Wednesday, 19 June 2024

प्रवासातली गोष्ट : १८


 

सूर्य मावळतीकडे झुकला होता. काळोख दाटत चालला होता. त्या काळोखात मी गीतांजलीचे पूर्वीचे आयुष्य नजरेपुढे आणण्यात मग्न झाले होते. ती डायरी मी सनिक दादाला परत केली. पुढे वाचण्यासाठी मन धजावत नव्हते. पुढे काय झाले असेल याचा अंदाज बांधत मी पुढचा प्रवास केला. कदाचित ही डायरी सुरजने शेवटपर्यंत वाचली असणार म्हणूनच तो त्याचा माग काढत डॉक्टर सुयश पर्यंत पोहोचला असावा.

मला खरंतर त्याला विचारावेसे वाटले की, नक्की काय बदल त्याला यात हवा होता? कोणत्या गोष्टीसाठी तो धडपड करत होता? मी भानावर आले आणि सनिक दादाने अचानक गाडी थांबवली. रात्रीचे वस्तीला थांबायचे होते. म्हणून वाटेत लागलेल्या एका लॉजजवळ गाडी थांबली. सगळे आपापली सामानाची बॅग घेऊन खाली उतरले. रात्रीच्या जेवणाची सुद्धा तिथेच सोय झाली. आम्ही जेवणं आटोपून आपापल्या खोलीमध्ये गेलो. तीन खोल्यांचा बंदोबस्त झाला होता. रात्र असल्याने परिसर नीटसा ओळखता आला नाही. पण आजूबाजूला डोंगर आणि दूरवर पसरलेलं मक्याचं शेत होतं.
 
थंडगार आणि शांत वातावरणात कधी झोप लागली ते समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी नाश्ता करुन आम्ही तिथून निघताना मॅनेजर साहेबांनी स्व-खर्चातून उभा केलेला बागबगीचा आणि छोटेखानी रिसॉर्ट दाखवलं. तिथे फिरताना मला दोन ओळखीचे चेहरे दिसले. जवळ जाऊन पहावे तर आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या नातवाला घेऊन जान्हवीचे सासू सासरेच तिथे फिरत होते. सुरवातीला मला भास झाला असेही वाटले. मग मी ही गोष्ट सुरजला सांगितली. सुरजने खात्रीशीर माहिती घेतली. तेव्हा समजलं की, त्या रिसॉर्टच्या येणाऱ्या उत्पन्नातून आणि सेवाभावी संस्थांकडून मिळणा-या देणगीतून इथे वृद्धाश्रम आणि अनाथालय चालविले जाते. याच अनाथालयात जान्हवीचे बाळ वाढत होते तर तिचे सासू सासरे वृद्धाश्रमात राहत आहेत.

त्यांना पाहिल्यावर सुरज मला म्हणाला, “त्यांच्याबद्दल आपल्याला माहित आहे हे त्यांना अजून कळलेलं नाही. पण त्यांचे इथे असणे म्हणजे काही तरी वेगळेच दर्शवते. ते आणि जान्हवीचा मुलगा जर इथे आहे म्हणजे सुयश जान्हवी हे समीकरण झालेच नाही. काही तरी वेगळंच चित्र इथे दिसते. "

“हो... पण आपण काय करु शकतो...? कशी मदत करु शकतो... हे गीतांजलीला माहिती सुद्धा नसेल. आणि सुयश त्याला तर गीतांजलीच्या निघून जाण्याचे खरे कारण सुद्धा माहिती नसेल. त्याने ती डायरी कुठे वाचली. ती तर आपण वाचली. आपण ती डायरी खरं तर सुयशला द्यायला हवी होती, सुरज... तेव्हाच त्याचा काही तरी उपयोग झाला असता. सुरज तु बरोबर म्हणत होतास. आपल्यामुळे जर कोणाचे भले होणार असेल तर नक्कीच प्रयत्न करायला हवेत. " सुरजकडे आशावादी भावनेने पाहत मी म्हणले.

“आपण खुप काही करु शकतो. आपल्याकडे गीतांजलीची डायरी आहे ना. जी आजी आजोबांनीही कधी वाचली नसेलच. आपण त्यांना ती डायरी दाखवू "
सुरज म्हणला.

“पण त्याने यांना धक्का बसला तर...? आधीच त्यांची परिस्थिती बरोबर वाटत नाही.” मी म्हणले.

“आपण काही ही डायरी त्यांना वाचायला द्यायची नाही... फक्त त्यात काय लिहिले आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू. " सुरज म्हणला.

“म्हणजे ?” मी भुवया उंचावत सुरजला विचारले.
 
सुरज काही न बोलता तिथून निघून गेला. जातांना फक्त " मला सोडून जाऊ नका.” एवढं सांगून गेला.

सनिक दादाने शिटी वाजवून सगळ्यांना जेवायला बोलवले. मी सनिक दादाला झालेला प्रसंग सांगितला. सुरवातीला तो सुरजवर थोडा वैतागलाच. सुरज तासाभराने जान्हवीच्या सासू सासऱ्यांना आणि तिचा मुलगा इशानला माझ्या खोलीत घेऊन आला. त्यांचा चेहरा थोडा गोंधळलेला वाटला. सुरजने बहुदा त्यांना सगळं सांगितलं असावं म्हणून कदाचित त्यांना अपराधीपणाच्या भावनेने ग्रासले होते. या सगळ्या परिस्थिती मधून मार्ग काढण्याचा एकच पर्याय त्यांच्याकडे होता. तो म्हणजे गीतांजलीचा झालेला गैरसमज दूर करुन माफी मागायची. म्हणून त्यांनी गीतांजलीला भेटण्याचा निर्णय घेतला. सुरजने त्यांना सोबत यायला सांगितले. तो पर्यंत सर्वांची जेवणं झाली होती. सुरजने सनिक दादाला रुममध्ये बोलावून सगळी परिस्थिती सांगितली. मी सुरज आणि सनिक दादा तेव्हा त्या खोलीत होतो. जान्हवीचा मुलगा सुद्धा तिथेच होता. त्या साडेतीन-चार वर्षाच्या इशानला काय सुरु आहे याची कल्पनाही नव्हती. खिडकीच्या गजांचा आधार घेऊन तो बाहेरच्या बागेतल्या फुलपाखरांकडे कुतूहलाने पाहत उभा होता. सुरजने सनिक दादाकडे आजी आजोबांना आपल्यासोबत ट्रॅव्हलरमधून गीतांजलीच्या वाड्याकडे नेण्याची विनवणी केली.
 
“आज जर आपण हे करु शकलो तर खूप सारे निरुत्तरीत प्रश्न सुटतील. बघ दादा... काय वाटतं तुला? एक सुख वाटेतच आहे, तिथवर जाण्याचा मार्ग आपण निवडला तर या ट्रिपचा हॅपी एंडिंग होईल. तू हो म्हणालास तर कुणीही विरोध करणार नाही."  मी ही सुरजच्या बोलण्याला दुजोरा दिला. सनिक दादा मनाने संवेदनशील  होताच तो नकार देणं शक्य नव्हतं.
 
सगळेजण सामान घेऊन ट्रॅव्हलरमध्ये बसले. सुरज तेव्हा आजी आजोबांना आणि इशानला घेऊन आला आणि त्यांना पहिल्या सीटवर बसवले. त्या दोघांना तिथे पाहून सगळ्यांना आश्चर्यच वाटले. " सांगतो सांगतो "  म्हणत सुरजने सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नचिन्हाला तात्पुरते शांत केले.




No comments:

Post a Comment