर पिशवी ठेवून बसली. तो पर्यंत गीतांजली तिथे आली. तिच्या हातात फळांनी भरलेली प्लेट आणि चहाचा ट्रे होता.

“अगं आक्का ... सांगते सगळं... बसा सगळे मी सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता आणला आहे...”

आक्का देवघरात गेली आणि तिने पुजेचं ताट देवापुढे ठेवलं. देवघराच्या खिडकीतून तिची नजर अंगणात गेली. तिथूनच ती ओरडली. “कोण रे तूऽऽऽ तिथे काय करतोय? ये इकडे... बाहेर ये पोरा..."

आक्काचा खणखणीत आवाज ऐकून इशान चांगलाच घाबरला आणि रातराणीच्या झाडामागे लपून बसला. “गीते ए... गीते... आपल्या अंगणात बघ कोण पोरगं आहे गं ?”.

आक्काचा आवाज ऐकून गीतांजली देवघरात धावत गेली. आक्काला हातानेच शांत हो असा इशारा केला. तिथेच तिने हलक्या आवाजात आजी-आजोबा, इशान बद्दल थोडक्यात सांगितले.

ते ऐकल्यावर आक्काच्या मनात इशानबद्दल प्रेम आणि करुणा दाटून आली. आक्का गीतांजलीला म्हणाली, “ जा...तिथे लपाछपीमध्ये कुठेतरी लागून घेईन पोर... त्याला हुडकून आण...”

गीतांजलीने इशानला जवळ बोलवले पण तो आला नाही. मग तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचे फुल तोडून आणले. लडीवाळ शब्दांनी त्याला पुन्हा बोलावले. इशानला सगळयाच गोष्टी नव्या असल्याने तो गीतांजलीकडे बिचकत का होईना आला.

सनिक दादाने सर्व मंडळींना माडीवर जाऊन आराम करायला सांगितले. जेवण करुन सगळे आपापल्या दिशेने परत जाणार होते. त्यावर आता जोरदार चर्चा सुरु होती. सर्वांनाच आपल्या घरची ओढ लागली होती. सुरज

मात्र एक रात्र वाडयात राहण्यासाठी सगळ्यांच मन वळवण्याचा प्रयत्न होता.

“सनिक दादा, आपण आलोच आहोत तर उद्या निघुयात ना... तसाही अंधार झाला की कधी इथले दिवे जातात. उगाच अंधारात पुन्हा काही चुकामुक व्हायला नको. काय वाटतं सगळ्यांना...?” - सुरज

सनिक दादा काही बोलायच्या आधीच गीतांजली म्हणाली, "दादा आलाच आहात तर राहा की एक दिवस, मी ही वाड्यात एकटीच असते. निदान एक दिवसाची सोबत होईल. राहा ना माझ्यासाठी. "

शेवटी व्हायचं तेच झालं. सनिक दादा गीतांजली पुढे काहीच बोलू शकला नाही. न बोलताच त्याने डोळ्याने संमती दर्शविली. सर्वांना कुठे तरी सुरजचा हा निर्णय आवडला होता. सुरजला मोठे युद्ध जिंकल्यासारखे वाटत होते. पण सोबत आलेले आजी आजोबा मात्र संकोचित वाटत होते. आजोबांनी हलक्या आवाजातच त्यांना सांगितले, “आपण निघू लवकर... जेवण झालं की..." त्यावर विवेक म्हणाला, “तुम्ही का काळजी करता आजोबा? कुठेही जायची घाई करु नका. गीतांजली पण तुमच्या मुलीसारखीच ना.. राहा की मग एक दिवस...”

“हो... हो... इतक्यात एकटे निघू नका तुम्ही, ते पण लहान मुलाला सोबत घेऊन... थांबा आजच्या दिवस... मी अजून भेटले पण नाही इशानला आणि तुम्ही निघायची तयारी करताय. मी त्याला भेटून येते, तो इशा आणि सोमेश सोबत खेळतोय वाटतं... आलेच मी.” आजी आजोबांना थांबायचा आग्रह करून गीतांजली तिथून अंगणात निघून गेली.

एकीकडे सुरज सनिक दादाचा फोन वाजण्याची वाट पाहत होता. त्याचं खरंतर सर्व लक्ष त्यावरच होतं. आक्काने मग जेवणाची तयारी करायला घेतली. संकोचून बसलेल्या आजीला त्यांनी बोलते केले. दोघींनी मिळून स्वादिष्ट स्वयंपाक केला होता. शेवयांची खीर, आमटी, मसाले भात, रायता, बटाट्याची भाजी आणि जोडीला थंडगार ताक. जेवणाचा घमघमाट वाड्याच्या कानाकोपऱ्यात नुसता दरवळत होता.

इशानला भेटायला गेलेली गीतांजली तासाभर उलटून गेला तरी परतलेली नव्हती. इशानलाही तिचा लगेच लळा लागला होता. त्या दोघांची आता चांगली गट्टी जमली होती.

आक्का स्वयंपाक घरातून त्यांचा खेळ आणि मस्ती पाहून खरं तर भावनिक झाली होती. हा क्षण ती डोळ्यात साठवत होती. आक्काने सोमेश आणि इशाला आत स्वयंपाक घरात बोलावले. स्वयंपाकाच्या घमघमाटाने दोघांच्याही पोटातली भूक खवळली.

“बघा आता...एक एक भांडं उचलून सावकाश बाहेर न्या. ताटं, वाट्या घेऊन व्यवस्थित बैठक घालून बसा आणि हे त्यात वाढा. आम्ही येतोच... गीतांजलीला पण मदतीला घ्या.

“हो आक्का... हे काय विचारायचे.... बघ आता करतोच सगळं अगदी तू सांगितलं तसं...” असं म्हणून दोघे बाहेर आले आणि सगळ्यांना जेवणासाठी बोलावले.

Saturday, 6 July 2024

प्रवासातली गोष्ट : २०


 

ड्रायव्हर काकांच्या पायाला अपघातात आधीच भरपूर मार लागलेला होता. त्यात आता आणखी भर पडली होती. त्यांच्याकडचे पैसे, पाकीट सर्व लुटून नेले होते. मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे वाजला नाही म्हणून मोबाईल तेवढा राहिला. काकांनी सुयशला मुंबईला पोहोचण्याची सोय व्हावी म्हणून विनवणी केली. पण सुयशला एवढे लांब मुंबईला, हॉस्पिटल सोडून जाता येणार नव्हते. काय करावे यावर तो विचार करत होता.  तेव्हा त्याला सुरजची आठवण झाली.  त्यांनी ड्रायव्हर काकांना सुरजचा फोन नंबर विचारला. पण ट्रिपची सगळी जबाबदारी सनिक दादाने घेतली असल्याने त्याचा नंबर त्यांना लक्षात होता. काकांनी सनिक दादाचा नंबर सुयशला दिला. सुयश काकांना आश्वासक शब्दात म्हणाला, “ काळजी करु नका. तुमची मुंबईत जाण्याची  व्यवस्था करतो. “ त्यावर ड्रायव्हर काकांच्या डोळ्यात पाणी आले. ते दोन्ही हात जोडून सुयश समोर उभे होते. त्याच भरल्या अंत:करणाने ते म्हणाले, “तुमचे खूप उपकार होतील साहेब... संकटात तुम्ही मला मदत केलीत... तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत अशी मी देवाकडे प्रार्थना करीन. मला एकदा माझ्या घरी फोन लावून देता का? माझी मुलगी माझी वाट बघते. तिची खुशाली ऐकल्यावर आणि तिचा आवाज ऐकल्यावर माझ्या जीवात जीव येईल. ”

 

सुयशने त्यांचे मुलीशी बोलणे करून दिले. त्यांच्या मुलीची तब्येत आता सुधारत होती. ती बरी होत आहे हे ऐकून त्यांचा जीव भांड्यात पडला.

 

त्यानंतर सुयशने सनिक दादाला फोन लावला. पण तो गाडी चालवत असल्याने त्याला नीटसे काही ऐकू येत नव्हते की बोलताही येत नव्हते. म्हणून त्याने आपला फोन मागे बसलेल्या सुरजला दिला आणि बोलायला सांगितले. फोन देईपर्यंत कट झाला होता. सुरजने नंबर पाहिला. अनोळखी नंबर होता. गाडी शेरवली फाट्यावर पोहोचली. लवकरच गाडी गीतांजलीच्या वाड्यात पोहोचणार होती. सुरजने पुन्हा त्याच नंबरवर फोन लावला. फोनवरुन ओळखीचा आवाज आला.

 

“हॅलोऽऽऽ” या आवाजावरुनच सुरजने सुयशला ओळखले. सुयशने सुरजला काकांबद्दल सर्व हकीकत सांगितली. त्यांना मुंबईला कसे जाता येईल याबद्दल विचारले. सुरजच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. त्याने सुयशला शेरवली फाट्यापर्यंत येण्याची विनंती केली. अंतर बरेच होते, त्यामुळे सुयशने सुरुवातीला नकार दिला. पण नंतर सुरजने हट्ट केला. तेव्हा तिथल्या जखमी प्रवाशांवर प्रथमोपचार करुन मी काकांना तिथे सोडतो असा सुयशने शब्द दिला. तोपर्यंत

आमची गाडी वाड्याबाहेर येऊन थांबली. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ भरुन आलं होतं, पक्ष्यांचा किलबिलाट सुरु होता. सुर्य अस्ताला जात होता. पाऊस पडण्याची चिन्हं दिसत होती. पुन्हा एकदा आमचे वाड्यात आगमन झाले. वाड्यात तोच पुर्वीसारखा दरवळ होता. साफसुफ केलेला वाडा पुन्हा एकदा आमचे स्वागत करत होता.

 

“आक्काऽऽऽ ए आक्काऽऽऽ आम्ही परत आलो बघ... वाड्यात...कुठे आहेस? आक्काऽऽऽ”

 

सनिक दादाच्या हाकेने आक्का ऐवजी गीतांजलीच बाहेर आली. ती तिथेच उभी राहिली. आलेल्या सर्वांचे तिने स्वागत केले. त्यांना आत यायला सांगितले. सगळे आत येऊन बसले.

 

“आक्का कुठे दिसली नाही, स्वयंपाक करते का?” सोमेश म्हणाला.

 

“नाही.. आज सोमवार.. ती शंकराच्या मंदिरात गेली आहे. येईलच इतक्यात...”, गीतांजलीने हसत मुखाने सांगितले.

 

गीतांजली खुश दिसत होती. तिने सगळयांची आपुलकीने चौकशी केली. यावेळी पाहिलेली बोलणारी... हसणारी... चौकशी करणारी गीतांजली कुणीतरी वेगळीच होती. आम्ही सगळेच थोड्या वेळासाठी कोड्यात पडलो. तिने जान्हवीच्या सासू सासऱ्यांना पाहिले. तिचे डोळे त्यांच्यासोबत आलेल्या लहान मुलावर स्थिरावले होते. तेव्हा सनिक दादाने तिची डायरी तिला परत केली. तिच्या कपाळावर जरा आठयाच आल्या.  पण ती पूर्वीसारखी रागावली नाही. ती शांत होती. कदाचित तिला ती डायरी माझ्याकडे सुखरुप असेल असा विश्वास होता. पण सनिक दादाने तिला ती परत केल्याने तिच्या चेह-यावर प्रश्न चिन्ह होते.  त्यात सुरजने ही डायरी वाचली हे जेव्हा तिला सांगितले तेव्हा संकोचलेली गीतांजली पाहताना मला मात्र चुकल्या चुकल्या सारखे झाले होते.

 

सोबत आलेल्या जान्हवीच्या सासूबाईंनी  तिला जवळ बोलावले आणि माफी मागीतली. ती हॉस्पिटल मधून गेल्यावर झाला प्रकार त्या तिला सांगू लागल्या.

 

 “गीतांजली हा जान्हवीचा मुलगा, आमचा नातू इशान... अचानक आलेल्या अडचणी आणि  कुटुंबाची होणारी वाताहत, अशा परिस्थितीने आमच्या मनाचा सुद्धा ताबा घेतला होता. त्यावेळी आम्ही भावनेच्या भरात तुझ्याकडून जी अपेक्षा केली. ती एकतर्फी होती. याची आम्हाला जाणीव झाली. आम्हाला माफ कर पोरी... डॉक्टर आमच्या जान्हवीची लहान बहीणीप्रमाणे सेवा करत होते आणि त्यांच्या मधल्या भाऊ बहिणीच्या नात्याला आम्ही ओळखू शकलो नाही. तुझ्या मनाचा आम्ही विचार केला नाही.

 

आम्ही केलेल्या चुकीची शिक्षा आमच्या जान्हवीला नको देवू बाळ. जान्हवीला अजूनही ही गोष्ट माहित नाही. ती अजूनही तिथेच शुश्रूषा मध्ये तुझी वाट पाहत आहे. डॉक्टर सुयश आणि जान्हवी तुझी सतत आठवण काढतात. डॉक्टर सुयश तुझ्याशिवाय अपूर्ण आहेत. ते तुम्ही एकत्र लावलेल्या गुलमोहराला अजून ही विसरले नाहीत. तुला तिथे गेलं पाहिजे. तिथे तू फूलवलेली बाग आहे, तू लावलेला गुलमोहर आहे, तुझ्या मदतीला डॉक्टर सुयश आहेत. आम्हाला माफ कर आणि स्वत:लाही शिक्षा करुन घेऊ नकोस.”

 

गीतांजली स्तब्ध झाली. भावूक झाली. तिला काय बोलावे काहीच सुचेना. अगदी चार वर्षांपूर्वी झालेली तशीच स्थिती पुन्हा तिच्यासमोर आली.

 

“तुम्ही बसा आधी आजी मी तुमच्यासाठी पाणी आणते”, दाटलेल्या कंठाने ती आत स्वयंपाक खोलीत गेली. काही काळासाठी वातावरणात भयाण शांतता पसरली. इशानने पहिल्यांदाच वाडा पाहिला होता. तो तिथल्या एक एक गोष्टी पाहत अंगणात गेला.

 

बाहेरुन आवाज आला, “गीतेऽऽऽ अगं गीतेऽऽऽ थोडे बाहेर ये... हे बघ...”