Wednesday, 15 May 2024

प्रवासातली गोष्ट : १३


 

सुरजकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विवेकने विचारले, “कसलं गुपित...? तू काय बोलत आहेस?  काहीच कळत नाही. थोडं विस्कटून सांग.”

“आपल्याला काय करायचं आहे. आपण ती डायरी वाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आणि विषय संपवायचा..” असे बोलून सोमेशने विषय संपवायचा प्रयत्न केला.

“तुम्ही काय सुरजचं ऐकताय रे ! सगळेच अडकू नाही तर यात. आपण एन्जॉय करायला आलोय आणि काय हे तुम्ही...! न एन्जॉय... फरगेट ऑल...” सोमेशने आपले बोलणे पूर्ण केले. सोमेशचे बोलणे ऐकून सुरज आणखीच चिडला.

“हे बघा... माझा काही हट्ट नाही की, तुम्ही मंडळींनी त्या डायरीत काय लिहिलं आहे ते जाणून घ्यावं. पण आपण दोन दिवस ज्या वाड्यात राहिलो, त्या भव्य वाड्यासाठी... त्यातल्या प्रेमळ आक्कासाठी... गीतांजलीसाठी तुम्हाला काही काळजी वाटत नाही का? आपल्यामुळे जर त्यांच्या आयुष्यात, आनंदाचे दिवस परत येणार असतील तर काय हरकत आहे हे पाऊल उचलायला... हे बघ सनिक दादा कुणीही असंच कारणाशिवाय कोणाला भेटत नाही किंवा कोणत्याही गोष्टी विनाकारण घडत नाहीत. तू एकदा विचार कर, आक्काने एवढ्या प्रेमाने आपल्याला एवढं सगळं का खायला प्यायला घातलं...आपला पाहुणचार केला आणि आपल्याकडे ती डायरी आता ह्या वेळेला कशी आली? सगळ्यात महत्वाचे त्या डायरीतला सुयश आपल्याला इथेच कसा काय भेटला? एकदा विचार कर... मी ती डायरी का वाचली असावी?प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं आणि गीतांजलीच्या गोष्टीमागे आपण ते कारण आहोत. ”
सनिक दादाच्या मनात गोंधळ वाढत होता. त्याने ती डायरी सुरज समोर ठेवली. सुरजने ती डायरी उघडली.

“ बघा...हा वाड्याचा फोटो आणि त्याच्या बरोबर मागे आपण बसलोय त्या शुश्रूषा क्लिनिकचा” सगळ्यांनी तो फोटो पाहिला. त्यात अजून एक असाच फोटो होता,  बाहेरच्या अंगणातला आणि एक वाढदिवसाच्या सोहळ्याचा...सुरज पुढे सांगू लागला. सुरजने वाचलेल्या पानांवरुन हात फिरवत सगळ्यांना म्हटलं, “यात आठवणी आहेत, कुठल्या माहिती आहे? या क्लिनिकच्या...”

गीतांजली इथेच काम करत होती आणि ती इथे आली तेव्हा डॉक्टर सुयशने नुकतंच एम.बी.बी.एस. चं शिक्षण झाल्यावर प्रॅक्टीस सुरु केली होती. गीतांजली इथलीच असल्याने ग्रामीण वातावरण तिला नवीन नव्हते. पण सुयश पुण्याचा, सगळं शिक्षणही तिथंच झालेलं.  त्याला ग्रामीण जीवनाचा जराही स्पर्श नव्हता. त्यामुळे हे नवे वातावरण स्विकारण्यास थोडा कालावधी गेला. इथल्या लोकांची भाषा, त्यांचे पेहराव, त्यांच्या गरजा आणि सुखसोई सगळंच समांतर रेषेच्या खालचं होतं. असाच एक रुग्ण उपचारादरम्यान अचानक बेभान झाला होता त्याला पूर्णपणे ताब्यात ठेवण्यासाठी  गीतांजलीने डॉ. सुयशची मदत केली होती. तेव्हा सुयशने तिला जवळून पाहिले होते. त्यानंतर ती दवाखान्यात बऱ्याचदा दिसली, पण बोलणं झालं नाही. पण जेव्हा जान्हवीची केस समोर होती तेव्हा सुयश आणि गीतांजली एकमेकांच्या सहवासात आले. त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या नात्यात प्रेम वाढत गेले. सुयशने तिला मागच्या बागेत बरेचदा पाहिलं. एक, दोन, तीन दिवस. रोज ती तिकडे काय करते? ते पाहण्यासाठी तो एके दिवशी संध्याकाळी त्या बागेत गेला.
शेजारीच मुलींचे वसतीगृह होते. बागे समोरच्याच खोलीत ती राहायची. सहसा कुणी या वेळी तिथे जात नाही. मग ती व्यक्ती तिथे काय करते हे पाहण्यासाठी गीतांजली त्या बागेत आली आणि तिने विचारले, “तुम्ही डॉक्टर ना... इथे कुणाची वाट पाहताय का? “

“नाही सहजच आलो, रोज लांबूनच ही बाग पहायचो, फार सुंदर आहे. आज मात्र इथं येण्याचा निश्चयच केला”
“मलाही खुप आवडते ही बाग, मला जसं जमेल तशी मी बागेची काळजी घेते”

तिने स्वतः लावलेल्या झाडांविषयी सुयशला सांगितले. सहज संवादातून दोघांची ओळख वाढत गेली. सुयश आता फावला वेळ घालवण्यासाठी रोज त्या बागेत येऊ लागला. गीतांजलीची त्याला सोबत मिळाली. त्यांची चांगलीच मैत्री झाली. हळूहळू वसंत आला, पाने-फुले बहरु लागली. दोघांतली मैत्रीही बहरु लागली. त्यावर प्रेमाचा मोहोर येऊ लागला.
एक दिवस एक जबरदस्त अपघाताची केस आली. त्यात ते आपल्याला भेटलेले वृद्ध जोडपे होते ना... तेच ते. हे मला इथे आल्यावर आणि डॉ. सुयश भेटल्यावर कळलं. त्या अपघातात वृद्ध जोडप्याचा मुलगा गेला. आणि सूनेची वाचा गेली. त्या धक्क्याने आजोबांना विस्मरण झाले. त्यावेळी आपल्या गीतांजलीची त्यांना खूप मदत झाली सावरायला. गीतांजली आणि सुयश दोघं जान्हवीची केस हॅन्डल करत होते. " सुरज सांगत होता. तेव्हा सनिक दादाला काकांची आठवण झाली. त्याने इशाला पाहून यायला सांगितले,

“इशा जरा बघून ये. काका ठीक आहेत का? शुद्धीवर आलेत का बघ... मग पुढे निघायचे कसे ते ठरवता येईल.” सनिक दादा इशाला म्हणाला.
इशाला खरं तर ही रंगत आलेली गोष्ट चुकवायची नव्हती. तरी नाईलाजाने ती गेली.  सम्या लगेच म्हणाला, “मग पुढे काय झाले? ”
“जेव्हा त्यांचा अपघात झाला तेव्हा मुलाच्या निधनाची बातमी ऐकून ते आजी आजोबा खचून गेले होते. त्या दिवशी जोराचे वादळ आणि सोबतीला पाऊस सुद्धा होता. काळोखी रात्र आणि त्यांचा हरवलेला आधार. सून ॲडमिट अशा त्या काळोख्या ओल्या रात्री बागेच्या एका कोपऱ्यात ते दोघे शांत बसून राहिले.

गीतांजलीचे त्यांच्याकडे लक्ष गेले. ती बागेमध्ये आली. वीजेचा कडकडाट सुरु होता. तिने त्या दोघांना आपल्या रुममध्ये आणले. त्यांची आस्थेने चौकशी केली. तिने त्यांचे सांत्वन केले, त्यांना समजावले. सकाळपासून उपाशी असल्याने त्यांचं अंग थरथरत होते. गीतांजलीने आग्रह करून कसे बसे दोन घास त्यांना बळजबरीने खायला लावले. सर्वस्व उध्वस्त झालेल्या अवस्थेत त्या दोघांनी तिच्याच खोलीत रात्र काढली.

“बाप रेऽऽऽ म्हणजे आपल्याला भेटलेले ते सुद्धा या स्टोरीमध्ये आहेत!" सोमेश आश्चर्याने म्हणला.
काकांना पहायला गेलेली इशा धावत आली ती जरा घाबरलेली दिसत होती.
“काय गं ? काय झालं?”
“आपले ड्रायव्हर काका आपल्याला सोडून गेले..”
“काय..?” सम्या जवळ जवळ ओरडलाच.
“हो...ते गेले...आपल्याला इथे हॉस्पिटलमध्ये सोडून. ते एकटेच कुठेतरी निघून गेले...”
“निघून गेले..? काय प्रकार आहे हा... इशा नीट सांग"
आता मात्र सगळयांचीच भितीने गाळण उडली होती. आता पुढे काय आणि कसं ? मोठा प्रश्न उभा राहिला होता.  

No comments:

Post a Comment