कल्पनेत रमणारी गीतांजली आजही ती डायरी वाचताना तशीच वाड्यातल्या दरवाजाआडून बाहेर पाहताना दिसली. तशीच अगदी शांत आणि निर्विकार. अंगणात कुठेतरी हरवलेले, काहीतरी शोधताना आणि मग ते मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर असायचा.
तेव्हा तिला पाहत आम्ही तिथेच अंगणात उभे होतो. तिथे नेहमीच तिचा वावर असायचा. तिचे आभासी अस्तित्व तिथल्या भिंतींनाही ओळखीचे होते. वाड्यातील जीर्ण काही कोपरे अजूनही मनात कुतूहल निर्माण करत होते. आजही ती तिथेच आहे. तिचे तिथले अस्तित्व गुलमोहराच्या बहरलेल्या फांदीसारखेच आजही तिथे झुलते, फुलते आणि बहरते. ते झाड ही आता छान फुलून आलेले होते. किती लहान असल्यापासून तिने त्याला लळा लावला होता. तिचा तो
आनंद आम्ही जवळून पाहिलेला होता.
निसर्ग हा विलक्षण भाव-भावनांचा निर्माता आहे. बऱ्याचदा कोसळणाऱ्या सरीतून आनंद, सौख्य आणि सौंदर्याचं लेणं बरसत असते. आपण चिंब न्हाऊन निघतो. तर कधी पानगळीच्या रखरखत्या उन्हात ग्रीष्म समोर येतो. सुख-दुःखाचे चक्र पार गळून पडते आणि कधी गुलाबी थंडीत प्रेमाची, मायेची दुलई आपसूक मने जोडू पाहते. ही किमया निरंतर घडतच असते, आपल्याही नकळत. त्यात निसर्गाच्या आणि आपल्या भावना कधी समांतर व्हायला लागतात ते देखील कळत नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या आजुबाजूच्या गोष्टींचा किमयागार दुसरा तिसरा कुणी नसून निसर्गच असतो.
आयुष्याच्या प्रवासात जसे बरेच वाटसरु भेटतात, विविध थांबे लागतात... तशीच ही सगळी मंडळी प्रवासात भेटली होती. काही अचानक प्रवासात भेटलेले अज्ञात वाटसरु, काही सहप्रवासी आणि काही थांबे. आणि शेरवलीच्या वाड्यात भेटलेली गीतांजलीची गोष्ट किंवा पुन्हा नव्याने फुललेल्या गुलमोहराचीही गोष्ट.
मी पुन्हा त्या वाड्यात आले होते. बऱ्याच वर्षांनी पुन्हा ते अंगण तो वाडा पाहिला. तिथेच ती डायरी माझ्या हाती लागली आणि तो सगळा प्रवास जसाचा तसा पुन्हा आठवला.
काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट, ठरवलेल्या प्रवासात काही घटना अनपेक्षीत घडत गेल्या. आम्ही सहा ते सात जण या ट्रिपसाठी दोन दिवस आधीच तयारीला लागलो होतो. प्रवास म्हटलं की उत्साह अगदीच वरच्या पट्टीचा असतो आणि तो ही जर आपल्याच नटखट मित्र-मंडळींसोबत असेल तर कल्पनाच करायला नको. चार-पाच दिवसांचे नियोजन व्यवस्थित झाले होते आणि एकदाचा आमचा तो प्रवास सुरु झाला.
मला ती डायरी वाचायला गीतांजलीने दिली होती. कदाचित तिचे गुलमोहराचे गुपित माझ्याकडे तिला सोपवायचे होते. ते माझ्याकडे अजूनही सुरक्षित होते. आज ती डायरी पुन्हा वाचताना ती लगेच डोळ्यासमोर येऊन गेली... “ गीतांजली..."
No comments:
Post a Comment