त्या रात्री माझं गीतांजली वरचं लक्ष काही केल्या हटत नव्हतं. गीतांजली बद्दलचं कुतूहल वाढत चाललं होतं. एका क्षणी तिच्याशी आपलं फार पुर्वीपासूनचं काही नातं असावं असं वाटायचं. तर पुढच्याच क्षणी तिचं सगळं अनाकलनीय होतं.
वाडा, गाव परिसर जितका रम्य भावला त्याहीपेक्षा रमणीय, रहस्यमय मला गीतांजली वाटली. नावाप्रमाणेच सुरेल व्यक्ती. तिचं चालणं, बोलणं, वागणं, उठणं-बसणं... सारंच स्मरणीय. एखाद्या प्रियकराने प्रेयसीची स्तुती करावी अगदी तशी.... एखाद्या कवितेसारखी, गुढ अर्थानं भरलेली. पण ओळखीच्या शब्दांनी ओथंबून वाहणारी. स्वच्छंदी खळाळती नदी. डोंगर, दगड पार करत इथं या वाड्याला येऊन मिळालेली ही वेगवेगळया भावनांची पोतडी...कशी असेल ही खरी? या विचारांनी माझ्या डोक्यात पिंगा घालायला सुरुवात केली होती. त्याच विचारात कधी डोळा लागला तेही मला समजलं नाही.
इकडे गीतांजली तिच्या खोलीच्या खिडकीतून चांदणं न्याहाळत बसलेली होती. तसा तिचा हा नेहमीचा आणि आवडता छंद. बाहेर खळाळून हसणारी गीतांजली तिच्या खोलीत मात्र अंतर्मुख होऊन जात असे. तिच्या मनात कसलीतरी उदासी दाटलेली असायची. त्या उदासीला गीतांजलीने कधीच कुणाला कळू दिले नाही. किंबहूना कुणाला तिची उदासी जाणवलीही नसावी. मनातील गलबत ती खोलीतच सोडून इतरांमध्ये मिसळत असे. तसं पाहिलं तर गीतांजली घरातल्या सदस्यां व्यतीरिक्त इतरांमध्ये कधी मिसळलीच नव्हती. क्वचितच ती वाड्याबाहेर पडत असे. आक्का तिच्याबद्दल सांगताना भारावून जाताना मी पाहिले. अनामिक अशा क्षणांची वाट पाहत तिचा नेहमीच दिवस सुरु व्हायचा आणि तसाच संपायचा. चांदणं न्याहाळत तिचा डोळा कधी लागत ते तिलाही कळत नसे. तशीच ती त्या दिवशी सुद्धा झोपली.
पाखरांच्या किलबिलाटाने सकाळी सगळ्यांना जाग आली. पुर्वेला भगव्या- लाल- पिवळया रंगांची उधळण सुरु होती. त्यात गायीचं गोठ्यातलं हंबरणं, तिने तिच्या पाडसाला चाटणं, धार काढण्यासाठी चाललेली आक्काची लगबग... अहाहा...!!! या मस्त वातावरणात सकाळी सगळ्यांची आन्हिकं उरकली.
“पोरांनो, चला नाष्टा करुन घ्या. आजचा खमंग बेत बघायला या...” आक्काच्या या हाकेनं वाड्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेलो आम्ही मधल्या पडवीत अगदी शहाण्या बाळासारखं जमा झालो.
“अरे व्वा! थालीपीठं!!! यम्मी, त्यावर विरघळणारा लोण्याचा गोळा...”
“क्या बात है। “
“मी तर चार घेणार”
“मग आम्ही काय तुझ्या तोंडाकडे नुसतं पाहत राहायचं का सोमेश...?”
“आरं थांबा पोरांनो! इतकं हातघाईला येऊ नका.
सगळ्यांना मन आणि पोट भरुन थालीपीठं खाता येतील...”
“ देअर यु आर...” म्हणत सनिक दादाने आक्काला मायेनं मिठी मारली.
“पुरं झालं आता... बस... बस...”, असं म्हणत आक्कानं त्याच्या डोक्यावरुन आणि तोंडावरुन हात फिरवला. थालीपीठ जीभेवरुन कधी आणि किती पोटात उतरत होतं ते कळतही नव्हतं. पोट भरलं पण मन मात्र गीतांजलीला शोधत होतं. ती, तिची खोली, त्या खोलीचा दरवाजा माझ्यासाठी एक रहस्य बनलं होतं.
“उघडली असती तिनं खोली तर एवढं काय बिघडलं असतं...?” या विचारांनी मन खट्टू झालं. बाकीचे सर्वजण पेटपूजा करुन पुन्हा मिळेल त्या जागी पहुडले होते. बाहेर उन्हाचा कहर किंचित वाढला होता. तशातही बाहेर वाहणारी हलकी वाऱ्याची झुळूक मन उल्हासीत करुन जात होती. गीतांजलीने नेहमीप्रमाणे आक्काला तिच्या कामात मदत करुन आपला फुरसतीचा वेळ स्वत:साठी राखून ठेवला होता. तशातच उन्हाची जागा अचानक काळ्या सावळ्या ढगांच्या सावलीने घेतली. वाऱ्याची झुळूक अधिक थंड होत गेली. आणि अचानक पाऊस पडला. अनपेक्षित पाण्याच्या तुषारांनी अंगणभर सडा मारायला सुरूवात केली. तापलेल्या मातीचा सुगंध मन तृप्त करुन जात होता.
“सन्याऽऽऽ बाहेर बघ कसलं मस्त एकदम रोमँटीक वातावरण झालं आहे...!” विवेक सनिक दादाला मोठ्याने आवाज देत दादाजवळ आला.
“आताच तर कडक ऊन होतं... अचानक कसं बदललं...!”
“हो, ना... आत्ता बघ कसं अचानक सगळं बदललं आहे.”
नाही नाही म्हणत सगळं टोळकं अंगणात उड्या मारत आलं. गीतांजली सुद्धा आली. जितक्या पटकन आणि नकळत बाहेरचे वातावरण बदलले तेवढ्याच वेगानं तिच्या चेहऱ्यावरचा नितळ, शांत, मनस्वी भाव सरसर बदलत गेले. अंगणातील तुळशी वृंदावन, मोगरा, चाफा जणू त्या तुषार सिंचनाने पुन्हा मोहरुन आणि बहरुन आले होते. गुलाबाच्या पाकळ्यांवर मोत्यांची झालेली पाखरण मन वेधून घेत होती. माझं मन त्या सगळ्या नजाऱ्याने पुलकित होत होते. गीतांजलीच्या चेहऱ्यावर मात्र खंत पसरलेली दिसत होती. इतक्या नयनरम्य वातावरणातही काहीतरी कमी असल्यासारखी तिची नजर शोध घेत होती. तिच्या बद्दलच्या कुतूहलात तिची ती भिरभिरी नजर अधिकच प्रश्नांची भर टाकत होती. त्या पावसात आम्ही सगळे तना- मनाने चिंब होऊन गेलो होतो. हे असं धुंद शहारुन टाकणारं वातावरण शहरात क्वचितच किंबहूना ते इतक्या सहज अनुभवता येत नसायचं. उलट भिंतीनं काटा आणणारं, वाहून नेणार असं चित्र स्वभाविकपणे समोर यायचं.
इतकं उल्हासित वातावरण असूनही गीतांजलीच्या चेहऱ्यावर ते समाधान, ती तृप्ती नव्हती. अपुर्णतेची चाहूल तिच्या प्रत्येक भावातून मला अस्वस्थ करत होती. तासाभरात पाऊसही थांबला होता. आता गरम गरम चहा भजीची फर्माईश होऊ लागली होती. सगळ्यांनी ओले कपडे बदलले. आक्काने आणि गणादादाने सगळ्यांसाठी गरमागरम चहा आणि कांद्याची खमंग भजी तयार केली. सर्वांनी त्यावर ताव मारला. पाऊस थांबून आता चांगला अर्धा पाऊण तास उलटला होता. गीतांजली आमच्यात नव्हती. ती अजूनही अंगणातच होती. अगदी एकटी. कुठंतरी हरवल्यासारखी... शुन्यात नजर लावून बसलेली. तिचं हे वागणं आक्का आणि घरच्यांसाठी परिचयाचं होतं. आम्ही मात्र तिच्या या रुपाला पाहून चाट पडलो.
No comments:
Post a Comment