सुरजचं बोलण ऐकत सनिक दादाच्या मनात सुद्धा काकांच्या अचानक गायब होण्यावरून प्रश्न पडू लागले. तो सुरजच्या शेजारीच पाठ टेकून पडला होता. तो सुरजला त्याच्या मनातल्या शंका ऐकवत होता.
“ काका असे अचानक कुठे गेले असतील? ते कुठल्या अडचणीत तर नसतील ना? त्यांच्या घरी तर काही अडचण नसेल ना? आणि घरुनच फोन आला असेल तर...! त्यांनी कुणाला का सांगितलं नाही? त्यांचा फोनही बंद येत होता. सुखरुप असले म्हणजे झालं..."
सोमेश त्यावर म्हणाला, “आधी ती डायरी, नंतर तो अपघात आणि आता हे अचानक ड्रायव्हर काकांचं गायब होणं...! यारऽऽऽ आपण कशाला आलो होतो आणि आता काय करतोय...?”
विवेक त्याला दुजोरा देत बोलला, “ नक्कीच हा प्रवास आपल्यासाठी अशुभ आहे, आपण मागे फिरु. परत आपापल्या घरी सुखरुप जाऊ. नको हे आऊटिंग वगैरे...!” या दोघांच निर्वाणीचं बोलणं ऐकून सुरज वैतागला.
" काहीही काय बोलताय? तुम्ही खूपच भित्रे आहात. आपण ही परिस्थिती सांभाळून घेऊ शकतो रे... विश्वास ठेवा. सनिक दादा तू इतका विचार करु नकोस. नक्कीच यातून काहीतरी मार्ग निघेल. काका पण भेटतील आणि आपली ट्रिप सुद्धा यशस्वी होईल. फक्त सर्वजण एकत्र असायला हवेत. असे घाबरुन चालणार नाही. चला आता, यावर जास्त चर्चा करु नका.”
सुरजचं बोलून झालं तसं दारावरची बेल वाजली. “कुणीतरी आलं वाटतं. जा रे सोमेश... बघ कोण आहे ते?” सनिक दादा सोमेशला म्हणाला.
“हा... सोमेश... जाणार पुढे... इथेच घाम फुटला बघ याला.. ”, गंभीर झालेलं वातावरण जरा हलकं करण्याच्या उद्देशाने सुरजने सोमेशची खिल्ली उडवली. मग इशानेच जाऊन दार उघडले. दारात एक माणूस होता. आपली ओळख त्याने शुश्रूषा हॉस्पिटलचे कॅन्टीन सांभाळणारा म्हणून दिली. त्यानंतर सुयश सरांनी त्याला पाठवले आहे म्हणून सांगत इशाच्या हातात एक भली मोठी भरलेली पिशवी दिली. त्या पिशवीत काय आहे हे न पाहताच आणि त्या माणसाला साधं नाव गाव न विचारताच इशाने ती पिशवी त्याच्याकडून घेतली आणि दार लावून घेतले. सर्वजण वरच्या मजल्यावर होते. इशा ती पिशवी घेऊन खोलीत गेली आणि पिशवी उघडली. पिशवीत जेवणाचा मोठा डब्बा होता. दहा-बारा जण आरामात जेवतील असं पुरेपूर जेवण त्यात पाठवलेलं होतं. कोणताही किंतु परंतू डोक्यात न ठेवता सगळी मंडळी एकत्र जेवायला बसली.
दिवसभराच्या दगदगीतून थोडी विश्रांती मिळाली आणि पोटाची भूक तर शमलीच होती. सगळे जेवले आणि जेवल्या जेवल्याच तासाभरात सर्वजण तिथेच खोलीत झोपले. रात्री बारा-साडेबाराला सनिक दादाचा अचानक फोन वाजला. दिवसभराच्या थकव्याने वाजलेला फोन गाढ झोपेत कुणालाही ऐकू आला नाही आणि उचलला ही गेला नाही. सोमेशला जाग आली होती पण स्वप्नात फोन वाजत आहे असं समजून तो परत गाढ झोपी गेला.
सकाळी पुन्हा दारावरची बेल वाजली. सुरजने दार उघडलं. दारासमोर सुयश उभा होता. सगळे जागा मिळेल तिथे झोपले होते. त्यामुळे खोली अस्ताव्यस्त झाली होती. सुरज मोठ्याने ओरडला, “बघा कोण आलं ?” सगळे खडबडून जागे झाले. सनिक दादा तर झोपेतूनच, “काका आले..." असं म्हणतच उठला. परंतू तसे काही नसून सुयश त्यांच्यासाठी सकाळचा नाश्ता घेऊन आला होता. सगळी मंडळी नाश्ता करण्यासाठी एकत्र बसली. सुयशने सगळ्यांसाठी ब्रेड पकोडे आणि गोड शिरा आणला होता. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. सगळ्यांचा नाश्ता झाला तसे सुयशने काकांच्या विषयी एक महत्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला,
“काल मी सांगितल्याप्रमाणे सीसीटीव्ही चेक केल्यावर कळालं की, ड्रायव्हर काका हॉस्पिटलमध्ये नाहीत. ते तुम्ही निघायच्या जवळपास तासभर आधीच मेन गेटमधून बाहेर जाताना दिसले. ते आजूबाजूला कुणाला तरी शोधत होते. हे त्या गेटवरच्या वॉचमनने सांगितले. त्यांनी मुंबईला जायला बस कुठे मिळेल, याची चौकशी केली होती. वॉचमनने त्यांना कामटे फाट्याकडे जाणारा रस्ता सांगितला. तिथून पुढे मुंबईकडे जाणारा महामार्ग आहे. कदाचित काका मुंबईला त्यांच्या घरी गेले असावे असं मला वाटतंय ”
सगळे एकमेकांकडे पहायला लागले. सुयश पुढे म्हणला “ आता तुम्ही सगळे असं करा, हॉस्पिटलमध्ये परत येण्यापेक्षा तिथे जाऊन विचारपूस करा. तिथे दहा मिनिटांच्या अंतरावर तालुका पोलीस चौकी पण आहे तिकडे काकांबद्दल नक्कीच काहीतरी कळेल.”
सगळयांनी सामानाची बांधा बांध सुरू केली. सुयशने सगळ्यांचा निरोप घेतला. ट्रॅव्हलर मधून सगळे कामटे फाटाच्या दिशेने निघाले. बघता बघता तिथले बस स्थानक आले. तिथे मोजून दोन बस उभ्या होत्या. चौकशी कक्षात बसलेल्या व्यक्तीकडे सुरजने चौकशी केली. मुंबईकडे जाणाऱ्या दोन गाड्या सकाळीच आठच्या दरम्यान गेल्या असल्याचे समजले. ड्रायव्हर काकांचा गृपमध्ये काढलेला फोटो सनिक दादाने त्यांना दाखवला. पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. शेवटी सगळ्यांनी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा काकांच्या नंबरवर फोन लावून पाहिला पण तो अजूनही बंदच होता.
कामटे फाटयावरून निघताना सनिक दादाने गाडी पोलीस चौकीकडे घेतली आणि काका हरवल्याची रीतसर तक्रार नोंदविली. नेमक्या त्याचवेळी तिथे कॅन्टीन सांभाळणारा तो इसम त्याच्या जमिनीच्या वादाचे कागदपत्र घेवून आला होता. त्याने आदल्या दिवशी डबा दिलेल्या इशाला ओळखले होते.
“तुम्ही कालच्याच मॅडम ना? मी तुमच्या घरी आलो होतो जेवण द्यायला. ओळखलं का मॅडम...?”
त्यावर इशा म्हणाली “हो...हो...काल तुम्हीच आला होता ना...
त्यावर तो म्हणला " होय जी, तुम्ही इथे कसे आमच्या गावच्या चौकीवर! "
त्यावर तिने त्यांना काकांबद्दल सांगितले. त्यांना फोटो दाखवला.
फोटो बघून तो इसम चकित झाला आणि म्हणला,
या माणसाला बघितल्यासारखं वाटतंय... होय... कालच मी त्यांना भेटलो... कँटीन मध्ये आलेला जी... "
हे ऐकून सनिक दादा म्हणला “ कुठे गेले ते नंतर? तुमच्यासोबत ते काही बोलले का ? तुम्हाला काही सांगितले का?"
त्यावर तो इसम म्हणला “अहो, मी तुम्हाला जेवण देऊन आलो त्यानंतर मी आवरा आवर करुन कॅन्टीन बंद करणारच तेवढ्यात हे साहेब आले आणि काही खायला शिल्लक आहे का? असं विचारलं. मी जे होतं ते दिलं. त्यानंतर खाऊन झाल्यावर कँटीनमधून ते लगेच निघून गेले. एकंदरीत त्यांचं अवसान पाहून मी त्यांची चौकशी केली तर मला मुंबईला जायचं आहे एवढं बोलून लगेच गेले बघा...” त्या व्यक्तीने काकांची माहिती सांगितल्यावर ड्रायव्हर काका सुखरुप असल्याची शाश्वती वाटू लागली. सगळ्यांना थोडा दिलासा मिळाला.
कथा आणि कथेत रमणार्या काल्पनिक जगात सुचलेल्या, आठवणीत राहिलेल्या कथा एकत्र करताना जमवलेल्या गाठोड्यातल्या काही कथा कहाण्या.
Thursday, 23 May 2024
प्रवासातली गोष्ट : १५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
सुरजचं बोलण ऐकत सनिक दादाच्या मनात सुद्धा काकांच्या अचानक गायब होण्यावरून प्रश्न पडू लागले. तो सुरजच्या शेजारीच पाठ टेकून पडला होता....
-
सूर्य हळूहळू माथ्यावर येत होता. नुकताच सगळ्यांनी चटपटीत भेळीवर ताव मारला होता. जवळपास त्याचा फडशाच पडला आणि इतकी चविष्ट भेळ खाऊन झाल...
-
मी समोर असताना सुयश सांगत होता, “ गीतांजली सोज्वळ, शांत, अल्लड व खूप प्रेमळ मनाची होती. त्या बाहेर भेटलेल्या आजी आजोबांच्या मुल...
No comments:
Post a Comment