ड्रायव्हर काकांच्या पायाला अपघातात आधीच भरपूर मार लागलेला
होता. त्यात आता आणखी भर पडली होती. त्यांच्याकडचे पैसे, पाकीट सर्व लुटून नेले
होते. मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे वाजला नाही म्हणून मोबाईल तेवढा राहिला. काकांनी
सुयशला मुंबईला पोहोचण्याची सोय व्हावी म्हणून विनवणी केली. पण सुयशला एवढे लांब
मुंबईला, हॉस्पिटल सोडून जाता येणार नव्हते. काय करावे यावर तो विचार करत
होता. तेव्हा त्याला सुरजची आठवण
झाली. त्यांनी ड्रायव्हर काकांना सुरजचा
फोन नंबर विचारला. पण ट्रिपची सगळी जबाबदारी सनिक दादाने घेतली असल्याने त्याचा
नंबर त्यांना लक्षात होता. काकांनी सनिक दादाचा नंबर सुयशला दिला. सुयश काकांना
आश्वासक शब्दात म्हणाला, “ काळजी करु नका. तुमची मुंबईत जाण्याची व्यवस्था करतो. “ त्यावर ड्रायव्हर काकांच्या
डोळ्यात पाणी आले. ते दोन्ही हात जोडून सुयश समोर उभे होते. त्याच भरल्या
अंत:करणाने ते म्हणाले, “तुमचे खूप उपकार होतील साहेब... संकटात तुम्ही मला मदत
केलीत... तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत अशी मी देवाकडे प्रार्थना करीन. मला एकदा
माझ्या घरी फोन लावून देता का? माझी मुलगी माझी वाट बघते. तिची खुशाली ऐकल्यावर
आणि तिचा आवाज ऐकल्यावर माझ्या जीवात जीव येईल. ”
सुयशने त्यांचे मुलीशी बोलणे करून दिले. त्यांच्या मुलीची
तब्येत आता सुधारत होती. ती बरी होत आहे हे ऐकून त्यांचा जीव भांड्यात पडला.
त्यानंतर सुयशने सनिक दादाला फोन लावला. पण तो गाडी चालवत
असल्याने त्याला नीटसे काही ऐकू येत नव्हते की बोलताही येत नव्हते. म्हणून त्याने
आपला फोन मागे बसलेल्या सुरजला दिला आणि बोलायला सांगितले. फोन देईपर्यंत कट झाला
होता. सुरजने नंबर पाहिला. अनोळखी नंबर होता. गाडी शेरवली फाट्यावर पोहोचली. लवकरच
गाडी गीतांजलीच्या वाड्यात पोहोचणार होती. सुरजने पुन्हा त्याच नंबरवर फोन लावला.
फोनवरुन ओळखीचा आवाज आला.
“हॅलोऽऽऽ” या आवाजावरुनच सुरजने सुयशला ओळखले. सुयशने
सुरजला काकांबद्दल सर्व हकीकत सांगितली. त्यांना मुंबईला कसे जाता येईल याबद्दल
विचारले. सुरजच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. त्याने सुयशला शेरवली
फाट्यापर्यंत येण्याची विनंती केली. अंतर बरेच होते, त्यामुळे सुयशने सुरुवातीला
नकार दिला. पण नंतर सुरजने हट्ट केला. तेव्हा तिथल्या जखमी प्रवाशांवर प्रथमोपचार
करुन मी काकांना तिथे सोडतो असा सुयशने शब्द दिला. तोपर्यंत
आमची गाडी वाड्याबाहेर येऊन थांबली. काळ्याकुट्ट ढगांनी
आभाळ भरुन आलं होतं, पक्ष्यांचा किलबिलाट सुरु होता. सुर्य अस्ताला जात होता. पाऊस
पडण्याची चिन्हं दिसत होती. पुन्हा एकदा आमचे वाड्यात आगमन झाले. वाड्यात तोच
पुर्वीसारखा दरवळ होता. साफसुफ केलेला वाडा पुन्हा एकदा आमचे स्वागत करत होता.
“आक्काऽऽऽ ए आक्काऽऽऽ आम्ही परत आलो बघ... वाड्यात...कुठे
आहेस? आक्काऽऽऽ”
सनिक दादाच्या हाकेने आक्का ऐवजी गीतांजलीच बाहेर आली. ती
तिथेच उभी राहिली. आलेल्या सर्वांचे तिने स्वागत केले. त्यांना आत यायला सांगितले.
सगळे आत येऊन बसले.
“आक्का कुठे दिसली नाही, स्वयंपाक करते का?” सोमेश म्हणाला.
“नाही.. आज सोमवार.. ती शंकराच्या मंदिरात गेली आहे. येईलच
इतक्यात...”, गीतांजलीने हसत मुखाने सांगितले.
गीतांजली खुश दिसत होती. तिने सगळयांची आपुलकीने चौकशी
केली. यावेळी पाहिलेली बोलणारी... हसणारी... चौकशी करणारी गीतांजली कुणीतरी वेगळीच
होती. आम्ही सगळेच थोड्या वेळासाठी कोड्यात पडलो. तिने जान्हवीच्या सासू
सासऱ्यांना पाहिले. तिचे डोळे त्यांच्यासोबत आलेल्या लहान मुलावर स्थिरावले होते.
तेव्हा सनिक दादाने तिची डायरी तिला परत केली. तिच्या कपाळावर जरा आठयाच
आल्या. पण ती पूर्वीसारखी रागावली नाही.
ती शांत होती. कदाचित तिला ती डायरी माझ्याकडे सुखरुप असेल असा विश्वास होता. पण सनिक
दादाने तिला ती परत केल्याने तिच्या चेह-यावर प्रश्न चिन्ह होते. त्यात सुरजने ही डायरी वाचली हे जेव्हा तिला
सांगितले तेव्हा संकोचलेली गीतांजली पाहताना मला मात्र चुकल्या चुकल्या सारखे झाले
होते.
सोबत आलेल्या जान्हवीच्या सासूबाईंनी तिला जवळ बोलावले आणि माफी मागीतली. ती
हॉस्पिटल मधून गेल्यावर झाला प्रकार त्या तिला सांगू लागल्या.
“गीतांजली हा
जान्हवीचा मुलगा, आमचा नातू इशान... अचानक आलेल्या अडचणी आणि कुटुंबाची होणारी वाताहत, अशा परिस्थितीने
आमच्या मनाचा सुद्धा ताबा घेतला होता. त्यावेळी आम्ही भावनेच्या भरात तुझ्याकडून
जी अपेक्षा केली. ती एकतर्फी होती. याची आम्हाला जाणीव झाली. आम्हाला माफ कर
पोरी... डॉक्टर आमच्या जान्हवीची लहान बहीणीप्रमाणे सेवा करत होते आणि त्यांच्या
मधल्या भाऊ बहिणीच्या नात्याला आम्ही ओळखू शकलो नाही. तुझ्या मनाचा आम्ही विचार
केला नाही.
आम्ही केलेल्या चुकीची शिक्षा आमच्या जान्हवीला नको देवू
बाळ. जान्हवीला अजूनही ही गोष्ट माहित नाही. ती अजूनही तिथेच शुश्रूषा मध्ये तुझी
वाट पाहत आहे. डॉक्टर सुयश आणि जान्हवी तुझी सतत आठवण काढतात. डॉक्टर सुयश
तुझ्याशिवाय अपूर्ण आहेत. ते तुम्ही एकत्र लावलेल्या गुलमोहराला अजून ही विसरले
नाहीत. तुला तिथे गेलं पाहिजे. तिथे तू फूलवलेली बाग आहे, तू लावलेला गुलमोहर आहे,
तुझ्या मदतीला डॉक्टर सुयश आहेत. आम्हाला माफ कर आणि स्वत:लाही शिक्षा करुन घेऊ
नकोस.”
गीतांजली स्तब्ध झाली. भावूक झाली. तिला काय बोलावे काहीच
सुचेना. अगदी चार वर्षांपूर्वी झालेली तशीच स्थिती पुन्हा तिच्यासमोर आली.
“तुम्ही बसा आधी आजी मी तुमच्यासाठी पाणी आणते”, दाटलेल्या
कंठाने ती आत स्वयंपाक खोलीत गेली. काही काळासाठी वातावरणात भयाण शांतता पसरली.
इशानने पहिल्यांदाच वाडा पाहिला होता. तो तिथल्या एक एक गोष्टी पाहत अंगणात गेला.
बाहेरुन आवाज आला, “गीतेऽऽऽ अगं गीतेऽऽऽ थोडे बाहेर ये...
हे बघ...”
No comments:
Post a Comment