गाडी गीतांजलीच्या वाड्याच्या दिशेने निघाली. तिथे सुयश सोबत वेगळेच नाट्य रंगले होते. शुश्रूषा क्लिनिकमध्ये सुयशला एक बेनावी फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज व बोलणे ऐकून सुयशच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणभरात बदलले त्याने गडबडीत “ हो... हो... निघालोच ” म्हणत फोन ठेवला.
आपल्या स्टाफला सुचना दिल्या.” आपल्याला ताबडतोब एका ठिकाणी जायचे आहे. लगेच तयार व्हा..” सुयशने ड्रायव्हरला गाडी काढण्यास सांगितले. तेव्हा स्टाफमधील एकजण बोलला, “ पण आपल्याला कुठे जायचे आहे ते तरी सांगा...” सुयशने सर्वांना सांगितले, “ मुंबईला जाणाऱ्या एका गाडीचे घाटात अपहरण झाले आहे. तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचले पाहिजे. त्यांचा प्रथमोपचार लवकर झाला पाहिजे. दोन रुग्ण वाहिनी पण सोबत घ्या. तिथे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. ” असं म्हणत तो मुंबईच्या दिशेने जायला निघाला. त्याच्याबरोबर चार-पाच डॉक्टरर्स, नर्स आणि बॉय सामान घेऊन निघाले.
“ लवकर पोहोचणे खूप गरजेचे आहे, तेव्हा गाडी थोडी जोरातच चालवा.” सुयशने ड्रायव्हरला सांगितले. सुयशने ड्रायव्हरला ठिकाणाबाबत सविस्तर माहिती दिली त्यानुसार मुंबईला जाणारा रस्ता ड्रायव्हरने लगेचच पकडला. गाडीने आता वेग घेतला होता. सांगितलेल्या ठिकाणी लवकर पोहचणे हेच आता ड्रायव्हरचे देखील लक्ष होते. गाडी मुख्य रस्त्यापासून आत दहा- पंधरा मैल चालली आणि एका वळणाच्या रस्त्याला लागली. ड्रायव्हरने गाडीचा वेग थोडा कमी केला. थोड्या वेळातच अपहरण झालेल्या गाडीजवळ ते पोहचले.
पाहतात तर काय! प्रवाशांची खूपच वाईट अवस्था झालेली होती. कित्येक जण विव्हळत पडले होते. कुणाच्या पायाला तर कुणाच्या हाताला दुखापत झालेली होती. एका म्हातारीच्या डोक्याला झालेल्या जखमेतून रक्त वाहत होते. एकंदरीत सर्व चित्र पाहून डॉक्टर सुयशला व त्याच्या सहकाऱ्यांना गलबलून आले. पण ही वेळ पाहत बसण्याची किंवा भावनिक होण्याची नव्हती. सगळया टीमने पटापट जखमींच्या प्रथमोपचाराला सुरुवात केली. गंभीर रुग्णांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. त्या ठिकाणी पोलीस देखील पोहचले होते, ते सर्वांची कसून चौकशी करत होते. सुयश उपचार करताना पोलीस चौकशी करायला आले.
“तुम्ही कुठे निघाला होतात? गाडी कुठं जात होती?” हाताला व पायाला दुखापत झाल्यामुळे तो इसम विव्हळत बोलत होता.
“मी एका तरुण मुलांच्या ग्रुप सोबत ट्रीपला त्यांचा ड्रायव्हर म्हणून आलो होतो. जाताना एका अपघातात मला थोडे लागले आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. माझ्या घरुन फोन आला. माझी मुलगी खूप आजारी आहे. त्यामुळे मी कामटे फाट्यावरून बस पकडली. ती बस रस्त्यात बंद पडली मग त्या ड्रायव्हर ने दुसऱ्या बस ची सोय केली. ही ती बस. त्या बसने आम्ही घाटात आलो आणि निर्जन ठिकाणी काही जणांनी बस मध्ये शिरून आमच्यावर हल्ला केला. आमचे फोन काढून घेतले. जवळ जवळ पाच सहा तासांनी त्यांनी इथून पळ काढला. जवळपास संपर्कासाठी काहीच नव्हते. शेवटी काही जण इथून पायी चालत वस्तीच्या ठिकाणी निघाले. मदतीच्या शोधात असताना एका देवमाणसाने हॉस्पिटलला कॉल करून सांगितले.
त्यांचे बोलणे सुयशने ऐकले आणि त्यांना विचारले, “म्हणजे तुम्ही सुरज, सनिक यांच्या गाडीचे ड्रायव्हर आहात का?” ड्रायव्हर काकांनी सुयशकडे अचंबित नजरेने पाहिलं.
“काका... तुम्ही आमच्या क्लिनिक मध्ये ऍडमिट होतात. मला सर्व माहित आहे. सुरज, त्याचे मित्र तुम्हाला शोधत होते. तुम्ही इथे आणि मला भेटलात. ” त्या दोघांची भेट ही दैवयोगच असावा असे सुयशला वाटू लागले. इन्स्पेक्टर त्यांचे ऐकून पुढच्या रुग्णाची चौकशी करायला गेले.
No comments:
Post a Comment