त्या दुमडलेल्या पानावर गुलमोहराच्या सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या होत्या. त्या सुकलेल्या पाकळ्यांचा रंग अजूनही गडद होता. गडद रंगाच्या गुलमोहरा प्रमाणेच गीतांजलीने तिच्या आजूबाजूचं वातावरण रंगीत केलं होतं. हे मला त्या दुमडलेल्या पानावर चिकटवलेल्या गृप फोटोवरुन जाणवत होतं.
मग तिच्या रंगीत विश्वातले रंग कशामुळे उडाले असावेत? याच विचारात डायरीचे पुढचे पान उलटले.
******
जातांना त्या वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या खिशातून एक फोटो काढला. त्या फोटोमध्ये त्यांचं हसतं खेळतं कुटुंब होतं. थरथरत्या हाताने धरलेल्या फोटोकडे पाणावल्या डोळयांनी पाहत आजी त्यांचा भुतकाळ सांगू लागल्या. जान्हवी तेव्हा गरोदर होती. सहा महिने पूर्ण झाले असताना कळलं की, होणारं मुल बौद्धिकदृष्ट्या विकलांग आहे. तपासणी केल्यावर कळलं की त्यावर काही उपाय नाही. त्यामुळे जान्हवीच्या नवऱ्याने म्हणजेच आमचा मुलगा अनिरुद्ध ... त्याने ते मुल नको असल्याचा निर्णय सुनावला. कोणत्याही परिस्थितीत हे मुल मी स्वीकारणार नाही असे ठणकावून सांगितले. त्याच हट्टापायी तिला माहेरी पाठवून दिले. सहा महिन्याचा गर्भ स्विाकारण्याशिवाय गंत्यंतरच राहिले नाही. गर्भपातामुळे जान्हवीच्या जीवाला धोका होईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. आम्हाला समजले तेव्हा ते मुल जन्माला यावे म्हणून आम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलो. अनिरुद्धला ही गोष्ट सांगूनही त्याच्या निर्णयात काही फरक पडला नाही. शेवटी आम्ही जाऊन जान्हवीला समजावले आणि या मुलाचा जन्म होईपर्यंत इथेच आई-वडिलांकडे रहा म्हणून तिला सांगितले.
काही दिवसात जान्हवीने गोंडस बाळाला जन्म दिला. जान्हवी माहेरीच होती. काही दिवसात आम्ही तिला भेटून आलो. त्या निरागस जीवाला पाहून आमचा जीव भांड्यात पडला. बाळ थोडे मोठे झाल्यावर त्याच्या काही चाचण्या झाल्या. आणि देवकृपेने ते बाळ शारीरिक आणि मानसिक दृष्टीने अगदी ठणठणीत असल्याचे समजले. जान्हवीने ही बातमी आम्हाला तात्काळ कळवली. अनिरुद्धने अजून त्याला पाहिले ही नव्हते. जेव्हा त्याला त्याची चूक समजली तेव्हा क्षणाचा ही विलंब न करता त्याने जान्हवीला गाठले. जान्हवीला घेऊन तो पुन्हा आपल्या घरी येणार होता.
अखेर त्याची जान्हवीची भेट झाली. तब्बल सहा महिन्याने ते एकमेकांना भेटले होते. जान्हवीची त्याने माफी मागितली. तिच्याशी बोलताना त्याच्या मनात खोल वेदना होत होत्या. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. आपल्या मुलाला पाहण्यासाठी आतुर झालेला बाबा त्याला शोधत होता.
जान्हवीने बाळाला त्याच्या मामाकडे ठेवले होते. जान्हवी मनातून दुखावली होती. तिला अनिरुद्धला माफ करणे आणि बाळाला त्याच्या हवाली करणे, पुन्हा त्याच्यासोबत येणे सारेच कठीण वाटत होते. शेवटी खुप विनवणी केल्यावर ती त्याच्यासोबत बाळाला भेटायला मामाच्या घरी निघाली. दोघे तिकडे जातानाच हा अपघात झाला आणि सगळे गणित बिघडले. तेव्हाचे बिघडलेले गणित अजून ही सुटले नाही, पण ते सोडवणारी एक व्यक्ती आमच्या आयुष्यात आली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सुयश...
आमचा नातू आणि जान्हवी यांच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे दिवस आणणारी एकच व्यक्ती आम्हाला दिसते आहे...डॉक्टर सुयश...” पुन्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. जान्हवीचा भूतकाळ ऐकल्यावर मी थोड्या वेळासाठी नि:शब्द होते.
“हो... पोरी, अडचणीत अडकलेल्या आमच्या कुटुंबाला आता डॉक्टर सुयश संजीवनी म्हणून भेटले आहेत. त्यांनी हा सगळा भूतकाळ ऐकला तर ते जान्हवीला नक्कीच आधार देतील. खूप मोठ्या मनाचे आहेत ते... तू बोलशील ना त्यांच्याशी. जान्हवीचे भलं व्हावं आणि आमच्या नातवाला आधार मिळावा हीच आमची शेवटची इच्छा आहे असं समज हवं तर... मला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तू आमच्या मुलीसारखीच आहेस. करशील ना एवढं...?”
मी काहीच बोलू शकले नाही. अर्थात त्यावेळी मी सुन्न झाले होते. अशा वेळी काय बोलावे हे देखील मला काही सुचेना मग त्यांच्याकडे एकदा पाहिलं आणि तिथून बाहेर आले. मी निघाले तेव्हाही ते माझ्याकडे विश्वासाने पाहत असावेत.
काय करावे सुचत नव्हते, माझी पावले आपसूक जान्हवीच्या वार्डाकडे मला घेऊन गेली. ती काही तरी विणत बसली होती. तिला दरवाजातूनच दोन क्षण न्याहाळत राहिले. काय बोलावे सुचत नव्हते. पण तिच्या निस्तेज चेहऱ्यावर हसू येण्यासाठी मी पुढाकार घेणार हे तेव्हाच ठरवलं होतं.
नंतर मुद्दाम हॉस्पिटलच्या बागेत जाणं मी टाळू लागले. जान्हवी आपले मन डॉक्टर सुयशकडे हलकं करु शकेल एवढी मोकळीक त्यांच्यात निर्माण करण्यात मी यशस्वी झाले. एकदा आजी आजोबा आले असतांना सुयश आणि जान्हवीला हसतांना पाहून त्यांची मनेही सुखावली. त्यांनी माझ्यासाठी पुरणपोळ्या आणल्या होत्या. त्यांच्या नजरेत माझ्यासाठी भरभरून आशीर्वाद आणि कौतुक दिसत होते. सुयश सारखाच चांगला जोडीदार तुलाही मिळावा असा आशीर्वाद देवून ते तिथून निघून गेले. माझ्या डोळ्यात आलेले पाणी मी तिथेच रोखले.
काही दिवसांनी आक्काचं पत्र आलं. तिला दम्याचा त्रास सुरु झाला होता. वाड्यात तिची काळजी घेणारे कुणीही नसल्याने तिने स्वत्:कडे दुर्लक्ष केले आणि तिच्या उपचारासाठी उशीर झाला. यावेळी आजार तिच्या जीवावर बेतणार होता. पण थोडक्यात बचावली. पत्र मिळताच मी तडक वाडा गाठला ते ही कायमचा ....!
******
गीतांजलीची डायरी वाचून माझे डोळे पाणावले होते. पोटात गलबलून आले. डायरी पुढे वाचावी की नाही ते समजेना. थोडा वेळ ती डायरी बंद करुन मी त्या विचारातच खिडकीतून बाहेर शून्य नजरेने पाहत बसले.
No comments:
Post a Comment