Sunday, 26 May 2024

प्रवासातली गोष्ट : १६



 

टिरिंग टिरिंगऽऽऽऽ टिरिंग टिरिंगऽऽऽ सनिक दादाचा फोन वाजला. अनोळखी नंबर असल्याने त्याला थोडी शंका आली. त्याने फोन लगेचच उचलला. “हॅलोऽऽऽ मी धनंजय बोलतोय..."
 
“काका तुम्ही...? कुठे आहात...? आम्ही कालपासून तुम्हाला शोधतोय. तुम्ही कुठे आहात आता...?”

सनिक दादाने त्यांना प्रश्न विचारून भांडवून सोडले. सुरजने दादाला फोन घेऊन स्पीकरवर टाकायला लावला. काका सांगू लागले, “मी एस. टी मध्ये आहे. माझा फोन बंद पडला त्यामुळे मला फोन करता आला नाही. रात्रीच मी मुंबईला जायला निघालो. तेव्हाही हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्यांच्या फोनवरुन मी फोन केला होता. पण कुणी उचलला नाही. मला घाईघाईत मुंबईला जावे लागले. माफ करा दादा, पण मी सुखरुप आहे.

"हॅलोऽऽऽ हॅलोऽऽऽ” आणि फोन कट झाला.

आम्ही पोलीस चौकीतच असल्याने लगेचच आपली तक्रार मागे घेतली.

“चला तर मग.... आता आपण आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाऊ शकतो” सोमेश आनंदाच्या भरात म्हणाला.

“पण काका असं अचानक तडका-फडकी का गेले असतील, सनिक दादा!  ” - सुरज म्हणला
 
“अरे त्यांना काहीतरी काम आले असेल. आता त्यांनी सांगितलं ना, आपण आता जास्त विचार करायला नको, लेट्स गो..." विवेक म्हणला.

विवेकने  लेट्स गो म्हणताच ट्रॅव्हलर नव्या उत्साहाने पुन्हा भरली. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला आणि गाडी सुरु झाली. सनिक दादाने काकांची जागा घेतली. जवळपास तासभर घाटातला रस्ता पार करुन आम्ही आमच्या इच्छित ठिकाणी पोहोचलो.

तिथे घनदाट जंगल होते. निसर्गाच्या सानिध्यात आम्ही दोन दिवस राहणार होतो. रानावनात आमची राहण्याची व्यवस्था होती. तिथल्या आदिवासी जीवनशैलीचा अनुभव, त्यांची लोकगीत, त्याची कलाकूसर आणि राहणीमान सगळे विलक्षण वेगळे होते. तिथली बरीच माहिती सनिक दादाने आधीच काढली होती. तो सगळ्यांना सांगत होता, मार्गदर्शन करत होता. त्याची जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडत होता. तिथले सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेरात साठवत दोन दिवस कसे गेले कळलंच नाही.  ट्रेक करता करता झालेली दमछाक टोकावर पोहोचल्यावर दिसणारे विहंगम दृश्य आणि भरपूर उत्साह सोबत घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.  दोन दिवस मस्त मज्जा-मस्तीत वाऱ्यासारखे वेगाने गेले. माझ्या मनात सगळा प्रवास पुन्हा पहिल्यापासून सुरू झाला होता. गेल्या काही दिवसात बरेच अनुभव आले होते. किती नवीन चेहरे आपल्या आयुष्यात आले आणि नवीन आठवणी तयार झाल्या. आम्ही ट्रॅव्हलरमध्ये बसलो. या घनदाट रानात आमच्या मुक्कामाची सोय करणा-या सनिक दादाच्या मित्राचे आभार मानून तोही गाडीत चढला.

पुन्हा माघारी जाण्याचा प्रवास सुरु झाला. तो व्यवस्थित व्हावा अशी मनोमन सगळयांची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. प्रवासात तीच ती गाणी ऐकून कंटाळा आला म्हणून गीतांजलीची डायरी मी सनिक दादाकडून मागून घेतली. पुढच्या प्रवासात ती वाचून काढायची असे मनाशी ठरवले होते. त्याने ती विश्वासाने मला दिली.

पुन्हा एकदा वळणा वळणाच्या रस्त्यावर मावळत्या संध्याकाळी, आकाशात पसरलेले रंग न्याहाळत, पक्ष्यांचे थवे पाहत सगळी मंडळी प्रवास करत होती. मी ती डायरी उघडली आणि वाचू लागले.

******
सुयशच्या वाढदिवसाला आजी आजोबांनी एक गुलमोहराचे झाड त्याला भेट दिले होते. ते त्याला देण्याचे कारण खरं तर काहीतरी वेगळेच होते. दुसऱ्या दिवशी सुयशने ते झाड मला दिले आणि बागेत लावायला सांगितले.

दिवसामागून दिवस गेले. गुलमोहराची दोन्ही झाडं खूप छान वाढली होती. मी त्यांची घरच्या सदस्यांप्रमाणे काळजी घेत होते. सुयशला बागेत येण्यासाठी गुलमोहर हे निमित्त झालं होतं. हॉस्पिटल मध्ये काम करताना तो जबाबदारीने ते पूर्ण करत असे. तेव्हा रुग्ण आणि त्याचे उपचार हेच त्याचे उद्दिष्ट असायचे. मैत्री आणि काम याची त्यानी कधीच गल्लत केली नाही.  आठवड्यातून दोनदा आजी आजोबा आपल्या सुनेला भेटायला यायचे. हळूहळू आजोबांचा स्मृतिभ्रंशाचा आजार बळावत गेला. त्यामुळे आजी खूप अस्वस्थ असायच्या. त्या माझ्याकडे त्यांच मन मोकळं करायच्या.

त्यावेळी जान्हवी तशी नीट बोलतही नव्हती. तिच्या मनात अजूनही तो जबरदस्त अपघात घर करुन बसला होता. आजीने आजोबांच्या वाढदिवसा‍निमित्त त्यांच्याकडे असलेल्या थोड्या बहुत रक्कमेची हॉस्पिटलमधील काही रुग्णांना मदत केली. मुलाच्या अपघातानंतर या हॉस्पिटलने त्यांना आधार दिला होता. त्याचीच जाण ठेवून सगळ्या स्टाफसाठी समारंभ ठेवला होता. त्यात प्रत्येकाला भेटवस्तू दिली. त्यावेळी ते मला ते भेटले होते. त्यांचे चेहरे प्रसन्न वाटत असले तरी मनात मात्र कुठंतरी कोंडुन ठेवलेलं दुःख मला जाणवत होते.

मला ती भेट वस्तू देतांना आजोबा म्हणाले, “जान्हवी आता डोळे उघडून आमच्याकडे पाहते ते फक्त तुझ्यामुळे, तुला किती आशीर्वाद दयायचे... आमचं तर आयुष्य संपलं होतं. तु अगदी आमच्या मुलीसारखी भेटलीस बेटा... पण जान्हवीचे हे असं व्हायला नको होतं, आमच्या जान्हवीचे सगळे आयुष्य असेच त्या खाटेवर जाणार बहुतेक..."

बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांना कसेबसे मी सावरण्याचा प्रयत्न केला. पण ते काही थांबले नाहीत. लहान मुलाप्रमाणे ते  हमसून हमसून रडू लागले. काय करावे कळत नव्हते. तेव्हा आजी म्हणाल्या, यांना आपल्या दुःखाचा घटकाभरात विसर पडतो. आजूबाजूचे भान देखील राहत नाही. मला मात्र सगळं लक्षात राहतं. चांगले आणि वाईट दिवस... सगळंच थकलेल्या डोळ्यांनी आता पहावं लागतं. आम्हाला आता आधाराची गरज आहे. आमच्या मुलीला आधाराची गरज आहे. त्यासाठी आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. तूच मला मदत करु शकतेस...तु आमच्या मुलीसारखीच आहेस... तुला जे हवं ते मी देईन. फक्त एवढं कर आम्हा म्हाताऱ्यांसाठी..... "

 *****

वाचता वाचता माझेही डोळे पाणावले होते.  डायरीतील पुढील पान दुमडलेलं होतं. कदाचित त्यावरच तिने गुपित लिहीलेले असावे असे मला वाटले.
 

No comments:

Post a Comment